shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

डॉ. बाबुराव उपाध्ये यांची कथाः 'भोंगा आणि पोंगा'

वैश्विक पाश्चात्य विचारवंत  
Aristotle यांचे साहित्यिक तत्त्वज्ञान  'भोंगा आणि पोंगा' या कथेत साकार झाल्याचे प्रत्ययास येते. प्रस्तुत कथा ही केवळ ग्रामीण जीवनाचे साधे, शब्दचित्र नसून सामाजिक विडंबनाचे, नैतिक अध:पतनाचे आणि मानवी प्रवृत्तींच्या विकृत मानसिकतेचे गहिरे, गूढ, अनाकलनीय आणि गहन दर्शन घडवणारी एक प्रभावी साहित्यकृती आहे. “जैसी करनी वैसी भरनी” हा या कथेचा आत्मा आहे. जगप्रसिद्ध ख्यातनाम, poetic remedies and dramatic poet, William Shakespeare यांचे “What’s in a name?” हे वचन या कथेत त्रिसूत्रीप्रमाणे गुंफलेले दिसते. 

शीर्षक *'भोंगा आणि पोंगा'* हे केवळ ध्वन्यात्मक नसून ते प्रतीकात्मकता, व्यंजनार्थ आणि सामाजिक रूपक यांच्या त्रिवेणी संगमाचे उत्तम उदाहरण आहे. ‘भोंगा’ म्हणजे कर्णकर्कश, भडक आणि लक्ष वेधून घेणारा आवाज, तर ‘पोंगा’ म्हणजे त्या आवाजाचा अंधानुकरण करणारा प्रतिध्वनी; अशाप्रकारे हे शीर्षक समाजातील अफवा, अपप्रचार, अर्धसत्य आणि त्याच्या अंधानुकरणाची साखळी प्रक्रिया अत्यंत प्रभावीपणे उलगडते.

कथेची पार्श्वभूमी उंदीरवाडी या छोट्याशा गावातील असली तरी वाडी कधी गाव नसते हे लक्षात घ्यायला हवं. म्हणून कदाचित उंदीरवाडी ऐवजी उंदीरगाव हे नाव जास्त शोभले असते. तसेच बाजारपेठेचे आणि साखर कारखाना असलेले गाव हे कधी छोटे नसते हे लक्षात घ्यायला हवं. म्हणून कथेची पार्श्वभूमी महाराष्ट्रातील एक बाजारपेठेतला गाव असे म्हणणे अधिक योग्य ठरेल. ही बाजारपेठ म्हणजे एकप्रकारे समाजाचे सूक्ष्म विश्वच जणू! कुंभार, न्हावी, शेतकरी, व्यापारी, मजूर, स्त्रिया, मुलं — सर्व स्तरांतील माणसं या कथेत येतात आणि एक जिवंत, स्पंदनशील, धडधडतं वास्तव वाचकांसमोर उभं राहतं. ही पार्श्वभूमी जरी ग्रामीण असली तरी तिचे आशय वैश्विक आणि स्वरूप लक्षणीय आहे. आजच्या डिजिटल युगात जशी अफवा, ट्रोलिंग आणि चुकीची माहिती वाऱ्यासारखी पसरते, त्याचाच आदिम, ग्रामीण आराखडा या कथेत दिसतो. “कालाय तस्मै नमः” या उक्तीप्रमाणे ही कथा काळाच्या मर्यादा ओलांडून सार्वकालिक सत्य मांडते.

कथेची संवादरचना ही या कथेची एक अनमोल कडी आहे. बोलीभाषेतील ओघवते, उपरोधिक, कधी खट्याळ तर कधी कडवट असे संवाद पात्रांच्या अंतर्मनाचा पट अलगद उलगडून दाखवितात. दामूचे संवाद हे satirical भाष्य म्हणून लक्षवेधी ठरतात. “Speech is silver, silence is golden” असे म्हटले असले तरी येथे भाषणच समाजाच्या विदारक विघटनाचे कारण ठरते. शब्द हे  दुधारी हत्यार असते. मारलेले वळ बुजतात पण बोललेले शब्द काळजाला टोचतात या गोष्टीचा प्रत्यय या कथेत येतो. शब्द हे जिथे औषध असतात, तिथेच ते विषही ठरू शकतात — या द्वंद्वाची जाणीव लेखकाने अत्यंत प्रभावीपणे करून दिली आहे. कथेतील संवाद केवळ कथानकाला गती देत नाहीत, तर ते समाजाच्या मानसिकतेचे, नैतिकतेचे आणि विकृतीचे आरसे बनतात.

कथेतील पात्ररचना ही या कथेतली एक विशेष अभ्यासनीय बाब आहे. दामू उर्फ भोंगा हा ‘round’ आणि ‘dynamic’ पात्र असून त्याच्यातील बहुआयामी व्यक्तिमत्त्व वाचकाला खिळवून ठेवते. त्याच्यात विनोदबुद्धी, निरीक्षणशक्ती, लोकांना आकर्षित करण्याची क्षमता आहे; परंतु या सर्व गुणांचा तो सदुपयोग करण्याऐवजी दुरुपयोग करतो आणि त्यामुळे तो anti-hero ठरतो. रामू उर्फ पोंगा हा ‘flat’ पात्र असून तो दामूचा केवळ प्रतिध्वनी आहे — स्वतःची स्वतंत्र विचारसरणी नसलेला आहे. गावाचे पाटील हे विवेकी, न्यायप्रिय आणि स्थिर (static) ‘round’ पात्र असून ते समाजातील संतुलन राखणारे केंद्रबिंदू आहेत. गावकरी हे सामूहिक पात्र (collective character) म्हणून समाजाचे बहुरूपी स्वरूप दाखवतात. Heraclitus यांचे “Character is destiny” हे वचन येथे प्रकर्षाने प्रत्ययास येते, कारण प्रत्येक पात्राचे स्वभावधर्मच त्यांच्या नियतीचे निर्धारण करतात.

कथेचा प्लॉट हा साधा (simple) आणि संयुक्त (compound) अशा दोन्ही प्रकारांचा सुरेख मिलाफ आहे. आरंभी बाजाराचे आणि भोंगा-पोंग्याचे वर्णन येते — हा ‘आरंभ’. पुढे दामूच्या मिमिक्रीमुळे वाढणारा प्रभाव, लोकांचे आकर्षण आणि त्यातून निर्माण होणारे ताणतणाव — हा ‘rising action’. गावकऱ्यांचा रोष, तक्रारी आणि पाटलांच्या बैठकीत उलगडणारा संघर्ष — हा उत्कर्षबिंदू (climax). त्यानंतर सत्य उघड होऊन दामू-रामूचे खरे स्वरूप समोर येते — ही ‘falling action’. शेवटी त्यांना दिलेली शिक्षा आणि सुधारण्याची संधी — हा ‘resolution’. अशी पंचपदी कथेत यशस्वीरित्या मांडली आहे. आरंभ मध्य आणि अंत  या कथानकाच्या मूलभूत तत्त्वांचे येथे अचूक पालन होताना दिसते.
कथेची निवेदन शैली ही प्रथमपुरुषी असल्यामुळे कथेला आत्मीयता, विश्वासार्हता आणि भावनिक ओलावा प्राप्त होतो. बालपणीच्या आठवणींच्या माध्यमातून सांगितलेले हे कथन वाचकाला भावविश्वाशी जोडते. कथेचा दृष्टिकोन हा व्यक्तिनिष्ठ असला तरी तो प्रामाणिक आणि परिणामकारक आहे, कारण तो अनुभवाधिष्ठितआहे.
कथेतून दिल्या जाणाऱ्या संदेशाचा विचार करता अत्यंत ठळक, ठसठशीत आणि समाजोपयोगी आहे. “सत्याला मरण नाही” हे जरी अढळ सत्य असले तरी अर्धसत्य, अफवा आणि अपप्रचार हे समाजासाठी अधिक घातक ठरतात, हा मूलमंत्र कथेतून अधोरेखित होतो. विनोदाचा अतिरेक विडंबनात रूपांतरित होतो, आणि नैतिकतेचा ऱ्हास झाला की संस्कृतीचा पाया हादरतो, हा गूढ संदेश कथा देऊन जाते. शब्दांचा वापर विवेकाने करणे किती आवश्यक आहे, याची तीव्र जाणीव वाचकाला होते.
संघर्षाच्या दृष्टीने विचार करतात कथा बहुआयामी आहे. ‘Man vs Society’ — दामू आणि गाव यांच्यातील संघर्ष; ‘Man vs Self’ — दामूच्या अंतर्मनातील दडपलेला विवेक; आणि ‘Social Conflict’ — नैतिकता विरुद्ध विकृती — हे तिन्ही स्तर येथे स्पष्टपणे जाणवतात. निंदकाचे घर असावे शेजारी हा विचार येथे उन्मळून पडतो  कारण येथे निंदक हा सुधारक न राहता विध्वंसक ठरतो. सदर कथा सत्य-असत्य, नैतिक-अनैतिक, आणि प्रभाव-प्रतिक्रिया यांच्यातील शाश्वत संघर्ष उलगडते. ही कथा म्हणजे समाजाच्या अंतर्मनात डोकावणारा आरसा आहे, जो केवळ बाह्य वास्तव दाखवत नाही, तर अंतर्गत विकृतीही उघड करतो. Edgar Degas यांचे “Art is not what you see, but what you make others see” हे वचन या कथेला तंतोतंत लागू पडते.

 “भोंगा आणि पोंगा” ही कथा केवळ करमणूक करणारी नव्हे, तर विचारप्रवर्तक, अंतर्मुख करणारी आणि सामाजिक जाणिवा जागृत करणारी साहित्यकृती आहे. ती भोंग्याचा कोलाहल नसून विवेकाचा इशारा आहे; ती हास्याची लाट नसून सत्याची हाक आहे; आणि ती शब्दांची उधळण नसून मूल्यांची जपणूक आहे.

भोंग्याचा नाद, पोंग्याची छाया,
खोट्याने गेली गावाची रया।
हास्यात दडले विषारी वारं,
सत्यच उभे शेवटी साकार।।

परीक्षणः
प्रा. बाळासाहेब रोहोकले,
केडगाव - अहिल्यानगर
भ्रमणसंवादः ७५८८०२६६४४
close