शिर्डी | दि. २ | प्रतिनिधी
जिल्ह्याची प्रतिमा मलिन करणाऱ्या आर्थिक घोटाळ्यांतील मुख्य आरोपींपर्यंत पोहोचून, वाढत चाललेला अमली पदार्थांचा विळखा तोडण्यासाठी पोलिसांनी कोणत्याही प्रकारच्या राजकीय दबावाला बळी न पडता कठोर व निर्णायक कारवाई करावी, असे स्पष्ट निर्देश जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.
शिर्डी येथे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जिल्हा पोलीस दलास प्रदान करण्यात आलेल्या २८ नवीन चारचाकी वाहनांच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री विखे पाटील म्हणाले की, बदलत्या काळानुसार गुन्हेगारीचे स्वरूप अधिक गुंतागुंतीचे व तंत्रज्ञानाधिष्ठित झाले असून, गुन्हेगार आधुनिक शस्त्रसामग्री व इंटरनेटचा गैरवापर करत आहेत. या आव्हानांचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी पोलीस दलाचे आधुनिकीकरण ही काळाची गरज आहे. जिल्ह्यातील विविध आर्थिक घोटाळ्यांमुळे जिल्ह्याची बदनामी होत असून, अशा प्रकरणांतील मुख्य सूत्रधारांपर्यंत पोहोचण्यासाठी पोलीस यंत्रणेने विशेष प्रयत्न करावेत. कोणत्याही दबावाला किंवा उपोषणासारख्या बाबींना न घाबरता सामान्य नागरिकांची फसवणूक करणाऱ्या आर्थिक गुन्हेगारांवर तात्काळ व कठोर कारवाई झालीच पाहिजे, असे त्यांनी ठणकावून सांगितले.
श्रीरामपूर येथे घडलेली गोळीबाराची घटना तसेच देशविघातक कृत्य करणाऱ्या आरोपींच्या समर्थनार्थ जमणारा जमाव ही बाब समाजासाठी अत्यंत चिंताजनक असल्याचे नमूद करून, गुटखा व इतर अवैध व्यवसायातून येणारा पैसा गुन्हेगारीला बळ देत असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यात वाढत चाललेला अमली पदार्थांचा प्रसार व बेकायदेशीर शस्त्रांचा वावर रोखणे अत्यंत गरजेचे असून, जिल्ह्याला गुन्हेगारीमुक्त करण्यासाठी आवश्यक आधुनिक साधनसामग्री व यंत्रणा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा नियोजन निधीतून तत्काळ मदत केली जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
ते पुढे म्हणाले की, शासनाचा भर केवळ पोलीस दलाला वाहने देण्यापुरता मर्यादित नसून, पोलिसांच्या व त्यांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षिततेसाठी निवासस्थानांचा प्रश्नही प्राधान्याने सोडविला जात आहे. अहिल्यानगर शहरात सुमारे ३२२ कोटी रुपये खर्चाचे पोलीस निवासस्थान संकुल उभारण्यात येत आहे. तसेच सायबर गुन्ह्यांचा शोध घेण्यासाठी सर्व तालुक्यांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यासाठी निधी मंजूर करण्यात आला असून, उपविभागीय स्तरावर अत्याधुनिक ‘कमांड सेंटर’ उभारण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले. समृद्धी महामार्ग व इतर राष्ट्रीय महामार्गांवर अपघात झाल्यास तात्काळ मदत पोहोचविण्यासाठी या नवीन वाहनांचा मोठा उपयोग होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे म्हणाले की, मुंबई वगळता राज्यात सर्वाधिक, म्हणजे दरवर्षी सुमारे १७ हजार गुन्हे अहिल्यानगर जिल्ह्यात नोंदविले जातात, जे पुणे व नागपूर शहरांपेक्षाही अधिक आहे. जिल्ह्याचा मोठा भौगोलिक विस्तार तसेच शिर्डी व शनिशिंगणापूरसारखी महत्त्वाची तीर्थक्षेत्रे लक्षात घेता, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी ही वाहने अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत. विशेषतः महिलांच्या सुरक्षिततेसाठी तसेच ‘११२’ आपत्कालीन क्रमांकावर येणाऱ्या कॉल्सना त्वरित प्रतिसाद देण्यासाठी या वाहनांचा मोठा लाभ होईल, अशी माहिती त्यांनी दिली. ‘महाराष्ट्र पोलीस स्थापना दिना’निमित्त पोलीस दल जनसेवेसाठी कटिबद्ध असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली.
जिल्ह्यात कोपरगाव व पाथर्डी येथील नवीन पोलीस ठाण्यांची बांधकामे पूर्ण झाली असून, राहाता, नेवासा व राहुरी येथील कामे प्रगतीपथावर आहेत. तसेच श्रीगोंदा व श्रीरामपूर येथील कामांना गती मिळाल्याने पोलीस प्रशासनाच्या पायाभूत सुविधांमध्ये लक्षणीय भर पडणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी केले. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती, उपविभागीय महसूल अधिकारी माणिक आहेर, शिर्डी नगराध्यक्षा जयश्री थोरात, तहसीलदार अमोल मोरे, मुख्याधिकारी सतीश दिघे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

