चप्पल स्टँडसमोर सापडलेले २९ ग्रॅमचे पैजन संरक्षण विभागात जमा; दिलीप पगारे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव
शिर्डी प्रतिनिधी: ( तुषार महाजन )
श्री साईबाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शिर्डीत आजही प्रामाणिकपणा जिवंत असल्याची प्रचिती पुन्हा एकदा समोर आली आहे. साई संस्थानच्या पी.आर.ओ. (PRO) विभागात आणि साई संस्थान एम्पलॉइज सोसायटीत कार्यरत असलेले कर्मचारी दिलीप पोपट पगारे यांना मंदिर परिसरातील चप्पल स्टँडसमोर एका भाविकाचे चांदीचे पैजन सापडले. क्षणाचाही लोभ न ठेवता त्यांनी ते तात्काळ श्री साईबाबा संस्थानच्या संरक्षण विभागात जमा करून आपल्या प्रामाणिकपणाचे एक उत्तम उदाहरण समाजासमोर ठेवले आहे.
सविस्तर वृत्त असे की, दिनांक ४ एप्रिल रोजी सकाळी दिलीप पगारे यांना चप्पल स्टँडसमोर जवळपास २९.७०० ग्रॅम वजनाचे एक चांदीचे पैजन बेवारस स्थितीत सापडले. मंदिरात दर्शनासाठी आलेल्या कोणत्यातरी भाविकाचे हे पैजन असावे, हे लक्षात येताच त्यांनी तात्काळ संरक्षण कार्यालय गाठले. तिथे त्यांनी संरक्षण विभागाचे कर्मचारी संजय संपत डांगे यांच्याकडे हे पैजन रीतसर जमा केले. यावेळी संरक्षण विभागाचे सुपरवायझर अरुण वाबळे हे देखील उपस्थित होते. पगारे यांच्या या सजगतेमुळे संबंधित भाविकाची हरवलेली मौल्यवान वस्तू सुरक्षितपणे संस्थानकडे जमा झाली आहे.
**मान्यवरांकडून कौतुकाचा वर्षाव**
दिलीप पगारे यांनी दाखवलेल्या या तत्परतेचे आणि उच्च कोटीच्या प्रामाणिकपणाचे सध्या सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. त्यांच्या या कृतीबद्दल पोलीस उपाधीक्षक रोहिदास माळी यांनी त्यांचे सर्वप्रथम अभिनंदन करून पाठीवर कौतुकाची थाप दिली.
यासह, साई संस्थान एम्पलॉइज सोसायटीचे चेअरमन विठ्ठलराव पवार, व्हाईस चेअरमन पोपटराव कोते, संचालक रामजी गागरे आणि सचिव विलासराव वाणी यांनीही पगारे यांच्या या स्तुत्य कार्याचे तोंडभरून कौतुक केले आहे. "अशा प्रामाणिक कर्मचाऱ्यांमुळेच संस्थेची आणि शिर्डीची प्रतिमा अधिक उजळून निघते," अशी भावना मान्यवरांनी व्यक्त केली आहे.

