श्रीरामपूर : (वार्ताहर)
नुकत्याच पार पडलेल्या ऑल इंडिया बार एक्झामिनेशन परीक्षेत श्रीरामपूर येथील अॅड. प्रज्ञा सुधाकर बागुल यांनी नेत्रदीपक यश संपादन करून शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. एलएलबी पदवी पूर्ण केल्यानंतर अवघ्या दोन वर्षांत ही प्रतिष्ठित परीक्षा उत्तीर्ण करत त्यांनी आपली गुणवत्ता व चिकाटी सिद्ध केली आहे.
मान्यताप्राप्त संस्थेतून तीन किंवा पाच वर्षांचा कायद्याचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर न्यायशास्त्र, संविधानिक व्यवस्था, पर्यावरण कायदा, कंपनी, श्रम व औद्योगिक कायदे, मोटार वाहन अधिनियम, उपभोक्ता संरक्षण, भूमि अधिग्रहण, बौद्धिक संपदा, काळाधन तसेच प्रशासकीय व्यवस्था या विषयांवर आधारित लेखी स्वरूपाची ही परीक्षा वर्षातून एकदाच घेतली जाते. सदर परीक्षा ३० नोव्हेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथे पार पडली होती.
ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर देशातील कोणत्याही राज्यात वकिली व्यवसाय करण्याचा अधिकृत अधिकार मिळतो. अॅड. प्रज्ञा बागुल या शं. स. डावखर कन्या शाळेचे सेवानिवृत्त शिक्षक सुधाकर बागुल आणि बोम्बले पाटील नगर येथील महिलाघरगुती उद्योजिका प्रमिला बागुल यांची कन्या आहेत.
कष्ट, शिस्त आणि सातत्याच्या जोरावर मिळवलेल्या या यशाबद्दल परिसरातून त्यांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत असून, त्यांचा हा प्रवास नवोदित वकिलांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

