shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

*चंद्रकला अरगडे लिखित आत्मचरित्र 'धागे सुखाचे': स्त्री मनाने विणले दुःखातही

 मराठीतील प्रसिद्ध कवयित्री इंदिरा संत यांनी आपल्या कवितेत लिहिले आहे,

" मी सावरिले मन, आवरला अंचल ।
अन् पुढे निघाया उचले हे पाऊल ।
अडखळे उंबरा होउन काया लुळी ।
कोसळे खालती काही न कळे मुळी॥"
  स्रीचे जीवन म्हणजे *शिजवणारी तीच अन् शिजणारीही तीच* असे काहीसे अजूनही आहे. राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर येथील प्रसिद्ध कवायत्री, मर्मज्ञ लेखिका सौ. चंद्रकला लक्ष्मणराव अरगडे यांनी 'धागे सुखाचे' हे हृदय स्पर्शी असे आत्मचरित्र लिहिले. घरची प्रचंड गरिबी, नवरा हाताने अपंग आणि सांसारिक हतबलता स्वीकारत चंद्रकला अरगडे यांनी नगर जिल्ह्यात साहित्य वर्तृळात नावलौकिक प्राप्त केला. साहित्यप्रेमी, साहित्यिक माजी खासदार यशवंतराव गडाख पाटील यांच्या सहकार्यामुळे हे पुस्तक प्रकाशित झाल्याचे चंद्रकला अरगडे यांनी सांगितले. मलपृष्ठावर यशवंतराव गडाख पाटील यांनी लिहिले आहे,
" 'धागे सुखाचे' ही खरं तर त्यांच्या आठवणींची कहाणी आहे. त्यांना जसं आठवलं तसं त्यांनी लिहिलं आहे. त्यामुळे काही ठिकाणी कालक्रम मागेपुढे झालेला आहे. क्वचित निवेदन करताना पुनरावृत्तीही होते. पण ती रसभंग होण्याइतकी निश्चितच नाही. आपल्या जवळच्या व्यक्तीला मनातलं हितगुज सांगावं तसं हे निवेदन आहे."
  चंद्रकला अरगडे यांनी आपलं बालपण रसिकतेने रेखाटले आहे. नाशिक येथे त्यांचा जन्म झाला. नाशिक मधील कौटुंबिक, धार्मिक, सामाजिक राजकीय, साहित्यिक वातावरण त्यांनी शब्दबद्ध केले. रामकुंड, धनुष्यकुंड,गोदावरी नदीकाठ यांची प्रसंग वर्णने केली आहेत. गोदावरी नदीत पाण्यातील मोठे फूल पकडण्याच्या नादात एक आई व तिची दोन छोटी मुले कशी वाहून गेली, तो प्रसंग चार वर्ष वयाच्या चंद्रकला यांच्या मनावर कोरला गेला. नांदगावच्या मामाच्या गावच्या आठवणी त्यांनी लिहिल्या आहेत. शाळेत गेल्यापासून त्यांना वाचनाची गोडी निर्माण झाली. शाळेतील वाचन स्पर्धेत त्यांनी बक्षीस म्हणून फ्रॉक मिळविला, त्यांना फार आनंद झाला.मग वाचनप्रेम वाढतच गेले. नांदगावला ध्रुवबाळ चित्रपट पाहून त्या भारावल्या व भक्तीभाव करू लागल्या. बिड्याच्या कारखान्यात चहा, भजे, वडे देण्याचे काम लेखिकेला करावे लागत असे. घरातील प्रतिकूल स्थिती आणि अभ्यासातही जेमतेम असणाऱ्या चंद्रकला यांनी बालपण कसं होतं. याचे वास्तवदर्शी चित्रण रेखाटले आहे. नाशिकला चंद्रकला मेळा प्रसंगही त्यांनी हुबेहुब रेखाटला आहे. चंद्रकला अरगडे यांची आई गंगूबाई व वडील शंकरराव संसारात रमलेले होते, बारा वर्षानंतर नवसाने चंद्रकला यांचा जन्म झाला, पण लाड मात्र झाले नाहीत, त्यांना  बरीचशी कष्टाची कामे करावी लागत. जेमतेम दिसायला असणाऱ्या चंद्रकला यांचा विवाह वयाच्या १२ व्या वर्षीच झाला. त्यांच्या आईचं लग्नही वयाच्या चौथ्या वर्षी झालेलं होतं.
नवरदेव म्हणजे चंद्रकलाचे वडील तेव्हा नऊ वर्षाचे होते. लेखिका लिहितात,
" माझे बारागाव नांदूर येथे लग्न जमले. तेव्हा माझं वय अवघं बारा वर्ष आठ दिवसाचं होतं. लग्न म्हणजे काय हे मला खरचंच कळंत नव्हतं. डाव्या हाताने अपंग असलेला अरगडे यांचा पाच नंबरचा मुलगा होता. नांदूरच्या मावशीने हे लग्न जमवलं होतं. तिची मोठी मुलगी माझी जाऊ होती. लक्ष्मणरावांचे वय माझ्यापेक्षा पंधरा वर्षांनी मोठे होते."
  हा सर्व लनप्रसंग आत्मचरित्रात सविस्तरपणे त्यांनी सांगितला आहे. चंद्रकला अरगडे यांना मुलगी झाली पण लहान वयात लग्न झाल्यामुळे त्यांच्यावर बरेच दुःखद प्रसंग उद्भवले. पहिली मुलगीही वारली. वीट भट्टीवर, सडकाच्या कामावर आणि  बरीच कष्टाची कामे करावी लागत असे. मुलगा झाला पण तोही शरीराने कमकुवत असल्याने चंद्रकला चिंतीत झाल्या. याच संसार वाटेवर साहित्य सेवेत त्या रममाण झाल्या. डॉ. आरोळे यांच्या ग्रामीण आरोग्य विभागात त्यांना काम मिळाले. तेव्हापासून त्यांचं जीवन पालटलं. देवळाली प्रवराला ट्रेनिंग झालं. बाळंतपणात दाई म्हणून त्यांची कामे वाढली. घरी मशीन काम सुरुच होते. सेवाभावी कार्यात त्या रममाण झाल्या.
  लेखिका चंद्रकला अरगडे मनोगतात लिहितात,
" जीवनात प्रवास करताना जे अनुभवले ते शब्दांच्या धाग्यात विणलं. त्याचं पोत रसिक, वाचकच कसं आहे ते ठरवतील." असे लिहून त्यांनी यशवंतराव गडाख पाटील यांच्याबद्दल लिहिले आहे. अनेक साहित्य संमेलने, कविसंमेलने, पुस्तक प्रकाशने, साहित्य मेळाव्यात त्यांनी भाग घेतला. या सर्व साहित्य वाटेवर त्यांनी अनेकांचा उल्लेख केला आहे. मी आणि आम्ही साहित्यिक मित्रांनी नगर जिल्ह्यातील खेड्यापाड्यात १९७७ पासून साहित्य प्रांतात गावोगावी जात असू. याच काळात अशोकनगर येथे मा. गोविंदराव आदिकसाहेब यांनी *साहित्य शिल्प* सुरु केले.ॲङ् रावसाहेब शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली २७ जानेवारी १९८३ रोजी श्रीरामपुरात महाराष्ट्र साहित्य परिषदेची शाखा सुरु झाली, त्यातूनच जिल्हाभर साहित्य उपक्रम झाले, त्यामध्ये चंद्रकला अरगडे सदैव सहभागी होत असत. साहित्य आणि त्यांचं व्यक्तिमत्त्व जणू एकजीव असल्याचा प्रत्यय या लेखनातून येतो. एका संयमी, समन्वयक, नम्र, सर्वांना समजून घेणाऱ्या स्रीमनाचे हे संवेदनशील आत्मचरित्र वाचल्याचे समाधान आहे. त्यांची अनेक पुस्तके याच तपस्वी जीवनाचे साक्षीदार आहेत. त्यांच्या जीवनात दुःखाचे धागे अनेक होते पण माशिनकाम करीत करीत त्यांनी हाती सुखाचे काही नसतानाही धागे सुखाचे लिहिले, ही त्यांच्या मनाची सकारात्मकता आहे. त्या रडल्या नाहीत तर परिस्थितीशी लढल्या, त्यामुळेच एका स्त्रीमनाचं सबलीकरण झालेल्या मनस्वी जाणिवांचं हे आत्मचरित्र म्हणजे आजच्या युवतीसमोर आदर्श सांगणारी प्रेरकगाथा आहे.


परीक्षण:
डॉ. बाबुराव उपाध्ये, श्रीरामपूर
भ्रमणसंवादः ९२७००८७६४०
close