कर्णधार शुभमन गिलच्या शानदार खेळीच्या आणि साई सुदर्शनसोबतच्या पहिल्या विकेटच्या भागीदारीच्या जोरावर गुजरात टायटन्सने क्वालिफायर २ मध्ये राजस्थान रॉयल्सला सात गडी राखून पराभूत केले. याप्रकारे गुजरातने आयपीएल २०२६ च्या अंतिम सामन्यात आपले स्थान निश्चित केले आहे. वैभव सूर्यवंशीच्या शानदार खेळीच्या जोरावर राजस्थानने २० षटकांत सहा गडी गमावून २१४ धावा केल्या. प्रत्युत्तरात, गुजरातने १८.४ षटकांत तीन गडी गमावून २१९ धावा करत सामना जिंकला. क्वालिफायर २ मध्येच राजस्थानचा प्रवास संपुष्टात आला.
किताब जिंकण्यासाठी आरसीबीसोबत चुरस
गुजरात टायटन्सने तिसऱ्यांदा आयपीएलच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. यापूर्वी, त्यांनी २०२२ विजेते आणि २०२३ मध्ये उपविजेतेपद मिळविले आहे . आता गुजरातचा सामना रविवारी, ३१ मे रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (आरसीबी) सोबत होईल. या सामन्यात आरसीबी आपले विजेतेपद राखण्याचा प्रयत्न करेल. दरम्यान, दोन्ही संघ दुसऱ्यांदा ट्रॉफी जिंकण्याच्या प्रयत्नात असतील. गुजरातकडून वॉशिंग्टन सुंदरने १६ धावा केल्या, तर राहुल तेवतिया १७ धावांवर आणि जोस बटलर नऊ धावांवर नाबाद राहिले. राजस्थानकडून जोफ्रा आर्चर, नांद्रे बर्गर आणि ब्रिजेश शर्मा यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.
गिल-सुदर्शन यांची आयपीएल प्लेऑफमधील सर्वोच्च भागीदारी
लक्ष्याचा पाठलाग करताना, गुजरात टायटन्सने कर्णधार गिल आणि साई सुदर्शन यांच्या जोरावर दमदार सुरुवात केली. या जोडीने पहिल्या विकेटसाठी १६७ धावांची भागीदारी केली. आयपीएल प्लेऑफमधील कोणत्याही विकेटसाठी ही सर्वोच्च भागीदारी आहे. गिल आणि सुदर्शन यांनी चेन्नई सुपर किंग्सच्या मायकल हसी आणि मुरली विजय यांचा १५ वर्षे जुना विक्रम मोडला. २०११ च्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (आरसीबी) विरुद्ध हसी आणि विजय यांनी १५९ धावांची भागीदारी केली होती, जी आयपीएल प्लेऑफमधील सर्वोच्च भागीदारी होती. इतकेच नव्हे तर, गिल आणि सुदर्शन यांनी ११ व्यांदा शतकी भागीदारी केली, जी पुरुषांच्या टी२० मध्ये कोणत्याही विकेटसाठी सर्वाधिक आहे. या जोडीने ख्रिस गेल आणि विराट कोहली, बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान, आणि एबी डिव्हिलियर्स आणि कोहली यांना मागे टाकले, ज्यांनी प्रत्येकी १० शतकी भागीदारी केल्या आहेत.
सुदर्शन सलग दुसऱ्यांदा स्वयंचित
साई सुदर्शन चांगली फलंदाजी करत होता, पण या सामन्यातह तो हिट विकेटने बाद झाला. यापूर्वी, तो आरसीबीविरुद्धच्या क्वालिफायर १ सामन्यातही बाद झाला होता. दोन्ही प्रसंगी, सुदर्शनने शॉट मारला आणि चेंडू सीमारेषेबाहेर गेला, पण त्याची बॅट यष्टीला लागल्याने तो बाद झाला. सुदर्शनने आठ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ३२ चेंडूंमध्ये ५८ धावा केल्या. सुदर्शनने चालू आयपीएल हंगामात नवव्यांदा ५०+ धावा केल्या. त्याने या हंगामात ७०० धावा देखील पूर्ण केल्या. दोन आयपीएल हंगामात ७००+ धावा करणारा तो चौथा फलंदाज आहे. सुदर्शनने २०२५ मध्येही ७०० हून अधिक धावा केल्या आहेत. यापूर्वी ख्रिस गेल (२०१२, २०१३), विराट कोहली (२०१६, २०२४) आणि शुभमन गिल (२०२३, २०२६) यांनी असे केले आहे.
गिलचे पाचवे आयपीएल शतक
गिलने या सामन्यात कर्णधाराची भूमिका बजावत शतक झळकावण्यात यश मिळवले. गिलने ४७ चेंडूंमध्ये आपले पाचवे आयपीएल शतक पूर्ण केले. आयपीएलमध्ये सर्वाधिक शतके करणारा गिल सहावा फलंदाज ठरला आहे. या स्पर्धेत सर्वाधिक शतकांचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे, ज्याने नऊ शतके झळकावली आहेत. कर्णधार म्हणून गिलचे हे दुसरे शतक होते आणि कर्णधार म्हणून सर्वाधिक शतके करणारा तो तिसरा फलंदाज आहे. कोहलीने कर्णधार म्हणून पाच शतके आणि केएल राहुलने तीन शतके झळकावली आहेत. मात्र, शतक झळकावल्यानंतर गिल क्रीजवर जास्त वेळ टिकू शकला नाही आणि १५ चौकार व तीन षटकारांच्या मदतीने ५३ चेंडूंमध्ये १०४ धावा करून बाद झाला.
राजस्थानची खराब सुरुवात
यापूर्वी, राजस्थानचा कर्णधार रियान परागने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सूर्यवंशीने यशस्वी जयस्वालसोबत राजस्थानसाठी डावाची सुरुवात केली. मात्र, पहिल्याच षटकात यशस्वी जयस्वाल बाद झाल्याने राजस्थानची सुरुवात खराब झाली. मोहम्मद सिराजने यशस्वीला एका धावेवर बाद केले. त्यानंतर कागिसो रबाडाने केवळ सात धावा करणाऱ्या ध्रुव जुरेलला बाद केले. अशाप्रकारे, राजस्थानने पॉवरप्लेमध्ये दोन गडी गमावले.
ज शडेजा-वैभव भागीदारी
सुरुवातीच्या धक्क्यानंतर, राजस्थानने आपली रणनीती बदलली आणि कर्णधार रियानच्या जागी रवींद्र जडेजाला फलंदाजीसाठी पाठवले. जडेजा आक्रमक फलंदाजी करत असताना, सूर्यवंशीने त्याला दुसऱ्या टोकावरून साथ दिली. या दोन फलंदाजांनी अर्धशतकी भागीदारी केली, पण त्यानंतर जडेजा दुखापतग्रस्त होऊन निवृत्त झाला. रियान फलंदाजीसाठी आला, पण जेसन होल्डरने रियानला बाद केले, जो केवळ ११ धावाच करू शकला. त्यानंतर होल्डरने दसुन शनाकाला (३) आणि प्रसिद्ध कृष्णाने जोफ्रा आर्चरला (७) बाद केले. पाच गडी बाद झाल्यानंतर, जडेजा पुन्हा फलंदाजीसाठी आला. वैभव आणि जडेजा यांनी उत्कृष्ट फलंदाजी केली, पण कागिसो रबाडाने सूर्यवंशीला बाद करून ही भागीदारी तोडली. सूर्यवंशी आणि जडेजा यांनी ६५ चेंडूंमध्ये १२७ धावांची भागीदारी केली.
वैभववर शतक रूसले ?
वैभवचे तिसऱ्यांदा शतक हुकले. एलिमिनेटरनंतर झालेल्या या सामन्यात वैभवने एका टोकाकडून डाव सावरला आणि दमदार कामगिरी केली. मात्र, सलग दुसऱ्या सामन्यात त्याचे शतक हुकले. ४७ चेंडूंमध्ये आठ चौकार आणि सात षटकारांसह ९६ धावा करून तो बाद झाला. या मोसमात तिसऱ्यांदा वैभव नव्वदीनंतर बाद झाला आणि त्याचे शतक हुकले. सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या एलिमिनेटरमध्ये वैभव ९७ धावांवर बाद झाला होता, तर या सामन्यात तो शतकापासून चार धावांनी दूर राहिला. आयपीएलच्या एका मोसमात सर्वाधिक वेळा शतक हुकलेल्या फलंदाजांच्या यादीत वैभवचा समावेश झाला आहे. वैभवच्या आधी, ग्लेन मॅक्सवेलचेही २०१४ मध्ये तीन वेळा शतक हुकले होते.
फरेराची स्फोटक फलंदाजी
वैभव आणि जडेजा यांच्यासोबत, डोनोव्हान फरेरानेही अखेरीस राजस्थानसाठी स्फोटक फलंदाजी केली. फरेराने दोन चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने ११ चेंडूंमध्ये नाबाद ३८ धावा करून संघाची धावसंख्या २०० च्या पुढे नेली. राशीद खानने टाकलेल्या २० व्या षटकात फरेराने २७ धावा दिल्या. आयपीएल प्लेऑफमध्ये फिरकी गोलंदाजाने टाकलेले हे संयुक्तपणे सर्वात महागडे षटक होते. यापूर्वी, २०२२ मध्ये आरसीबीविरुद्धच्या एलिमिनेटर सामन्यात लखनौ सुपर जायंट्सच्या रवी बिश्नोईने तेवढ्याच धावा दिल्या होत्या. फरेरा व्यतिरिक्त, जडेजा पाच चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ३५ चेंडूंमध्ये ४५ धावा करून नाबाद राहिला. गुजरातकडून कागिसो रबाडा आणि जेसन होल्डर यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले, तर मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी प्रत्येकी एक बळी मिळवला.
आता हे दोन मातब्बर संघ किताबी लढाईसाठी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर उतरतील तेंव्हा तो सामना निव्वळ लिग क्रिकेटचाच नव्हे तर जागतिक क्रिकेटमधील एक अवर्णनीय सोहळा असेल यात तिळमात्र शंका नसेल.
@डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक
मो.नं. ९०९६३७२०८२.

