₹१० हजार रोख, दागिने व एटीएम कार्डसह पर्स परत; साई संस्थान कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाला सलाम!
शिर्डी प्रतिनिधी: ( तुषार महाजन )
साईनगरीत दररोज लाखो भक्त येत असताना, प्रामाणिकतेचा एक हृदयस्पर्शी आणि प्रेरणादायी प्रसंग साई आश्रम भक्तनिवास येथे घडला आहे. श्री साईबाबा संस्थानच्या साई आश्रम भक्तनिवास येथील आरोग्य विभागाचे सुपरवायझर श्री. ओमकार वाघमारे व सुपरवायझर श्री. परीक्षित खंदारे यांना ‘ए’ बिल्डिंग समोर एक लेडीज पर्स सापडली.
सदर पर्स उघडून पाहिली असता त्यामध्ये तब्बल रुपये १०,०००/- इतकी रोख रक्कम, चांदीचे दोन तोरडे, चार एटीएम कार्ड तसेच चांदीचे दोन मौल्यवान शिक्के असल्याचे आढळून आले. एवढी मौल्यवान वस्तू हातात पडूनही या दोन्ही कर्मचाऱ्यांनी कोणताही मोह न ठेवता प्रामाणिकतेचा मार्ग स्वीकारला.
त्यानंतर त्यांनी अत्यंत तत्परतेने आणि जबाबदारीने संबंधित साईभक्त महिलेचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले. अखेर अथक शोधानंतर त्या महिलेचा माग काढण्यात यश आले आणि तिच्या ताब्यात पर्ससह सर्व वस्तू सुरक्षितरित्या सुपूर्द करण्यात आल्या. हरवलेली पर्स पुन्हा मिळाल्याने संबंधित महिलेच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले, तर उपस्थितांनीही या कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे मनापासून कौतुक केले.
यावेळी पोलीस उपनिरीक्षक रोहिदास माळी सर यांनी त्यांचा सत्कार केला.
या स्तुत्य आणि अनुकरणीय कार्याबद्दल साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री. गोरक्ष गाडीलकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री. भीमराज दराडे तसेच साई आश्रम विभाग प्रमुख श्री. विजय वाणी यांनी संबंधित कर्मचाऱ्यांचे विशेष अभिनंदन करून त्यांच्या प्रामाणिकतेचा गौरव केला.
आजच्या काळात प्रामाणिकपणा दुर्मिळ होत चालला असताना, साईनगरीतील या कर्मचाऱ्यांनी दाखवलेली निस्वार्थ वृत्ती आणि प्रामाणिकता ही खऱ्या अर्थाने ‘साई सेवा’ची जिवंत उदाहरण ठरली आहे. त्यांच्या या कृतीमुळे केवळ संस्थेचा गौरव वाढला नसून, समाजात एक सकारात्मक आणि प्रेरणादायी संदेशही पोहोचला आहे.

