जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. एच. आर. वाघमारे यांनी केस क्रमांक ३०१/२०२० चा निकाल देताना हा महत्वपूर्ण निर्णय दिला. आरोपींच्या बाजूने ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट गोकुळ भताने यांनी केलेला प्रभावी युक्तिवाद आणि सरकार पक्षाच्या पुराव्यांमधील विसंगती या खटल्यात अत्यंत कळीची ठरली.
काय होते प्रकरण?
मिळालेल्या माहितीनुसार, चिलेखनवाडी गावचे तत्कालीन सरपंच भाऊसाहेब सावंत यांनी नेवासा पोलीस ठाण्यात माजी सरपंच तुकाराम गुंजाळ व इतर नऊ जणांविरुद्ध गैरकायद्याची मंडळी जमवून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. पोलिसांमार्फत तपास पूर्ण झाल्यानंतर तुकाराम गुंजाळ, एकनाथ गुंजाळ, संजय गुंजाळ यांच्यासह इतर आरोपींविरुद्ध सत्र न्यायालयात दोषारोपपत्र (चार्जशीट) दाखल करण्यात आले होते.
न्यायालयाने नोंदवले निरीक्षण सदर प्रकरणाची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. एच. आर. वाघमारे यांच्या न्यायालयात पार पडली. खटल्यादरम्यान सरकार पक्षाच्या वतीने एकूण सहा साक्षीदार तपासण्यात आले. मात्र, आरोपींच्या बाजूने काम पाहणारे ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. गोकुळ भताने यांनी सरकार पक्षाचा खोटेपणा न्यायालयासमोर उघडा पाडला.
ॲड. भताने यांनी साक्षीदारांच्या जबाबांमधील गंभीर विसंगती, पोलीस तपासातील त्रुटी आणि आरोपींविरुद्ध कोणत्याही प्रकारचा ठोस पुरावा नसल्याची बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. त्यांचा हा कायदेशीर युक्तिवाद ग्राह्य धरत, न्यायालयाने 'सरकार पक्ष आरोपींविरुद्ध गुन्ह्याचे आरोप सिद्ध करण्यात पूर्णपणे अपयशी ठरला आहे' असे स्पष्ट निरीक्षण नोंदवले आणि सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश दिले.
कायदेवर्तुळात आणि परिसरात कौतुक
या निकालानंतर चिलेखनवाडी व नेवासा परिसरात समर्थकांनी आणि ग्रामस्थांनी मोठा आनंद व्यक्त केला आहे. राजकीय व सामाजिक द्वेषातून दाखल झालेल्या गुन्ह्यात अखेर सत्याचा विजय झाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. दरम्यान, या क्लिष्ट प्रकरणात आरोपींना न्याय मिळवून देणारे ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. गोकुळ भताने यांच्या अभ्यासू आणि दमदार युक्तिवादाची सध्या कायदेवर्तुळात जोरदार चर्चा सुरू असून, त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

