shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

वडापुरी गावातील श्री काळभैरवनाथ यात्रा म्हणजे वडापुरी गावाच्या एकोपाचे वैभव.

वडापुरी गावातील श्री काळभैरवनाथ यात्रा म्हणजे वडापुरी गावाच्या एकोपाचे वैभव. 
श्री मच्छिंद्रनाथ व श्री गोरक्षनाथ यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या वडापुरी येथील श्री काळभैरवनाथ यात्रा उत्सव हा गेले अनेक वर्षापासून सुरू असून वडापुरी गाव व पंचक्रोशीतील सर्व जाती धर्मातील  भाविक ग्रामस्थ एकत्र येऊन साजरी करतात त्या पार्श्वभूमीवर  गुढीपाडव्या दिवशी सकाळी श्रीनाथ मंदिर तसेच मंदिरासमोरील महाकाय जुन्या पिंपळाच्या झाडावरती उंच ठिकाणी वाजत गाजत   निशान लावले जाते. यानंतर  पाडवा वाचन श्रीनाथ मंदिर येथे करतात. यावेळी गावातील ग्रामस्थ पाडवा वाचनाचा लाभ घेता व पुढील वर्षातील पीक पाणी याचा लेखाजोखा करून पुढील दिशा ठरवतात.
------------====
 गुढीपाडव्या दिवशी श्री काळभैरवनाथ मंदिरात होते यात्रेची तयारी :

गावातील सर्व ग्रामस्थ श्री काळभैरवनाथ मंदिर येथे एकत्र येत यात्रेची तयारी करतात.गुढीपाडवा ते अष्टमी व नवमी पर्यंतचे यात्रेचे नियोजन करतात. 
------------------------------------
 गुढीपाडवा ते यात्रेपर्यंत श्री काळभैरवनाथ मंदिरात आरती व भजन :
गुढीपाडवा ते अष्टमी पर्यंत श्री काळभैरवनाथ मंदिर येथे रोज सकाळ, संध्याकाळ आरती व संध्याकाळी भजन  केले जाते.  याच काळात गावातील अनेक भाविक गुढीपाडव्यापासून यात्रेपर्यंत उपवास करून श्री काळभैरवनाथ व श्रीनाथ यांच्या बद्दल श्रद्धा बाळगतात. यामध्ये ग्रामस्थांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असतो.
--------------------------------
 एकाच ठिकाणी देणगी देण्याची परंपरा: 
 यात्रा कमिटीच्या वतीने गावातील चौकात मंडप टाकून यात्रेला परंपरेनुसार एकाच ठिकाणी स्वइच्छेने  देण्यात येणारी देणगी गोळा केली जाते. यास पंचक्रोशीतील भाविक अतिशय श्रद्धेने देणगी देतात. या गावातील विशेष परंपरा म्हणजे ज्या घरातील प्रथम नोकरीस लागेल त्याने एक पगार देवासाठी देण्याची परंपरा दिसून येते. तसेच नवस रूपामध्ये अनेक भाविक आपापल्या पद्धतीने वेगवेगळ्या माध्यमातून देवासाठी दान  करतात.
-------------------------------------=
 छबिना : श्री काळभैरवनाथ देवाचा घोड्यावरील छबिना पारंपारिक  वाद्याच्या गजरात,लेझीम नृत्य करीत गुलालाची उधळण करून भैरवनाथाच्या नावाने चांगभलं या नामाचा  जयघोष करत छबिना मिरवणूक अतिशय उत्साही   निघतो. रात्री बारा वाजता हा छबीना श्रीनाथ मंदिर येथे आल्यानंतर श्री काळभैरवनाथ व शिष्य मच्छिंद्रनाथ यांची गुरु शिष्य भेट व आरती संपन्न होते. यानंतर हा छबीना श्री काळभैरवनाथ मंदिर येथे दाखल झाल्यानंतर महाआरती संपन्न होते. यामध्ये सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. छबिन्याचा घोडा हा दीडशे वर्षांपूर्वी कै. श्रीधर माने (लोहार) यांनी तयार केल्यानंतर घोड्यावरून छबिन्याची परंपरा सुरू झाली असल्याचे वयोवृद्ध ग्रामस्थांच्या वतीने सांगितले जाते.
----------------====
श्री काळभैरवनाथ मंदिर हे पांडवकालीन हेमाडपंती असून त्याच्या गाभाऱ्यात श्री काळभैरवनाथाची  व जोगेश्वरी मातेची  पाषाणातील घडीव  मूर्ती आहे. 
----------------------
 परंपरेनुसार गावाच्या वतीने रामनवमी उत्सव :  नवमी दिवशी रामजन्म उत्सवानिमित्त काळ भैरवनाथ मंदिर नजीक हनुमान मंदिर येथे परंपरेनुसार फुलांचे कीर्तन ह भ प घनश्याम महाराज देवकर  यांचे संपन्न होते. यास गावातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होतात. यावेळी महाप्रसाद  मुकेश व हनुमंत ज्ञानदेव जगदाळे यांच्यावतीने  गेली 16 ते 17 वर्षापासून सुरू आहे.
-------------------------------=
जंगी कुस्त्यांचे मैदान: श्री काळभैरवनाथ यात्रा उत्सवानिमित्त मल्लांना आपले कर्तुत्व  दाखवण्याची संधी या यात्रेनिमित्त मिळते त्यास पुणे, सोलापूर, कोल्हापूर,सांगली, सातारा या जिल्हातील अनेक नामवंत मल्ल सहभाग नोंदवतात.
----------------====-
नलवडे परिवारांचा निशाणाची परंपरा: वडापुरी येथील श्री काळभैरवनाथ यात्रेच्यावेळी नलवडे परिवाराचा निशान काटी चढवण्याची परंपरा कै. शंकर नलवडे व नलवडे परिवार यांच्या काळापासून  गेली सुमारे 150 वर्षापासून सुरू झाली. यात्रे दिवशी सकाळी नलावडेवस्ती झगडेवाडी येथील श्री मारुती मंदिरावरती प्रथम निशांन चढवले जाते.त्यानंतर नलवडे परिवाराच्यावतीने वाजत गाजत श्री काळभैरवनाथ मंदिर येथे आल्यानंतर जुन्या असलेल्या मोठ्या लिंबाच्या झाडावरील मागील वर्षाची निशाण काटी खाली घेतली जाते. त्यानंतर त्या निशानकाटीचा वाजत गाजत वडापुरी गावातील इसी चा मारुती येथील विहिरीवर काटीला स्नान घातले जाते. त्यानंतर त्या काटीचे वाजत गाजत श्रीनाथ मंदिर येथे आल्यानंतर  नवीन निशान चढवले जाते.त्यानंतर नैवेद्य दाखवून त्या काटीला उभा करून गुलालाची उधळण करत श्री नाथाचं चांगभलं श्री काळभैरवनाथाचे चांगभलं या नामघोष केला जातो. फटाक्याच्या अताशबाजीत  या निशान  काठीची मिरवणूक गावातून काढत श्री काळभैरवनाथ मंदिर येथे लिंबाच्या झाडावरती उंच ठिकाणी अतिशय धाडसाने  ती निशानकाटी चढवली जाते. त्यानंतर श्री चा अभिषेक केला जातो व त्यानंतर महाप्रसादासाठी नलवडे परिवार यांच्याकडून  नलवडे वस्ती येथे महाप्रसाद केला जातो यामध्ये अनेक भाविक भक्त याचा लाभ घेतात.
------------------------------------
 यात्रेत माहेरवासिनी यांचा सहभाग : वडापुरी गावातील मुलगी ज्यावेळी सासरी नांदायला जाते त्यानंतर ती मुलगी चैत्र शुद्ध अष्टमी दिवशी श्री काळभैरवनाथ देवाच्या दर्शनासाठी यात्रेला उपस्थित राहते व आपल्या सर्व लहान थोरांमध्ये मिसळते. यामुळे गावातील प्रत्येक कुटुंबामध्ये आनंदी आनंद दिसून येतो.
------------------------------------
 बाहेरगावी गेलेले भूमिपुत्र पुन्हा गावी :
        बाहेरगावी गेलेला गावातील भूमिपुत्र  यात्रेनिमित्त गावात येऊन  ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ यात्रेत सहभाग नोंदवून दर्शनाचा लाभ घेतो.
---------------------------===
 मानाच्या शेरण्या : गावातील अनेक कुटुंब परंपरेनुसार गुळ किंवा पेढ्याच्या  शिरण्या  पारंपरिक वाद्याच्या गजरात तसेच फटाक्यांच्या आताशबाजीमध्ये आणल्या जातात. या शेरण्या श्री काळभैरवनाथ देवाच्या चरणी अर्पण करून   नैवेद्य दाखवतात व उपस्थित भाविक भक्तांना त्या भक्ती भावाने वाटतात.
-----------------------------------===
 जगदाळे परिवाराचा यात्रेतील सहभाग  : सोळा सतरा वर्षापासून 
 वडापुरीतील सूर्यकांत व राजेंद्र सुभाष जगदाळे यांनी पायघड्या दिल्या असून  जगदाळे परिवारा कडून पूर्ण छबिना मिरवणुकीत पायघड्या घातल्या जातात. त्यास गावातील ग्रामस्थ व काटकर वस्ती येथील ग्रामस्थ ही सहकार्य करतात. व त्या पायघड्यावरून श्री चा छबिना व पालखी  मिरवणूक काढली जाते.
-------------------------------
यात्रेत वडापुरी पंचक्रोशीतील गावे : वडापुरी, पंधरवडी, झगडेवाडी, गोखळी, राऊतवस्ती, पिंगळेवस्ती हनुमानवाडी, रामवाडी, मळशी,
-------------------------------------
पारंपारिक लोकनाट्य तमाशा: 
लोककलेला वाव मिळावा म्हणून व त्याची जपणूक व्हावी या उद्देशाने वडापुरी गावातील श्री काळभैरवनाथ यात्रेत रात्री तमाशा व सकाळी हजेरीचा लोकनाट्य तमाशा संपन्न होतो. यामध्ये गावातील लहान थोर याचा आनंद घेतात .
close