अहिल्यानगर | प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाने लोहार समाजाच्या आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक विकासासाठी स्थापन केलेल्या ब्रह्मलीन आचार्य दिव्यानंदपुरीजी महाराज आर्थिक विकास महामंडळ (उपकंपनी) बाबत प्रशासनाकडून होत असलेल्या दुर्लक्षामुळे लोहार समाजात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
शासनाने निर्गमित केलेल्या अधिकृत परिपत्रकानुसार सदर महामंडळाचे कार्यालय अहिल्यानगर जिल्ह्यातील सामाजिक न्याय भवन, सावेडी येथे कार्यरत असल्याचे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. मात्र प्रत्यक्ष पाहणी केली असता या कार्यालयाच्या दर्शनी भागावर महामंडळाच्या नावाची कोणतीही अधिकृत पाटी अथवा माहिती फलक लावण्यात आलेला नसल्याचे आढळून आले. यामुळे अनेक लोहार समाज बांधव संभ्रमात पडले असून शासनाच्या घोषणांवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
या गंभीर बाबीची दखल घेत दि. २२ जानेवारी २०२६ रोजी अहिल्यानगर जिल्ह्यातील लोहार समाज बांधवांनी सामाजिक न्याय भवन, सावेडी नाका येथील संबंधित कार्यालयाला अधिकृत निवेदन सादर केले. निवेदनाद्वारे महामंडळाच्या कार्यालयाच्या दर्शनी भागावर तात्काळ नावाची पाटी लावण्यात यावी तसेच कार्यालयाबाबत स्पष्ट माहिती उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूजचे सहसंपादक शिवाजी दवणे, समाजसेवक व पत्रकार गणेश भालके, लोहार समाजाचे समाजसुधारक श्री. सुधाकरजी कौसे, तसेच वांबोरी येथील कार्यकर्ते व समाजसेवक रेवणनाथ (मामा) गाडेकर यांच्यासह अनेक समाज बांधव उपस्थित होते.
लोहार समाजाच्या विकासासाठी स्थापन करण्यात आलेल्या महामंडळाच्या अस्तित्वाबाबतच संभ्रम निर्माण होणे हे दुर्दैवी असून, शासनाने याची तातडीने दखल घेऊन आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी समाज बांधवांकडून करण्यात येत आहे. अन्यथा येत्या काळात आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

