काळेवाडी | प्रतिनिधी
काळेवाडी परिसरात सामाजिक व आध्यात्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे बाबा स्वामी योग साधना ग्रुपचे संस्थापक व अध्यक्ष, योगगुरुवर्य श्री. सुरेश अण्णाराव विटकर गुरुजी यांची काळेवाडी येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
विटकर गुरुजी यांनी गेल्या अनेक वर्षांपासून योगसाधना, आरोग्य जनजागृती आणि समाजप्रबोधनाच्या माध्यमातून असंख्य नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणला आहे. त्यांच्या निःस्वार्थ सेवाभावामुळे आणि सातत्यपूर्ण कार्यामुळे त्यांना समाजात विशेष मान-सन्मान मिळाला आहे.
ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड ही त्यांच्या कार्याचीच पावती मानली जात असून, या निवडीमुळे संघाच्या कार्याला नवे बळ आणि दिशा मिळणार असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
यावेळी विविध स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून,श्री. रामकिसन वढणे, सौ. वैशाली वढणे आणि सीए अनिकेत वढणे यांनीही त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
✨ “तुमची जिद्द, मेहनत आणि समाजसेवा यामुळे आम्हाला तुमचा सार्थ अभिमान आहे. भविष्यातही तुमची कीर्ती उत्तरोत्तर वाढत राहो,” अशा शब्दांत शुभेच्छुकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
🏆 विटकर गुरुजींच्या नेतृत्वाखाली ज्येष्ठ नागरिक संघ अधिक प्रभावीपणे कार्य करेल आणि समाजहिताचे अनेक उपक्रम राबवले जातील, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे.

