shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आयुष्यातले सांगाती ४६ - नीतिन केळकरज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत


जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार - नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.

नितीन केळकर हे नाव वैदर्भीयांना परिचित झाले ते १९७८ ते १९८० च्या दरम्यान. नितीन त्यावेळी दररोज संध्याकाळी आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून संध्याकाळच्या प्रादेशिक बातम्या वाचायचा. त्याचा हा सिलसिला १९८६ पर्यंत सुरू होता. नंतर नितीन मुंबईला गेला आणि नागपूर आकाशवाणी वरून त्याचा आवाज लोकांपर्यंत पोहोचणे बंद झाले होते. 

नंतर नितीन चे नाव साधारणपणे १९९४ पासून मुंबई दूरदर्शनवर येऊ लागले, तेव्हापासून नितीन केळकर हे नाव संपूर्ण महाराष्ट्रालाच परिचित झाले. मुंबई दूरदर्शनचा वृत्तसंपादक म्हणून नितीन तिथे कार्यरत झाला होता. त्याच काळात मराठी व्यंग कविता करणारा कवी म्हणूनही तो समोर येऊ लागला होता. 

माझा नितीनचा परिचय झाला तो साधारणपणे १९७८-७९ च्या दरम्यान. त्यावेळी मी मुंबई दूरदर्शनचा वृत्त छायाचित्रकार म्हणून कार्यरत होतो. त्यावेळी नागपुरात दूरदर्शन नव्हते. मग बातम्यांच्या संदर्भात माहिती घेणे आणि संपूर्ण विदर्भाचा काय हालहवाल आहे ते बघण्यासाठी मी मग दररोज आकाशवाणीच्या नागपूर केंद्रातील वृत्त विभागात चक्कर मारत असे. त्यावेळी तिथे कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या वृत्त निवेदकांशी माझा परिचय झाला आणि हळूहळू आमची चांगलीच मैत्री जमली. त्यातच नितीन एक होता. नितीन वयाने माझ्यापेक्षा चार-पाच वर्षांनी लहानच असावा. मात्र वयातले हे अंतर मैत्रीत कुठेही आडवे आले नाही. 

आकाशवाणीतले काम संध्याकाळी असायचे त्यावेळी दुपारी नितीन महाविदर्भ नावाच्या दैनिकात उपसंपादक म्हणून काम करत असे. नंतर नागपुरात सुरू झालेल्या नागपूर  पत्रिका या दैनिकात तो रुजू झाला. मग त्या काळात आमच्या नियमित भेटीगाठी होत असत. त्यावेळी आकाशवाणीत कॅप्टन विनायक तांबेकर नामक वृत्त वार्ताहर म्हणून सक्रिय होते, तर श्रीपाद दामले हे संपादक म्हणून सक्रिय होते. दोघेही वयाने आमच्यापेक्षा ज्येष्ठ होते. तरीही आमच्याच वयाचे होऊन ते वागत असत. त्यामुळे कधीच आम्हाला त्यांचा अवास्तव धाक वाटला नाही, किंबहुना त्यांचे मार्गदर्शनच मिळत असे. त्यावेळी तिचे नितीन प्रमाणेच कंत्राटी पद्धतीवर काम करणारे यशपाल रामावत हर्षवर्धन निमखेडकर माया वाघ असे सगळे तरुण पत्रकार कार्यरत होते. आमचा छान ग्रुप जमला होता. त्याच काळात नितीन मराठीत व्यंग कविता करायचा. तेव्हा व्यंग कविता हा प्रकार हिंदीत रूढ होता. मात्र मराठीत ती सुरुवातच होती. मग नागपूर आकाशवाणी समोरच्या चहाच्या टपरीवर बरेचदा नितीन आम्हाला नव्या नव्या व्यंग कविता ऐकवायचा. माया वाघाचे लग्न १९८५ मध्ये पुण्याला झाले होते. तिथेही आम्ही सोबतच गेल्याचं मला आठवते. 

नितीन हा पत्रकार कवी तर होताच, पण त्याचबरोबर तो उत्तम वक्ता देखील आहे. त्या काळात अगदी तरुण वयात देखील नितीन विद्यार्थी परिषदेच्या वतीने विविध कार्यक्रमांमध्ये वक्ता म्हणून जात असे. त्यामुळे त्याच्या व्यक्तिमत्त्वाला एक वेगळीच झळाळी आलेली जाणवत होती. 

याशिवाय नितीनचा स्वभावातला आणखी एक गुण असा होता की सर्वांना धावून मदत करणे. त्यावेळी नितीन इथे एका मित्रासोबत खोली घेऊन राहत होता. त्याचे आई-वडील माझ्या आठवणीप्रमाणे खामगावला होते, मात्र इथे नागपुरात कोणत्याही मित्राला काहीही अडचण आली तरी मदत करायला नितीन कायम सज्ज असायचा.(आजही असतो )बरेचदा फिरत फिरत नितीन धरम पेटला आला की तिथे असलेल्या माझ्या स्टुडिओत हमखास यायचा. मग समोरच्या संगम रेस्टॉरंटच्या लालाजी कडे सोबत दही समोसा खाऊन आमची गप्पांची मैफिल रंगत असे. 

१९८६ च्या दरम्यान नितीनने नागपूर सोडले. त्याला केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या प्रकाशन विभागात नोकरी मिळाली होती. त्यामुळे तो नागपूर सोडून मुंबईत गेला होता. मग आमच्या भेटी एकदम कमी झाल्या. दरम्यान त्याची निवड केंद्र सरकारच्या केंद्रीय माहिती सेवा या खात्यामध्ये झाल्याचेही कळले. मग या खात्यातून त्या खात्यात त्याच्या बदल्या होत आहेत अशीही माहिती मिळायची. मात्र प्रत्यक्ष भेट नव्हती. 

याच दरम्यान दूरदर्शन मध्ये बरेच बदल झाले होते. आधी दूरदर्शनचे सर्व चित्रीकरण सेल्युलोईड फिल्म वर होत असे. नंतर ते युमॅटिक व्हिडिओ कॅसेटवर होऊ लागले. ते कॅमेरे खूप महाग होते. मग दूरदर्शनने त्याच्या निर्मितीसाठी देशभरातून काही निवडक छायाचित्रकारांना असे कॅमेरा आणि एडिटिंग युनिट्स देण्यासाठी एक योजना आखली. त्या योजनेत माझी देखील निवड झाली होती. मात्र अर्थसाह्य करणाऱ्या बँका, महाराष्ट्र शासन आणि केंद्रशासन यांच्यात सुसंवाद नसल्याने माझा तो प्रकल्प प्रचंड रेंगाळला. त्यादरम्यान मी सतत मुंबईला चकरा मारत असे. तेव्हा एक दोनदा फोर्ट परिसरात नागपूरचा आणखी एक पत्रकार चंदू जोशी सोबत नितीनची दोन-तीनदा ओझरती भेट झाली होती. मात्र पूर्वीसारख्या गप्पा होत नव्हत्या. 

१९९३-९४ च्या दरम्यान अचानक मुंबई दूरदर्शनच्या बातम्या  बघताना अचानक स्क्रीनवर वृत्तसंपादक म्हणून नितीन केळकर चे नाव दिसू लागले. मग मी माहिती घेतली असता केंद्रीय माहिती सेवेचा अधिकारी असल्यामुळे त्याची  मुंबई दूरदर्शनमध्ये बदली झाली आहे, असे कळले. अचानक एक दिवस नीतींनचा मला मुंबईहून फोन आला. दूरदर्शनच्या यादीत अजूनही नागपूरचा छायाचित्रकार म्हणून तुझं नाव आहे, आणि  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तत्कालीन सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांचा एक कार्यक्रम कव्हर करून त्याचे चित्रीकरण मुंबई दूरदर्शन ला हवे आहे, तेव्हा तू ती सोय करून दे, असे त्याने मला सुचवले. मात्र त्यावेळी आवश्यक असा कॅमेरा माझ्याजवळ नव्हता. मग आहे त्या परिस्थितीतून मार्ग काढून हे काम कसे करता येईल यावर आमचा खल झाला आणि ते चित्रीकरण नितीनला मी मॅनेज करून दिले होते. मग लगेचच मी मुंबईला गेलो असताना दूरदर्शन केंद्रात जाऊन नितीनला भेटलो. तेव्हापासून मग पुन्हा आमचा नियमित संपर्क सुरू झाला होता.  त्या दरम्यान तो नागपुरात आल्यानंतर देखील आमची भेट झाली होती.

याच काळात दूरदर्शनच्या  वृत्त छायाचित्रकारांच्या यादीत माझे नाव असल्यामुळं मी पुन्हा दूरदर्शन साठी वृत्त संकलनाचे काम सुरू करावे यासाठी  नितीन आग्रही होता. मात्र आता माझ्याकडे दूरदर्शनला नव्या तंत्रज्ञानावर आधारित लागणारा कॅमेरा उपलब्ध नव्हता. मग नितीनने मुंबईतूनच काही छायाचित्रकारांशी माझा संपर्क देखील करून दिला. तो त्या बाबतीत बराच उत्साही होता मात्र त्यावेळी ते जमू शकले नाही.

१९९५ पासून मी माझे एक आमदार मित्र चैनसुख संचेती यांच्या प्रसिद्धीचे आणि विधिमंडळातील तयारीचे कामकाज सांभाळून देत होतो. त्यासाठी मग मी नितीन ला भेटलो त्याने मला पूर्ण सहकार्य करण्याचे मान्य केले. मुंबईतील सर्व पत्रकार मित्रांशी माझा संपर्क नितीननेच करून दिला. त्यावेळी त्याचाच नातेवाईक असलेला अनिल  मोहरिल हा नागपूर तरुण भारत मुंबईतील प्रतिनिधी म्हणून कार्यरत होता (दुर्दैवाने पुढे अनिलचे अकाली निधन झाले) तो ठाण्याला नितीनच्याच घरी राहायचा. नितीन आणि अनिलच्या मदतीने संचेतींची त्या काळात भरपूर प्रसिद्धी केली. तेव्हा मी मुंबईत दादरला रानडे रोडवरील हॉटेलमध्ये ब्ल्यूजेम मध्ये उतरत असे. बरेचदा काम आटवून आटोपून मी संध्याकाळचा वरळी दूरदर्शन केंद्र केंद्रात गप्पा मारायला जाऊन बसत असे. मग रात्री नऊ वाजता नितीनचे काम आटोपले की आम्ही निघत असू आणि रस्त्यातल्याच एखाद्या रेस्टॉरंटमध्ये रात्री गप्पा मारत जेवण घेत असू. मग तिथून दादर स्टेशनवर जाऊन नितीन ठाण्याची लोकल पकडत असे, आणि मग तो ठाण्याला रवाना होत असे. 

दरवर्षी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात नितीन नागपूरला मुक्कामी येत असे. त्यावेळी मग रोज आमच्या कुठेतरी गप्पा रंगत असत. चार मित्र जमले की नितीनला व्यंग कविता ऐकवण्याचा आग्रह होत असे. एकदा सुरू केले की नितीन त्यात रंगून जायचा. एकदा मला आठवते हॉटेल सेंटर पॉईंट मध्ये एका आमदार मित्राने स्नेहभोजन आयोजित केले होते. जेवणानंतर सर्वांनीच नितीनला आपल्या कविता ऐकवण्याचा आग्रह केला. मग नितीन एक एक कविता ऐकवायला लागला आणि रात्री बराच वेळ ती मैफल रंगत गेली. हवाला भूखंड फोन आणि युरिया, पशुखाद्य संपले आता जोडेच खाऊया ही त्या काळातल्या राजकीय भ्रष्टाचारावर टीका करणारी कविता त्या दिवशीच नाही तर त्या अधिवेशनात सर्वांच्या चर्चेचा विषय ठरले होती.

त्या काळात चैनसुख संचेतींच्या विधिमंडळ कामकाजासोबत मी दोन वृत्तपत्रांसाठी विधान परिषदेत वृत्त संकलन देखील करत असे. ते बघून मला नितीनने दूरदर्शनसाठी विधिमंडळाचे समालोचन कसे लिहावे ते शिकवले आणि तेव्हापासून पुढली अनेक वर्षे प्रत्येक अधिवेशनात विधिमंडळाचे विधान परिषदेचे समालोचन किमान एक आठवडा तरी मी करत असे. त्या निमित्ताने मला आर्थिक लाभही होत असे आणि संपूर्ण महाराष्ट्रात आठ दिवस नियमितपणे माझे नावही पोहोचत असे. दूरदर्शनवर मी करू लागलो ते बघून मग आकाशवाणीने देखील मला समालोचन देणे सुरू केले होते. हा नितीनच्या मैत्रीचाच मला फायदा मिळाला होता. 

मला आठवते २००० च्या हिवाळी अधिवेशनात नितीन आणि त्यावेळेस दूरदर्शनचे मुख्य निर्माते वृत विभाग कर्नल विनायक तांबेकर नागपुरात आले होते. एक दिवस संध्याकाळी मी, नितीन, कर्नल तांबेकर आणि आमचे एक कॉमन मित्र शरद पाटील असे एका हॉटेलमध्ये जेवायला गेलो होतो. तिथे देखील शरद पाटलांनी आग्रह केल्यामुळे नितीन आपल्या कविता सुरू केल्या. त्यावेळी आजूबाजूच्या टेबलवरचे काही रसिक श्रोते  इतकेच काय पण हॉटेलमध्ये काही रसिक वेटर देखील ऐकायला येऊन उभे राहिले होते.

याच काळात नितीन मराठी व्यंग कविता करणारा ख्यातनाम कवी म्हणून ओळखला जाऊ लागला होता. रामदास फुटाणे, अशोक नायगावकर अशा मंडळींच्या बैठकीत तो नियमितपणे खुले कार्यक्रम देखील सादर करू लागला होता. त्यामुळे एक सेलिब्रिटी म्हणून त्याला हळूहळू मान्यता मिळायला लागली होती.

२००१ मध्ये दूरदर्शनवर नव्याने वृत्त छायाचित्रकार नियुक्त करण्याची प्रक्रिया सुरू झाली. त्यावेळी मी प्रयत्न करावे असे नितीनने सुचवले. मी त्यानुसार अर्ज देखील केला. मात्र त्यावेळी इतर अधिकाऱ्यांचे  सहकार्य न मिळाल्यामुळे माझे काम होऊ शकले नाही.

२००२ नंतर कौटुंबिक कारणांमुळे मी चैनसुख संचेतींचे काम थांबवले. त्यामुळे मुंबईला अधिवेशनात जाणे माझे बंद झाले. तरीही नागपूर अधिवेशनात आमची भेट व्हायची. च मात्र २००२ किंवा २००३ मध्ये नीतिनची देखील दूरदर्शन मधून आकाशवाणीत बदली झाली. मग आकाशवाणीच्या बातम्यांसाठी आमचा संपर्क सुरू झाला.

२००४ मध्ये अनिल मोहरिल याचे अकाली निधन झाले. त्यावेळी नितीन नागपूरला आला होता. तेव्हा तो चांगलाच दुखावलेला होता. अनिल नागपूरला देखील नीतिनची थोरली बहीण वंदनाताई यांच्याच घरी राहत होता. नंतर वंदनाताई नितीन आणि आम्ही काही मित्रांनी मिळून अनिलच्या नावे एक ट्रस्ट उभारून पत्रकारांसाठी कार्यक्रम घेण्याचे ठरवले. त्यानुसार मग २००६ मध्ये अनिलच्या स्मृती प्रित्यर्थ पृष्ठ पत्रकारिता पुरस्काराने प्रदान केला होता. २००७ मध्ये अनिलच्या स्मृती प्रित्यर्थ नागपुरात आम्ही पत्रकार भवन ट्रस्टच्या मदतीने दोन दिवसांची एक निवेदनाची कार्यशाळा आयोजित केली होती. त्यावेळी नितीन पुढचे दोन दिवस देखील नागपुरातच मुक्कामी होता. या कार्यशाळेच्या समारोपाला ख्यातनाम पत्रकार डॉ. विश्वास मेहंदळे हे आले होते. दुसऱ्या दिवशी रात्री मेहंदळेंसोबत माझ्याच घरी स्नेहभोजन आयोजित केले होते. त्याला नितीन सहकुटुंब आला होता. त्यावेळी मग डॉ. मेहंदळे, नितीन  विंग कमांडर अशोक मोटे अशा आमच्या छान गप्पा रंगल्या होत्या. त्या दिवशी देखील  त्याचे नितीनचे काव्य गायन झाले होते. 

माझ्या आठवणीनुसार २००८-०९ च्या दरम्यान नितीन पुन्हा दूरदर्शन ला वृत्त विभागात कार्यरत झाला. तिथे तो जवळ जवळ २०१२ पर्यंत कार्यरत होता. त्या काळात सपट परिवार महाचर्चा नामक चर्चेचा कार्यक्रम दूरदर्शनवर होत असे. त्याचे संचालन नितीनच करायचा. त्यामुळे तो पुन्हा एकदा महाराष्ट्रात घरोघरी पोहोचला होता. त्या काळात मी काही कामाने मुंबईत गेलो की पुन्हा आमच्या भेटी व्हायच्या ,आणि गप्पा रंगायच्या. मी पुन्हा दूरदर्शन छायाचित्रकार म्हणून सक्रिय व्हावे म्हणून त्याचा आग्रह होता. मात्र ते शक्य होत नव्हते. 

२००९ मध्ये मे .महिन्यात नागपुरात नितीनचा मुक्काम होता एक दिवस सकाळी तो माझ्या घरी बसला असतानाच टीव्हीवर विख्यात साहित्यिक राम शेवाळकर यांचे निधन झाल्याचे वृत्त आले. लगेचच माझ्याच कारने मी आणि नितीन शेवाळकरांकडे पोहोचलो. नीतीनने लगेचच दूरदर्शनशी मुंबईत संपर्क साधून रात्री बातम्या नंतर शेवाळकरांवर विशेष कार्यक्रमाचे नियोजन नागपूरतूनच केले होते. त्यासाठी आम्ही मग अंबाझरी घाटावर शेवाळकरांवर अंत्यसंस्कार चालू असतानाच विविध मान्यवरांच्या शेवाळकरांना श्रद्धांजली वाहणाऱ्या रेकॉर्डिंग्ज केल्या होत्या आणि त्या लगेचच मुंबईला पाठवल्या होत्या. त्या दिवशी रात्री साडेनऊ वाजता तो कार्यक्रम प्रक्षेपितही झाला होता. 

२०१२ मध्ये नितीन पुन्हा मुंबई दूरदर्शन मधून पुणे आकाशवाणी बदलून गेला. मग निवृत्त होईपर्यंत तो पुण्यातच होता. २०१३ मध्ये त्याच्या मोठ्या मुलीचे लग्न झाले. डोंबिवलीत तो विवाह सोहळा होता. त्यासाठी आग्रहाचे निमंत्रण घेऊन  नितीनच्या सौभाग्यवती निरजा वहिनी घरी आल्या होत्या. मग मी देखील त्या लग्नासाठी डोंबिवलीत गेलो होतो. 

नंतर नितीन नागपूरला आला की आमची हमखास भेट व्हायची. त्याच्या भाचीच्या लग्नातही आमची भेट झाली होती. एरवी फोनवर आमचा संपर्क असायचाच. मी देखील पुण्यात गेलो की त्याच्याशी भेटण्याचा माझा प्रयत्न असायचा.

नितीन सुरुवातीपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक होता. त्यामुळे संघ विचारांशी त्याची बांधिलकी, त्यातूनच तो विद्यार्थी परिषदेत देखील सक्रिय झाला होता. पुणे आकाशवाण्यातून माझ्या आठवणीनुसार २०२१ मध्ये तो निवृत्त झाला आणि ठाण्यात येऊन स्थायिक झाला. ठाण्यात आल्यावर तो राष्ट्रीय स्वयंसेवक  संघाशी संबंधित असलेल्या अखिल भारतीय साहित्य परिषदेचे काम करू लागला.

मी देखील संघाशी संबंधितच आहे आणि संघाशी संबंधित विविध संघटनांमध्ये मी देखील सक्रिय असतो, हे नितीनला माहीत होते. २०२२ च्या फेब्रुवारीमध्ये एक दिवस नितीनचा मला अचानक फोन आला. सध्या तुझ्याकडे संघाची कोणती जबाबदारी आहे का अशी त्याने विचारणा केली.मी नाही असे सांगतात त्याने मला तू अखिल भारतीय साहित्य परिषदेचे काम विदर्भात उभारण्याची जबाबदारी घेतो का, असे विचारले. साहित्य हा माझ्याही आवडीचा विषय असल्यामुळे मी लगेच त्याला होकार दिला. मग दोनच दिवसात त्याने सर्व सूत्रे हलवली आणि विदर्भात संघटना बांधण्याची जबाबदारी माझ्याकडे सोपवली. मी देखील उत्साहाने कामाला लागलो आणि फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीसच मी साहित्य परिषदेचा पहिला कार्यक्रम नागपुरात आयोजित केला. त्यासाठी नितीन खास विमानाने एक दिवसासाठी नागपूरात आला होता. तेव्हापासून मग आमचा नियमित संपर्क सुरू झाला. सुमारे तीन वर्ष मी साहित्य परिषदेची विदर्भ कार्याध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली होती. या काळात नितीनचे मला नियमित सहकार्य राहिले. विदर्भात अकराही जिल्ह्यांमध्ये आम्ही साहित्य परिषदेच्या शाखा स्थापन केल्या. याच काळात वंदनाताईंनी नागपूर जवळ कोंढाळीला शेती घेतली होती, मात्र त्यांना आणि त्यांचे यजमान डॉक्टर संजीव यांना शेतीकडे जास्त लक्ष देणे शक्य होत नव्हते. मग नितीननेच ती जबाबदारी स्वीकारली. महिन्यातून पंधरा ते वीस दिवस तो नागपुरात येऊन शेतीवरच राहायचा, आणि तिथली सर्व देखभाल करायचा. मग तिथेच तारखा ऍडजेस्ट करून आम्ही साहित्य परिषदेच्या कामात देखील त्याला गुंतवून घेतले होते. त्याच्याबरोबर मी विदर्भाच्या सर्व जिल्ह्यांचा प्रवास केला. सर्वच ठिकाणी केळकरांसारखे कवी आले हे कळल्यावर सर्वच साहित्यप्रेमी मंडळी जमा व्हायची. त्यामुळे साहित्य परिषदेचे काम बांधणे अधिक सुकर झाले होते. 

२०२४ च्या ऑगस्ट महिन्यात मी अचानक आजारी झालो. मला नागपूरच्या किंग्जवे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हावे लागले. जवळजवळ पंधरा दिवस मी तिथे होतो. नितीन त्यावेळेस शेतावरच होता. त्याला कळताच तो लगेच मला हॉस्पिटलमध्ये भेटायला आला होता. त्यानंतर जवळजवळ सहा महिने मी घरीच आडवा होतो. दर आठ पंधरा दिवसांनी एकदा नितीन मला भेटायला घरी येत असे. माझी प्रकृती थोडी सुधारताच मी फेब्रुवारीपासून साहित्य परिषदेच्या कामाला  लागलो. त्यावेळी जे जे कार्यक्रम  आयोजित केले. त्याला नितीन शेतावरून आवर्जून आला होता. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात साहित्य परिषदेचे राष्ट्रीय सहसंघटनमंत्री मनोज कुमारजी नागपूरला आले होते. त्यांच्यासोबत नीतिनही मुक्कामी होता. त्या तीन दिवसात आम्ही अक्षय कुमार काळे, शुभांगी भडभडे, स्वानंद पुंड अशा मान्यवर साहित्यिकांना भेटलो. तसेच वर्धेला हिंदी विद्यापीठातही जाऊन आलो होतो. मनोज कुमारजींना रेल्वे स्टेशनवर सोडल्यावर नितीनबरोबर मी त्याच्या शेतावर देखील जाऊन आलो. तिथून मग टरबूज, पपया त्याने सोबत बांधून दिल्या होत्या. 

एप्रिल २०२५ मध्येच साहित्य परिषदेचा माझा कालखंड संपला. तरीही माझा आणि नितीनचा संपर्क आहेच. अजूनही साहित्य परिषदेच्या संदर्भात तो माझ्याशी चर्चा करत असतो. सप्टेंबर २०२५ मध्ये माझे १५ वे पुस्तक शह काटशह चा प्रकाशन समारंभ नागपुरात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी पुस्तकाचे समीक्षण करण्यासाठी नितीन वक्ता म्हणून आला होता. तेव्हा पुस्तकावर बोलतानाच नितीनने आमच्या तरुण वयातल्या आठवणी देखील सांगितल्या, तसेच विदर्भात वर्षभरात साहित्य परिषदेच्या अकरावी जिल्ह्यात शाखांची बांधणी केली हे देखील आवर्जून सांगितले होते. 

नंतरही नितीनचा माझा नियमित संपर्क आहेच. तो नागपुरात आला की घरी येऊन जातो. दोन दिवसांपूर्वीच तो घरी आला होता. त्यावेळी जवळजवळ तासभर आमच्या गप्पा झाल्या. अजूनही आला की तो निवांत बसतो. आकाशवाणीचा वृत्त निवेदक, दूरदर्शनचा वृत्त संपादक, आणि आकाशवाणीचा सहसंचालक वृत्त अशा विविध पदांवर काम करून निवृत्त झालेला नितीन एक व्यंग कधी म्हणून  देखील गाजला आहे. मात्र हे सर्वकाही विसरून तो एका सामान्य मित्रासारखा येतो आणि त्याच पद्धतीने वागतो देखील. हेच त्याच्या स्वभावाचे वैशिष्ट्य सांगता येईल. 

एरवी नितीन हा माझ्या तुलनेत सर्वार्थाने सेलिब्रिटीच आहे. तरीही त्याने माझ्याशी गेली जवळजवळ ४५ वर्षे मैत्री जपली आहे, हे त्याचे वैशिष्ट्य आहे.
close