सोनई/प्रतिनिधी :मोहन शेगर
नेवासा तालुक्यातील सोनई पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून अवैध धंद्यांचे प्रमाण वाढल्याने परिसरात गुन्हेगारीच्या घटनांमध्येही वाढ होत असल्याची चर्चा होती. या पार्श्वभूमीवर नुकतेच सोनई पोलीस ठाण्यात रुजू झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरे यांनी अवैध धंद्यांविरोधात कठोर भूमिका घेत छापा सत्र सुरू केले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या सलग कारवायांमुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून परिसरात कायद्याचा धाक निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.
दि. १८ रोजी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार चांदा गावातील कुकाणा रोडवरील हॉटेल सह्याद्री येथे विनापरवाना देशी-विदेशी दारू विक्री सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाड टाकली असता माहिती खरी असल्याचे निष्पन्न झाले. या कारवाईत १० हजार ६२५ रुपये किमतीची विविध कंपन्यांची दारू जप्त करण्यात आली. या प्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल अप्पासाहेब तमनर यांच्या फिर्यादीवरून संजय आण्णासाहेब भालके (वय ४०, रा. चांदा) याच्याविरोधात गुन्हा र.नं. २०२/२०२६ नुसार महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५(ई) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार मच्छिंद्र आडकित्ते करत आहेत.याच दिवशी पानेगाव-करजगाव रोडवरील हॉटेल परिवार, पानेगाव येथे देखील पोलिसांनी कारवाई केली. या ठिकाणाहून १० हजार ८३३ रुपये किमतीची विविध कंपन्यांची दारू जप्त करण्यात आली. पोलीस कॉन्स्टेबल महेंद्र पवार यांच्या फिर्यादीवरून प्रमोद निवृत्ती जंगले (वय ३४) याच्याविरोधात गुन्हा र.नं. २०४/२०२६ दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस नाईक देवीदास आव्हाड करत आहेत.तिसरी कारवाई बेल्हेकरवाडी येथील सोनई रोडवरील हॉटेल राजवीर येथे करण्यात आली. येथे अवैधरित्या सुरू असलेल्या दारू विक्रीवर पोलिसांनी धाड टाकून ३ हजार २२२ रुपये किमतीची दारू जप्त केली. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सुनील पालवे यांच्या फिर्यादीवरून महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल बाळासाहेब तागड करत आहेत.
तसेच शिंगवे तुकाई फाटा येथील आयशा चिकन शॉप येथेही देशी-विदेशी दारूची विनापरवाना विक्री सुरू असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. येथे पोलिसांनी कारवाई करून १ हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. पोलीस कॉन्स्टेबल प्रविण क्षिरसागर यांच्या फिर्यादीवरून अनिल बादशहा पठाण (वय ३५, रा. शिंगवे तुकाई) याच्याविरोधात गुन्हा र.नं. २०५/२०२६ दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल अप्पासाहेब तमनर करत आहेत.
या सलग छापेमारीमुळे अवैध धंदेवाल्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून सर्वसामान्य नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. परिसरातील वाढत्या गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने उचललेले हे पाऊल महत्वाचे पाऊल मानले जाते आहे
नागरिकांकडून पोलिसांच्या कारवाईचे स्वागत
सोनई पोलीसांनी सुरू केलेल्या या धडक कारवाईमुळे अवैध व्यवसायांना लगाम बसण्यास मदत होणार असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. परिसरात कायदा-सुव्यवस्था अधिक मजबूत होण्याची अपेक्षाही व्यक्त केली जात आहे.

