shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सत्याचा सूर, न्यायाचा उद्घोष : प्रवीण सावरकर(निमित्त : वाढदिवस विशेष ४ जानेवारी)

*

*पत्रकारिता : समाजाचा कणा
पत्रकार म्हणजे केवळ बातम्या देणारा व्यक्ती नाही, तर तो समाजाचा कणा असतो. जो नेहमी पुढच्या रांगेत उभा राहून कठीण प्रश्न विचारतो, सत्याचा शोध घेतो आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवतो. जे बोलू शकत नाहीत, ज्यांचे प्रश्न दडपले जातात, अशा सर्वसामान्यांचा आवाज बनून तो लोकशाहीला बळ देतो. पत्रकार ज्या वास्तवाला उजेडात आणतो, त्यावरच आपण राहतो त्या समाजाचा आकार ठरतो.
आज आपण केवळ एका व्यक्तीचा वाढदिवस साजरा करत नाही, तर धैर्य, प्रामाणिकपणा, समर्पण आणि सत्यासाठी झटणाऱ्या पत्रकारितेचा उत्सव साजरा करत आहोत.

*कर्तव्यनिष्ठ पत्रकाराचा प्रवास

पत्रकारितेचे काम सोपे नाही. घटनास्थळी प्रत्यक्ष जाऊन माहिती गोळा करणे, शासन-प्रशासनाला प्रश्न विचारणे, अन्यायाविरुद्ध लेखणी उचलणे आणि सत्य निर्भीडपणे मांडणे - या सर्व गोष्टींसाठी अपार धाडस लागते. देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय घडामोडी, नैसर्गिक आपत्ती, गुन्हेगारी, आरोग्य प्रश्न, शेती, शिक्षण, राजकारण, समाजकारण अशा विविध क्षेत्रांत सखोल अभ्यास असलेला पत्रकार म्हणजे प्रवीण वसंतराव  सावरकर.
ते केवळ बातमी देत नाहीत, तर त्या बातमीचे विश्लेषण करून समाजाला योग्य दिशा देतात. वेळापत्रक, मर्यादा, अडचणी यांवर मात करून सत्य लोकांपर्यंत पोहोचवण्याची त्यांची तळमळ त्यांच्या लेखणीतून स्पष्टपणे दिसते. शेतकरी, विद्यार्थी आणि सर्वसामान्यांचा आवाज विदर्भाच्या अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न करणारे प्रवीण सावरकर हे शेतकरी, कष्टकरी, विद्यार्थी आणि दुर्बल घटकांचे खरे प्रतिनिधी आहेत.
शेतकरी आपल्या वेदना घेऊन त्यांच्याकडे येतो, आणि ते कधीही दुर्लक्ष करत नाहीत. शासकीय अधिकाऱ्यांना ठामपणे प्रश्न विचारून, अन्यायाची भंबेरी उडवतात.
लोकशाहीत जनता हीच खरी मालक आहे, तिची शासकीय पिळवणूक होऊ नये – ही त्यांची ठाम भूमिका आहे.
अन्यायासमोर तडजोड न करणारी त्यांची लेखणी भ्रष्ट यंत्रणेला आरसा दाखवते आणि सर्वसामान्यांच्या बाजूने ठामपणे उभी राहते.
शिक्षण, शेती आणि समाजपरिवर्तनाची भूमिका
“शिक्षणाशिवाय पर्याय नाही” हा त्यांचा ठाम विश्वास आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी शिक्षणातूनच प्रगती साधावी, मेहनत घ्यावी, स्वतःच्या पायावर उभे राहावे – हा संदेश ते सातत्याने देतात.
शेती विकासासाठी शासन आणि शेतकरी यांची योग्य भूमिका काय असावी, यावर त्यांचा सखोल अभ्यास आहे.
अनुभव, ज्ञान, विश्वासार्हता आणि तज्ज्ञ दृष्टिकोन यांच्या बळावर ते समाजाला योग्य मार्गदर्शन करतात. तरुण पत्रकारांना आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून पुढची पिढी घडवण्याचे कार्यही ते प्रामाणिकपणे करतात.
सामाजिक पहारेकरी म्हणून जबाबदारी
समाजातील अनैतिक गोष्टींवर करडी नजर ठेवून जनजागृती करणे, सामाजिक पहारेकरी म्हणून काम करणे, ही त्यांची खरी ओळख आहे.
स्पष्ट, अचूक आणि प्रभावी लिखाण ही त्यांच्या लेखनाची खासियत आहे.
राजकारण असो, समाजकारण असो, शिक्षण किंवा शेती – प्रत्येक विषयात त्यांचा अभ्यास दांडगा आहे.
वैयक्तिक नातेसंबंध आणि माणुसकी माझ्या आयुष्यातील एक मजबूत आधारस्तंभ म्हणजे प्रवीण सावरकर. सुख-दुःखात नेहमी सोबत असणारा मित्र, मार्गदर्शक आणि प्रेरणास्रोत.
प्रामाणिकपणा, मदतीची वृत्ती आणि विनोदबुद्धी यामुळे त्यांच्या भोवती नेहमी सकारात्मक वातावरण निर्माण होते.
तुमच्यासारखा मित्र मिळणे हे खरोखरच भाग्य आहे.
पत्रकाराचा वाढदिवस : एक वेगळा सन्मान,पत्रकारांचा वाढदिवस हा केवळ “हॅपी बर्थडे” म्हणण्यापुरता मर्यादित नसतो. तो त्यांच्या न थांबणाऱ्या समर्पणाचा, धाडसाचा, सत्याच्या शोधातील संघर्षाचा सन्मान असतो. नवीन कथा शोधण्याची उत्सुकता, कठीण प्रश्न विचारण्याचे धैर्य आणि सत्य लोकांपर्यंत पोहोचवण्याची जिद्द या सर्व भावनांचा गौरव करण्याची ही संधी आहे. सत्याचा प्रकाश, समाजासाठी प्रेरणा
तुमचं काम फक्त माहिती देण्यापुरतं मर्यादित नाही, तर लोकांच्या मनात प्रश्न निर्माण करणं हेही तुमचं महत्त्वाचं कार्य आहे. आपण समाजाचे डोळे आणि कान आहात. समाजाच्या हृदयात बसून सत्याचा सूर आणि न्यायाचा उद्घोष करणारे आहात.
विविध आवाजांना मंच देत, दुर्बल वर्गाच्या हक्कासाठी लढत, समाजाला जागृत ठेवण्याचे महान कार्य आपण करत आहात.

*शुभेच्छा…!

तुमच्या लेखणीतून समाजाला दिशा देणारं मार्गदर्शन कायम असो.
तुमच्या कामाने दिलेल्या प्रकाशाप्रमाणे तुमचं आयुष्यही आनंद, समाधान, यश आणि आरोग्याने उजळून निघो.
आपला येणारा काळ सुख, समृद्धी, यशदायी व आरोग्यदायी जावो, हीच सर्व मित्रमंडळींतर्फे वाढदिवसाच्या गोड-गोड हार्दिक शुभेच्छा!

लेखन:
*शेषराव गो. कडू
वरुड जि.अमरावती
09923988734

*लेख प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
 श्रीरामपूर - 9561174111
close