shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

*कथा राज्यपालांना तोफांची 'सरबत' देण्याच्या प्रथेची !उमेश काशीकर यांचे मनोगत !!

जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार - नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.

इंग्रजांच्या काळात सुरु झालेल्या काही प्रथा आजही सुरु आहेत. काही प्रथा बंद करण्याचा प्रयत्न झाला, परंतु त्या सुरु राहिल्या. त्यातील एक प्रथा म्हणजे राज्यपालांना पदभार ग्रहणाच्या वेळी पूर्वापार चालत आलेली १७ बंदुकींच्या 'सरबती'ची ची प्रथा !
स्वातंत्र्यानंतर दहा वर्षांनी ही प्रथा बंद करावी असे निर्देश शासनाने दिले असल्याचे दिसते. परंतु मधल्या काळात निर्देश मागे घेतले की काय हे माहिती नाही. परंतु ती प्रथा आजही सुरु आहे. राज्यात नव्या राज्यपालांची नियुक्ती जाहीर झाली की या विषयावर पुन्हा खल होतोच होतो !

*तोफांच्या सलामीचा इतिहास
इंग्रजांच्या काळात एखाद्याला मानसन्मान देतांना किती तोफांची (कालांतराने बंदुकीची) सलामी द्यायची याचा एक प्रोटोकॉल तयार झाला होता.सर्वाधिक मोठा राजशिष्टाचार महाराजे किंवा सार्वभौम देशाचे प्रमुख यांना लागू असे. 

त्यांना स्वागत प्रसंगी २१ बंदुकीची सलामी दिली जायची. एकतीस बंदुकींची व १०१ बंदुकींची सलामी दिल्याच्या देखील घटना घडल्या आहेत !गव्हर्नर - जनरल पदावरील व्यक्तीला १९ बंदुकीची सलामी दिली जायची. 
गव्हर्नर पदावरील व्यक्तीला पदभार घेतेवेळी १७ बंदुकीची सलामी देण्याची प्रथा होती. 

बंदुकीची संख्या ही आवर्जून विषम असायची.

*मुंबईचे गव्हर्नर हेन्री बार्टल एडवर्ड फ्रिअर यांना तोफांची सलामी* 

सन १८६२ साली सर हेन्री बार्टल एडवर्ड फ्रिअर (१८६२- १८६७) यांची मुंबईच्या गव्हर्नर पदावर नियुक्ती करण्यात आली. मुंबईत गव्हर्नर पदाचा पदभार स्वीकारण्यासाठी फ्रिअर आले तो प्रसंग 'मुंबईचे वर्णन' या पुस्तकामध्ये लेखक गोविंद माडगांवकर यांनी सुंदर शब्दात लिहिला आहे. 

ते वर्णन त्यांच्याच शब्दात :

"सर बार्टल फ्रिअर यांची मुंबई इलाख्याच्या गव्हर्नरच्या जाग्यावर नियुक्ती झाली, त्यामुळे मुंबईच्या रयतेस मोठा हर्ष झाला.  ज्यावेळी गव्हर्नर जहाजावरुन 'पालो' बंदरांत उतरतात तेंव्हा १७ तोफांची सरबत होती व पालो  बंदरापासून चर्चगेट पर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी काळ्या व गोऱ्या पलटणी उभ्या करून नवीन आलेल्या गव्हर्नरास मान देतात."  

*स्वातंत्रोत्तर काळात देखील ...

स्वातंत्र्यानंतर  गव्हर्नर जनरल ऐवजी राष्ट्रपती आले व गव्हर्नर ऐवजी राज्यपाल आले.परंतु बंदुकीच्या सरबतीची ही प्रथा सुरु राहिली. त्यामुळे राष्ट्रपतींना २१ बंदुकीची सलामी व राज्यपालांना १७ बंदुकीची सलामी देण्याची प्रथा सुरु राहिली.
  

पूर्वी मानवंदना पालो (किंवा अपोलो) बंदराजवळ म्हणजे गेटवे ऑफ इंडिया जवळ दिली जायची.तोफांची 'सरबत' देखील त्याच्याच जवळ नेव्हीच्या तोपखान्यावर (मिडल ग्राउंड) व्हायची.कालांतराने नौदलातर्फे दिली जाणारी मानवंदना सलामी (गार्ड ऑफ ऑनर) 'गव्हर्मेंट हाऊस' येथे म्हणजे मलबार हिल येथे व्हायला लागली. बंदुकींच्या सरबतीची जागा मात्र पूर्वीचीच (मिडल ग्राउंड) कायम राहिली.  त्या ठिकाणाहून बंदुकींच्या बारचा आवाज मलबार हिल येथे येणे शक्यच नव्हते. 

त्यामुळे गम्मत अशी झाली की गन फायर सॅल्यूट झाला की नाही हे कळणे कठीण झाले. 'जंगलमें मोर नाचा किसने देखा' सारखीच परिस्थितीत झाली!

*प्रथा बंदीचे शासनाचे निर्देश

दिनांक २९ नोव्हेंबर १९५७ रोजी केंद्र शासनाच्या गृह विभागाने सर्व राज्य सरकारांना, मुख्य सचिवांच्या नावाने एक पत्र पाठवले. ए.व्ही. पै, ICS, सचिव, भारत सरकार यांच्या नावाने काढलेल्या या पत्राचा विषय होता 'Reducing Expenditure on Ceremonial Functions' अर्थात शासकीय समारंभीय कार्यक्रमांवर होणाऱ्या खर्चात कपात करणे बाबत..' त्यामध्ये पहिलीच सूचना बंदुकींची सलामी बंद करण्याबाबत होती !

*ती सूचना अशी होती:*

बंदुकीच्या सलामीबाबत (Firing of Gun Salutes): 
राज्यपाल पदाची सूत्रे स्वीकारताना किंवा पदाचा त्याग करताना बंदुकांची सलामी देण्याची सध्याची पद्धत आधुनिक व्यवस्थेत विसंगत वाटते. त्यामुळे ही पद्धत बंद करण्यात यावी.

"Firing of Gun Salutes: The present practice of firing guns at the time of the Governor's assumption or relinquishment of office seems to be quite out of place in the modern set up, and should therefore be discontinued." 

वरील सूचना जरी १९५७ सालची होती, तरी देखील ती सर्वांपर्यंत पोहोचली नसावी असे वाटते. 
कारण महाराष्ट्र शासनाने १९६५ साली प्रसिद्ध केलेल्या मॅन्युअलमध्ये गव्हर्नर प्रोटोकॉल नमूद केला आहे. त्यामध्ये पुन्हा त्या प्रथेचा उल्लेख आला आहे.  

*'Manual of Protocol and Ceremonials' 1965*

महाराष्ट्र शासनाने सन १९६५ साली 'राजशिष्टाचार व समारंभीय परंपरा' या विषयावर एक मार्गदर्शक पुस्तक   (Manual of Protocol and Ceremonials) छापले होते. या पुस्तकाला मुख्य सचिव डी.आर. प्रधान यांची प्रस्तावना असून त्यावर दिनांक ३० जून १९६५ ही तारीख नमूद केली आहे.

सामान्य प्रशासन विभागातील सहायक सचिव एम एस मोकाशी यांनी हे पुस्तक परिश्रमपूर्वक तयार केले असल्याचे मुख्य सचिवांनी आपल्या प्रस्तावनेत लिहिले आहे. या पुस्तकात राज्यपालांचा शपथविधी / निरोप समारंभ यावेळी पाळावयाच्या प्रोटोकॉल संबंधी एक प्रकरण आहे. 

*त्या पुस्तकात खालील उल्लेख आहे* :  

"A Salute of 17 Guns is fired' 

म्हणजेच राज्यपालांना पदग्रहणानंतर नौदलातर्फे मानवंदना देतेवेळी (नौदलाच्या बॅटरीवर) १७ बंदुकीची सलामी देण्यात येईल !

*प्रोटोकॉल अधिकाऱ्याने सांगितलेला किस्सा* !

या संदर्भात शासनाचे प्रोटोकॉल अधिकारी म्हणून काम केलेल्या एका अधिकाऱ्याने एक मजेशीर किस्सा सांगितला ! 
"राज्यपाल महोदयांना नौदलातर्फे राजभवन येथे मानवंदना दिली जात असताना शासनाचे वरिष्ठ अधिकारी मधेच राजशिष्टाचार वाल्यांना  विचारायचे 'काहो, ते बंदुकीच्या फैरीचे आवाज ऐकू नाही आले...'गन सॅल्यूट फायर' झाला की नाही?'  

"प्रत्येकदा अधिकाऱ्यांना उत्तर काय देणार की गन सॅल्यूट  दूरवर नेव्हीच्या बेसवर होतो... राजभवन पर्यंत त्याचा आवाज ऐकू येणार नाही...! सांगून उपयोग नव्हता .. मग आम्ही युक्ती केली.. गन सॅल्यूट फायर झाला हे दाखवण्यासाठी आम्ही प्रोटोकॉलचे दोन - तीन अधिकारी राज्यपालांना नौदलाची मानवंदना (गार्ड ऑफ ऑनर) सुरु असताना कानावर हात ठेवत असू ....हे दाखवण्यासाठी की नेव्हीकडून नुकताच 'गन सॅल्यूट' झाला... आणि तो आवाज फक्त प्रोटोकॉलवाल्यांनाच ऐकू येतो !!!"असो.   मार्च 2026 महिन्यात दहा तारखेला नवे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ घेतली. त्यावेळी देखील त्यांना १७ बंदुकींची सलामी देण्यात आली, असे नौदलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 

थोडक्यात काय? तर  तोफांची 'सरबत' आजही सुरु आहे  !!  फक्त ज्याला दिली जाते, त्याला ती  ऐकू येत नाही !!
close