कुकाणा | प्रतिनिधी
“खोट्या आरोपांपेक्षा सत्य मोठं असतं,” याची प्रचिती देणारा निकाल नेवासा जिल्हा व सत्र न्यायालयाने दिला असून चिलेखनवाडीचे माजी सरपंच तुकाराम महादू गुंजाळ यांच्यासह १० जणांची सर्व आरोपांतून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. या निकालामुळे चिलेखनवाडी परिसरात समाधानाची भावना व्यक्त होत आहे.
सन २०२० मध्ये तत्कालीन सरपंच भाऊसाहेब धोंडीराम सावंत यांनी नेवासा पोलीस ठाण्यात तुकाराम गुंजाळ व इतरांविरोधात गौर कायद्याची मंडळी जमवून मारहाण करणे तसेच सरकारी कामात अडथळा आणल्याचा गंभीर गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा गुन्हा र. नं. ३९/२०२० असा नोंदविण्यात आला होता.
या प्रकरणाचा तपास पूर्ण करून पोलिसांनी तुकाराम महादू गुंजाळ, एकनाथ महादू गुंजाळ (मयत), किरण एकनाथ गुंजाळ, नितीन एकनाथ गुंजाळ, संजय पंढरीनाथ गुंजाळ, रोहिदास भगवान गुंजाळ, नवनाथ भानुदास गुंजाळ, सुखदेव एकनाथ पवार, राजेंद्र सुखदेव पवार आणि दिलीप एकनाथ पवार (सर्व रा. चिलेखनवाडी, ता. नेवासा) यांच्याविरोधात दोषारोपपत्र दाखल केले होते.
नेवासा येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात जिल्हा व सत्र न्यायाधीश हरिभाऊ वाघमारे यांच्या समोर या खटल्याची सुनावणी झाली. सरकारी पक्षातर्फे तब्बल ६ साक्षीदार तपासण्यात आले.
मात्र आरोपींच्या वतीने बाजू मांडताना ॲड. गोकुळ भताणे यांनी प्रभावी युक्तिवाद करत सरकारी साक्षीदारांच्या जबाबांतील गंभीर विसंगती न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. साक्षीदारांच्या कथनात तफावत, पुराव्यांतील कमकुवत दुवे आणि आरोपींविरुद्ध ठोस पुरावा नसल्याचे मुद्दे भक्कमपणे मांडण्यात आले.
या सर्व बाबींचा सखोल विचार करून न्यायालयाने आरोपी क्रमांक १ आणि ३ ते १० यांना भारतीय दंड संहितेच्या कलम १४३, १४८, ३५३, ३२३, २६९, २७०, ५०४, ५०६ (कलम १४९ सह) तसेच कलम २०१ अंतर्गत असलेल्या सर्व आरोपांतून भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम २५८(१) अन्वये निर्दोष मुक्त केले.
या निकालानंतर परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून “न्यायालयावरचा विश्वास आणखी दृढ झाला,” अशा भावना ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहेत.
या खटल्यात आरोपींच्या वतीने ॲड. गोकुळ भताणे यांनी काम पाहिले.

