राष्ट्रीय अन्नसुरक्षा व पोषण अभियानांतर्गत दुसरा प्रशिक्षण वर्ग; महिला शेतकरी गटांसह लाभार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग.
प्रतिनिधी | पिंपळे
अमळनेर तालुक्यातील चिमनपुरी पिंपळे येथे राष्ट्रीय अन्नसुरक्षा व पोषण अभियान २०२५-२६ अंतर्गत दुसरा प्रशिक्षण वर्ग उत्साहात पार पडला. मुग-नंतर ज्वारी प्रकल्पा अंतर्गत धरतीमाता महिला शेतकरी गट, ग्रामपंचायत सदस्य व इतर लाभार्थी शेतकऱ्यांना प्रत्यक्ष शिवार भेटीद्वारे आधुनिक शेती तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन देण्यात आले.
सहाय्यक कृषी अधिकारी पूनम पाटील यांनी प्रशिक्षणाचे उद्दिष्ट स्पष्ट करताना, “पोषणसुरक्षिततेसाठी ज्वारीसारखी पिके शेतकऱ्यांसाठी वरदान ठरतील,” असे प्रतिपादन केले.
तर सहाय्यक कृषी अधिकारी महेंद्र पवार यांनी ज्वारीची लागवड, कीड-रोग नियंत्रण, खत व्यवस्थापन व एकात्मिक कीड नियंत्रण यावर सखोल माहिती देत, “योग्य व्यवस्थापन केल्यास ज्वारीतून टिकाऊ उत्पन्न निश्चित मिळू शकते,” असे सांगितले.
कार्यक्रमात उपकृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी प्रफुल्ल पाटील व तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत ठाकरे यांचे मार्गदर्शन लाभले. शेतकऱ्यांच्या कापूस, मका व इतर पिकांबाबतच्या अडचणीही या वेळी जाणून घेण्यात आल्या.
या प्रशिक्षण वर्गाला सरपंच वर्षा पाटील, सीआरपी स्वाती पाटील, धरतीमाता महिला शेतकरी गटाच्या सदस्यांसह सामाजिक कार्यकर्ते युवराज पाटील, रवींद्र पाटील, भैय्या पाटील, गोकुळ पाटील, संतोष चौधरी, पुरुषोत्तम चौधरी आदींसह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.




