जामखेड प्रतिनिधी:-
जामखेड तालुक्यातील नान्नज येथील महसूल प्रशासनाच्या कथित मनमानी व निष्काळजी कारभाराविरोधात नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना व्यक्त होत आहे. तलाठी कार्यालयासह मंडळ अधिकारी कार्यालय देखील अनेकदा कार्यालयीन वेळेत बंद राहत असल्याचे वारंवार निदर्शनास येत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, मंडळ अधिकारी श्रीमती इकडे या नियमितपणे कार्यालयात उपस्थित राहत नसून, कार्यालयाला कुलूप लावून अनियमित वेळेत येत असल्याची तक्रार आहे. त्यामुळे महसुली कामांसाठी येणाऱ्या नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे सांगण्यात येत आहे.
महसूल व वन विभाग मंत्रालय, मुंबई यांच्या निर्देशांनुसार तलाठी व मंडळ अधिकारी यांनी त्यांच्या नियुक्त सज्जाच्या ठिकाणी कार्यरत राहणे अपेक्षित आहे. मात्र प्रत्यक्षात संबंधित अधिकारी तालुक्याच्या ठिकाणीच जास्त वेळ कार्यरत असल्याचे चित्र दिसून येत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. यामुळे दाखले, फेरफार, 7/12 उतारे, वारस नोंदी तसेच इतर महसुली कामांसाठी नागरिकांना वारंवार हेलपाटे मारावे लागत असल्याची नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
तसेच संबंधित अधिकाऱ्यांशी मोबाईलद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्यास फोन उचलले जात नसल्याची तक्रारही नागरिकांनी केली आहे. “मिटिंग आहे” किंवा “कार्यालयीन कामासाठी बाहेर आहोत” अशी कारणे देऊन वेळकाढूपणा केला जात असल्याने अनेकांची अत्यावश्यक कामे प्रलंबित राहिल्याचा आरोप करण्यात येत आहे.
कार्यालयीन वेळेत कार्यालय बंद ठेवणे, नागरिकांना कोणतीही पूर्वसूचना न देणे, संपर्क टाळणे आणि कामे रखडवून ठेवणे हा प्रकार गंभीर असून नागरिकाभिमुख प्रशासनाच्या धोरणालाच हरताळ फासणारा असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, तहसीलदार जामखेड यांनी संबंधित तलाठी श्री. पी. ए. खाडे तसेच मंडळ अधिकारी श्रीमती इकडे यांच्या कामकाजाची तात्काळ चौकशी करून गैरहजेरी, निष्काळजीपणा व मनमानी कारभाराबाबत कठोर कारवाई करावी, तसेच संबंधित अधिकाऱ्यांची पगार कपात करण्यात येणार का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित करण्यात आला आहे.
तसेच प्रांत अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कर्जत-जामखेड श्री. नितीन पाटील यांनी या प्रकाराची गांभीर्याने दखल घेऊन नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी तातडीने प्रशासकीय कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
— माहिती : RTI कार्यकर्ते श्री. महादेव अरुण साठे

