श्रीरामपूर | प्रतिनिधी
श्रीरामपूर येथील वार्ड क्रमांक ७ मधील भारतीय स्वाभिमानी महिला युनिटने एकत्र येत राजमाता जिजाऊ यांच्या ४२८ व्या जयंतीचे औचित्य साधून तसेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९५ व्या जयंतीनिमित्त आगळ्या-वेगळ्या पद्धतीने प्रेरणादायी उपक्रम सादर केला.
या कार्यक्रमात राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर, फातिमाबी शेख, माता रमाई आणि महाराणी ताराराणी या महानायिकांच्या संघर्षमय व प्रेरणादायी इतिहासाची ओळख करून देणाऱ्या पुस्तकांचे हळदीकुंकू समारंभात देवाणघेवाण करण्यात आली. महिलांनी केवळ परंपरा जपत नव्हे, तर विचारांची देवाणघेवाण घडवून आणत समाजाला नवदृष्टी देणारा संदेश दिला.
या अनोख्या उपक्रमाचे परिसरातून मोठ्या प्रमाणावर कौतुक करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जयश्री जाधव, वर्षा धिवर, प्रमिला बागुल, मीरा पटारे आदींनी सक्रिय सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे नियोजन अॅड. कु. प्रज्ञा बागुल यांनी केले, तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. राजेश हिवराळे सर यांनी प्रभावीपणे केले.
महिला सक्षमीकरण, इतिहासाची जाणीव आणि विचारांची समृद्धी या त्रिसूत्रीवर आधारित हा उपक्रम श्रीरामपूरच्या सामाजिक जीवनात एक प्रेरणादायी आदर्श ठरला आहे.

