एरंडोल -- तालुक्यातील तळई गावात शिवआर्मी ग्रुप तळई व वैचारिक स्वराज्य सामाजिक संस्था फरकांडे यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब, क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले आणि युगपुरुष स्वामी विवेकानंद यांचा संयुक्त जयंती महोत्सव गावाच्या इतिहासात कायम स्मरणात राहील असा ठरला.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, तळई गावात मागील वर्षाभरापासून बहुजन महापुरुषांची विचारधारा जनमानसात रुजविण्यासाठी गावातील शिवआर्मी ग्रुप व वैचारिक स्वराज्य ग्रुप सातत्याने कार्यरत आहे. शिव आर्मी व वैचारिक स्वराज्य ग्रुप तळई यांच्या माध्यमातून जिजाऊ - सावित्री व स्वामीजींचा संयुक्त जयंती उत्सवानिमित्त ज्ञान - विचार व प्रबोधनाचा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाच्या सुरुवातिला तळई माध्यमिक विद्यालयाच्या इयत्ता सातवी ‘अ’ मधील उन्नती, दिव्या, दिव्यानी, नंदिनी व भाविका या चिमुकल्या विद्यार्थिनींनी सादर केलेल्या अत्यंत भावपूर्ण ‘जिजाऊ वंदना’ ने झाली त्याक्षणी संपूर्ण परिसर भारावून गेला. वैचारिक स्वराज्यचे संस्थापक ह.भ.प. दिनेश महाराज पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकातून या संयुक्त जयंतीमागील विचार, उद्देश आणि सामाजिक बांधिलकी अत्यंत प्रभावी शब्दांत मांडली. त्यानंतर उपस्थित सर्व मान्यवरांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या पावन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी पद्मालय मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष तथा माजी सभापती ॲड. अनंतराव पाटील उपस्थित होते ही अतिशय गौरवाची बाब ठरली. प्रमुख अतिथी म्हणून संभाजी ब्रिगेडचे कार्याध्यक्ष लक्ष्मणराव पाटील, माजी जि.प. उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले उपस्थित होते. कार्यक्रमात मनोगत व्यक्त करतांना व्याख्याते राकेश पाटील सर यांनी आपल्या ओघवत्या शैलीतून शिवविचार, राष्ट्रभावना व इतिहासाचे महत्त्व अत्यंत सुंदर रीतीने उलगडून सांगितले. खडके येथील माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र टी. पाटील यांनी कार्यक्रमास शुभेच्छा देत आमच्या भावी वाटचालीसाठी मनःपूर्वक आशीर्वाद दिले.
व्याख्याते लक्ष्मणराव पाटील यांनी सांगितले की, महापुरुष व महामातांनी बहुजन समाजाच्या उद्धारासाठी समतेची चळवळ चालवली. शिवबा घडण्यासाठी आधी जिजाऊ जन्मल्या पाहिजेत, सावित्रीच्या पाठीशी ज्योतीराव उभे राहिले पाहिजेत आणि सक्षम युवक घडण्यासाठी विवेकानंद कळले पाहिजेत, असे प्रतिपादन श्री पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभलेले एक उत्तम कीर्तनकार, अभ्यासू वकील, संवेदनशील राजकारणी, पद्मालय देवस्थानाचे ज्येष्ठ विश्वस्त, एडव्होकेट आनंदराव नामदेवराव पाटील तळईकर ८६ वर्षांचे आयुष्य जगलेले
एक चालतेबोलते विद्यापीठ यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून समाजाला जीवनमूल्यांचा अमूल्य संदेश दिला. पैसा हे साधन आहे, साध्य नाही. आयुष्यभर माणुसकी जपा, व्यसनमुक्त रहा आणि मन निर्मळ ठेवा…” हे शब्द ऐकतांना संपूर्ण सभागृह स्तब्ध झाले होते. अनेकांच्या डोळ्यांत पाणी होते आणि अंगावर अक्षरशः शहारे उभे राहिले होते. अध्यक्षीय मनोगतानंतर शालेय स्तरावर विविध गटांची जी सामान्य ज्ञान स्पर्धा घेण्यात आल्या होती तिचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये प्रथम - द्वितीय व तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र तसेच उत्तेजनार्थ आलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व स्कुल पॅड देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजक यशवंत खुशाल पाटील तळईकर व ह.भ.प. दिनेश महाराज पाटील फरकांडेकर यांनी भूमिका बजावली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तळई ग्रा.पं. सरपंच, उपसरपंच व ग्रा.पं. सदस्य यांच्यासह शिव आर्मी ग्रुप तळई व वैचारिक स्वराज्य सामाजिक संस्था फरकांडे यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व युवक मित्र परिवार आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे अतिशय बहारदार शैलीत सूत्रसंचालन प्रकाश तामस्वरे सरांनी केले. कार्यक्रमाची सांगता जगाला विश्वबंधुत्वाचा संदेश देणाऱ्या पसायदानाने झाली. कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर विद्यार्थी, अतिथी व सर्व उपस्थित मान्यवरांसाठी संत सावता महाराज मंदिरात भोजन व्यवस्था करण्यात आली होती. या प्रबोधन कार्यक्रमाला तळई गावातीत महिला भगिनी - पुरुष बांधव - विद्यार्थी - अबालवृद्ध - ग्रामस्थ यांची लक्षणीय उपस्थिती होती.




