shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मुंबईत काँग्रेसला मिळालेले यश समाधानकारक, विपरित परिस्थितीतही कार्यकर्ते निर्धाराने लढले व जिंकले - सचिन सावंत

ऑपरेशन कमळची भिती आता भाजपाच्या मित्रपक्षांना, विजयी नगरसेवक लपवण्याची शिंदेसेनेवर वेळ..

जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार - नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.

 महानगरपालिका निवडणुकीत सत्ताधारी महायुतीने पोलीस, प्रशासन व निवडणूक आयोगाच्या जोरावर साम, दाम, दंड, भेद नितीचा मोठ्या प्रमाणात वापर केलेला असतानाही काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते निर्धाराने व न डगमगता लढले व विजय मिळवला. अत्यंत विपरीत परिस्थितीत झालेल्या या निवडणुकीत काँग्रेसला मुंबईत मिळालेले यश मोठे नसले तरी समाधानकारक आहे. आगामी काळात पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यावर भर देऊ, असे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व मुंबई काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटले आहे.
राजीव गांधी भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना सचिन सावंत म्हणाले की, भारतीय जनता पक्ष विरोधी पक्षांना संपवण्याचे काम करत आहे. विरोधी पक्षातील उमेदवार पळवणे, पक्ष फोडणे, विरोधी पक्षाला कोणतीच मदत मिळू नये, निधी मिळू नये असे सर्व प्रकार सत्ताधारी भारतीय जनता पक्षाकडून करण्यात आले. अनैतिक वातावरणातही काँग्रेस पक्ष, पक्षाचे कार्यकर्ते तग धरून उभे राहिले, निकराने लढले. काँग्रेसने १५२ उमेदवार उभे केले होते त्यातील २४ निवडून आले आहेत.

महानगरपालिका निवडणुकीतील या निकालाने काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा हुरुप ढलेलेला नाही, हा विजय ऊर्जा देणारा आहे, पुन्हा नव्या ताकदीने व जिद्दीने लढू, आम्ही कुठे कमी पडलो, याचा विचार करू तसेच निकालाचे विश्लेषण करु. लोकशाही व संविधान वाचवण्याची लढाई यापुढेही लढत राहू.

ऑपरेशन कमळ करुन भाजपाने विरोधी पक्ष फोडले पण आता या ऑपरेशन कमळची भिती भाजपाच्या मित्रपक्षांनाही वाटू लागली आहे. ऑपरेशन कमळच्या भितीनेच एकनाथ शिंदे यांना त्यांच्या पक्षाचे विजयी नगरसेवक लपवावे लागत आहेत, असेही सचिन सावंत म्हणाले..

एका प्रश्नाला उत्तर देताना सचिन सावंत म्हणाले की, वंचित बहुजन आघाडी संदर्भात जो आरोप केला जात आहे तो चुकीचा आहे, त्यांना हव्या असेलल्या जागा दिल्या, त्यांना उमेदवार मिळाले नाहीत, काही जागांवर मैत्रिपूर्ण लढावे लागले. दोन्ही बाजूकडून अधिक चांगल्या प्रकारे नियोजन झाले असते तर अधिक चांगले झाले असते, असे सचिन सावंत म्हणाले.
close