पोलिस तपासात बनावट जन्म प्रमाणपत्र आणि शैक्षणिक कागदपत्रांचा वापर झाल्याचेही समोर आले आहे. या संपूर्ण प्रकरणात एकूण ७ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शपथपत्रात दोन अपत्यांचा उल्लेख; तपासात तिसरे अपत्य समोर
मेराज खान जलील खान यांनी महापालिका निवडणूक २०२६ साठी उमेदवारी अर्ज दाखल करताना सादर केलेल्या शपथपत्रात स्वतःला फक्त दोन अपत्ये असल्याचे नमूद केले होते. मात्र, पोलिस तपासादरम्यान अहमद खान मेराज खान हे त्यांचे तिसरे अपत्य असल्याचे निष्पन्न झाले.
हे सत्य लपवण्यासाठी मुलाचे नाव बदलून “अहमद खान पिता मिनहाज खान” असे दाखवण्यात आल्याचा आरोप आहे. यासाठी बनावट जन्म प्रमाणपत्र तसेच बोनाफाईड सर्टिफिकेट तयार करण्यात आल्याची माहिती तपासात पुढे आली आहे.
शाळेच्या मुख्याध्यापकांच्या माहितीनंतर प्रकरण उघड
तपासादरम्यान वाईज इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक इलियास कदीर सिद्दीकी यांनी पोलिसांना महत्त्वाची माहिती दिली. त्यांच्या माहितीनंतर संबंधित जन्म प्रमाणपत्र बनावट असल्याचे स्पष्ट झाले.
या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक मनिषा हिवराळे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मेराज खान जलील खान यांच्यासह निलोफर मेराज खान, मिनहाज खान जलील खान, इकरा मिनहाज खान, इलियास कदीर सिद्दीकी, सज्जु उस्ताद आणि अहमद खान मेराज खान अशा एकूण ७ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेमुळे छत्रपती संभाजीनगरच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा चांगलाच चर्चेत आला आहे.

