जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार - नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.
राज्यघटनेस 'गोधडी' म्हणून दूषणे देणार्या गोळवलकरांच्या अनुयायांंना, हल्ली मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आपणच जणू खरे अनुयायी आहोत, असा देखावा करावासा वाटतो. बहुसंख्य प्रसारमाध्यमे महाशक्तीची गुलाम बनलेली आहेत.
डाॅ. बाबासाहेब हे आदर्श पत्रकार आणि संपादक होते. १४ ऑक्टोबर १९५६ रोजी त्यांनी बौद्ध धर्म ग्रहण केला आणि आपल्या 'जनता' वृत्तपत्राचे नाव बदलून 'प्रबुद्ध भारत' असे केले. या पत्राच्या मुखशीर्षावर 'अखिल भारतीय दलित फेडरेशनचे मुखपत्र' असे छापण्यात आलेले होते. मूकनायक, जनता, समता, बहिष्कृत भारत अशी वृत्तपत्रे/पाक्षिके डॉ. बाबासाहेबांनी सुरू केली ती दलित समाजात जागृती निर्माण करण्यासाठी.
महाराष्ट्रातील दलित जनता त्या काळात फार शिकलेली नव्हती. त्यांना मराठी भाषाच समजू शकत होती. त्यामुळे इंग्रजीचे देखील विद्वान असलेल्या बाबासाहेबांनी, मराठी या लोकभाषेतच ही सर्व वृत्तपत्रे सुरू केली. त्यांच्या या वृत्तपत्रांनी दलित चळवळीला चैतन्य प्राप्त करून दिले. बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर 'जनता' वृत्तपत्राचे नाव बदलून, ते 'प्रबुद्ध भारत' असे केले. मात्र बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर हे पाक्षिक बंद पडले होते. ११ एप्रिल २०१७ रोजी महात्मा फुले जयंतीचे औचित्य साधत बाबासाहेबांचे नातू प्रकाश आंबेडकर यांनी 'प्रबुद्ध भारत' हे पाक्षिक नव्या स्वरूपात पुन्हा प्रकाशित करण्याचे जाहीर केले आणि १० मे २०१७ रोजी त्याचा पहिला अंक प्रकाशित झाला.
काही दिवसांपूर्वीच मुंबईतील दादरच्या आंबेडकर भवनात जाण्याचा योग आला. त्यावेळी 'प्रबुद्ध भारत त्याकाळच्या ज्या मुद्रणयंत्रावर छापला जात होता, ते यंत्र (सोबत त्या मुद्रणयंत्राबरोबरचा माझा फोटो) मी पाहिले. एक पत्रकार म्हणून बाबासाहेब ज्या ठिकाणी कार्यरत होते, ते ठिकाण पाहता आले, हे माझे भाग्यच.

