नगर प्रतिनिधी : ( तुषार महाजन )
ज्या सामान्य जनतेने तुम्हाला निवडून दिले आहे, त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होणे हे तुमचे कर्तव्य आहे. जर तुम्हाला लोकांच्या अडीअडचणीला धावून जाता येत नसेल, तर थेट राजीनामे माझ्याकडे आणून द्या, अशा कडक शब्दांत माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी नवनिर्वाचित नगरसेवकांची कानउघाडणी केली आहे. शिर्डी येथे आयोजित एका सत्कार समारंभात ते बोलत होते.
शिर्डी एम्प्लॉईज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या वतीने आयोजित चेक वाटप आणि शिर्डी व राहाता नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगरसेवकांच्या सत्कार सोहळ्यात डॉ. सुजय विखे पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना त्यांनी विजयाचा उन्माद न बाळगता जमिनीवर राहून काम करण्याचा मोलाचा सल्ला नगरसेवकांना दिला.
काय म्हणाले सुजय विखे पाटील?
नवनिर्वाचित नगरसेवकांना मार्गदर्शन करताना सुजय विखे पाटील म्हणाले की, "निवडून आल्यावर केवळ सत्कार, हार-तुरे आणि फटाके फोडून चालणार नाही. पुढची पाच वर्षे तुम्हाला जनतेची सेवा करायची आहे. 'नगरसेवक आम्हाला भेटत नाही', 'दिसत नाही' किंवा 'ओळखत नाही' अशी तक्रार जनतेतून येता कामा नये. ज्यांनी तुम्हाला नगरसेवक बनवले, त्यांच्या सुख-दुःखाच्या प्रसंगी तुम्ही हजर राहिलेच पाहिजे.
ते पुढे म्हणाले, जर काही कारणास्तव तुम्हाला जाणे शक्य नसेल, तर तुमच्या घरच्यांना पाठवा, पत्नीला पाठवा किंवा मुलांना पाठवा. पण जर तुम्हाला जनसंपर्क ठेवणे आणि लोकांच्या सुख-दुःखात सहभागी होणे जमत नसेल, तर तुमचे राजीनामे माझ्याकडे द्या. जनतेमध्ये जर तुमची प्रतिमा चुकीची गेली, तर मी तुमच्यावर नाराज होईन, असा सज्जड इशाराच त्यांनी यावेळी दिला.
गुन्हेगारी खपवून घेणार नाही,
शिर्डीतील शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राखण्याबाबतही त्यांनी यावेळी भाष्य केले. शिर्डीत दादागिरी किंवा गुन्हेगारी खपवून घेतली जाणार नाही. कोणताही कार्यकर्ता गुन्हेगारांच्या सोबत दिसला, तर त्याची गय केली जाणार नाही. शिर्डी आणि राहाता सुरक्षित ठेवणे ही आपली जबाबदारी आहे, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.
या कार्यक्रमास शिर्डी आणि राहाता नगरपालिकेचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक, सोसायटीचे चेअरमन विठ्ठलराव पवार आणि इतर मान्यवर उपस्थित होते. सुजय विखे पाटील यांच्या या 'डॅशिंग' अवतारामुळे आणि कडक शिस्तीच्या धड्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.
*🗞️ बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क करा!*
*📢 बातम्या | जाहिराती | विशेष लेख*
*✍🏻 पत्रकार: तुषार महाजन*
*📞 मोबाईल: 7666675370*
*⭕ “महाराष्ट्राचा” – लोकांचा आवाज, जनतेचा विश्वास!*

