लाखेवाडी येथे माझे गाव आरोग्य संपन्न गाव अंतर्गत मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न; शेकडो ग्रामस्थांनी घेतला लाभ
इंदापूर: इंदापूर तालुक्यातील लाखेवाडी येथे ‘माझे गाव आरोग्य संपन्न गाव’ या अभियानांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिराला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. आरोग्यवर्धिनी उपकेंद्र लाखेवाडी व ग्रामपंचायत लाखेवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या शिबिरात शेकडो गोरगरीब रुग्णांची मोफत तपासणी करून आवश्यक उपचार व मार्गदर्शन करण्यात आले. ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा त्यांच्या दारात उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला.
या शिबिराचे उद्घाटन पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य व गटनेते श्री श्रीमंत ढोले सर यांच्या हस्ते झाले. यावेळी लाखेवाडी गावच्या आदर्श सरपंच डॉ. चित्रलेखा ढोले यांची प्रमुख उपस्थिती होते . तसेच ग्रामपंचायतीचे सदस्य, आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उद्घाटनप्रसंगी बोलताना श्री श्रीमंत ढोले सर यांनी सांगितले की, ग्रामीण भागातील नागरिकांना तळागाळातच उत्तम आरोग्य सुविधा मिळाव्यात, या उद्देशाने अशा शिबिरांचे आयोजन अत्यंत आवश्यक आहे. अनेक वेळा आर्थिक अडचणीमुळे सर्वसामान्य नागरिकांना महागड्या वैद्यकीय तपासण्या करून घेता येत नाहीत. अशा परिस्थितीत गावपातळीवरच तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली मोफत तपासणी व उपचार मिळणे ही काळाची गरज आहे. शासनाच्या विविध आरोग्य योजनांचा लाभ प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी अशा उपक्रमांची सातत्याने अंमलबजावणी केली जाईल, असेही त्यांनी नमूद केले.
यावेळी सरपंच डॉ. चित्रलेखा ढोले यांनी ग्रामस्थांना आरोग्याबाबत जागरूक राहण्याचे आवाहन केले. नियमित आरोग्य तपासणी केल्यास अनेक गंभीर आजारांचे वेळेत निदान होऊन उपचार करणे शक्य होते. स्वच्छता, योग्य आहार व व्यायाम या गोष्टी अंगीकारल्यास निरोगी जीवन जगता येते, असे त्यांनी सांगितले.
शिबिरात रक्त तपासणी, डोळ्यांची तपासणी, ईसीजी तसेच एक्स-रे यांसारख्या विविध तपासण्या मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या. तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने रुग्णांची सखोल तपासणी करून आवश्यकतेनुसार औषधोपचार सुचविले. ज्येष्ठ नागरिक, महिला, तसेच बालकांची विशेष काळजी घेऊन त्यांची तपासणी करण्यात आली. काही रुग्णांना पुढील उपचारांसाठी संबंधित रुग्णालयात संदर्भित करण्यात आले.
या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी आरोग्यवर्धिनी उपकेंद्रातील वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, आरोग्य सेवक व आशा कार्यकर्त्यांनी मोलाची भूमिका बजावली. तसेच ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, स्थानिक तरुण कार्यकर्ते व ग्रामस्थांनीही मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवून व्यवस्थापनात सहकार्य केले.
ग्रामीण भागात आरोग्य सुविधांचे जाळे अधिक सक्षम करण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरत असून, लाखेवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. भविष्यातही अशा आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन करण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

