श्रीरामपूर (जि. अहिल्यानगर) :
जागतिक संविधान व संसद संघ अर्थात वर्ल्ड पार्लमेंट (डब्ल्यूसीपीए) यांच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त महिला सबलीकरण या सामाजिक विषयावर भव्य काव्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे काव्य संमेलन १५ मार्च २०२६ रोजी श्रीरामपूर येथे संपन्न होणार आहे.
या काव्य संमेलनासाठी मराठी व हिंदी भाषेतील कवींना सहभागासाठी खुले आवाहन करण्यात आले असून, महिला सक्षमीकरण, स्त्रीशक्ती, स्त्री-अधिकार, आत्मसन्मान, सामाजिक परिवर्तन अशा विषयांवर आधारित कविता सादर करता येणार आहेत. महिला तसेच पुरुष कवींनाही या संमेलनात सहभागी होता येईल.
या कार्यक्रमासाठी कोणतेही प्रवेश शुल्क आकारले जाणार नाही. सहभागी सर्व कवींना सन्मानपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे. सामाजिक प्रबोधन व विचारजागृतीच्या उद्देशाने हे काव्य संमेलन आयोजित करण्यात येत असल्याचे आयोजकांनी सांगितले.
वर्ल्ड पार्लमेंट (WCPA) चे महाराष्ट्र चॅप्टर अध्यक्ष डॉ. दत्ता विघावे यांनी हे आवाहन केले असून, इच्छुक कवींनी सहभागासाठी ९०९६३७२०८२ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे त्यांनी कळविले आहे.
जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर महिलांचे योगदान, हक्क व सामाजिक स्थान यावर संवेदनशील आणि सर्जनशील मांडणी करण्याचे व्यासपीठ या काव्य संमेलनातून उपलब्ध होणार असल्याने साहित्यिक व कवी वर्गातून या उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

