अकोले प्रतिनिधी:-
अकोले तालुक्यातील कळस बु. येथील जुन्या पिढीतील वारकरी संप्रदाय व सहकारी क्षेत्रातील ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व ह. भ. प. शंकर भाऊ वाकचौरे यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय ९५ वर्षे होते.
शंकर भाऊ वाकचौरे हे गाव पंचायतचे पंच म्हणून कार्यरत होते. तसेच कळस सोसायटीचे ते माजी व्हाइस चेअरमन होते. विठ्ठलाचे निस्सीम भक्त असलेले शंकर भाऊ कळसेश्वर भजनी मंडळाचे सक्रिय सदस्य होते. गावात दरवर्षी साजरा होणाऱ्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या आयोजनात व यशस्वीतेत त्यांचा मोलाचा सहभाग असायचा. वारकरी संप्रदायाची शिकवण, भक्तीभाव व सामाजिक सलोखा जपण्यासाठी त्यांनी आयुष्यभर कार्य केले.
त्यांच्या पश्चात एक मुलगा जालिंदर वाकचौरे, नातू प्रगतशील शेतकरी माधव वाकचौरे, कळंबादेवी प्रतिष्ठानचे सदस्य लक्ष्मण वाकचौरे, सुनील वाकचौरे, नात कनोलीच्या माजी उपसरपंच अर्चना वर्पे, सुन, नातवंडे व पतवांडे असा मोठा परिवार आहे.
कळस येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद अर्थ व बांधकाम समितीचे माजी सभापती कैलासराव वाकचौरे, भाजपा जिल्हा सरचिटणीस सिताराम भांगरे, जिल्हा उपाध्यक्ष काशीनाथ पावसे, अमृतवाहिनी बँकेचे संचालक शिवाजी वर्पे, संगमनेर साखर कारखान्याचे संचालक अरुण वाकचौरे, अगस्ती साखर कारखान्याचे संचालक सीताराम वाकचौरे, भाजपा नेते भाऊसाहेब वाकचौरे, अकोले कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक ईश्वर वाकचौरे, मनोहरपूरचे पोलिस पाटील चंद्रभान भांगरे यांच्यासह परिसरातील नागरिक, वारकरी व विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शंकर भाऊ वाकचौरे यांच्या निधनाने एक निष्ठावंत वारकरी, समाजसेवक आणि मार्गदर्शक व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.

