जामखेड प्रतिनिधी:-
RTI कार्यकर्ते महादेव अरुण साठे यांच्या पाठपुराव्याला अखेर यश आले असून, नान्नज येथील तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालयाच्या मनमानी कारभाराची गंभीर दखल प्रशासनाने घेतली आहे. नान्नज येथील तलाठी कार्यालय व मंडळ अधिकारी कार्यालय हे वारंवार कार्यालयीन वेळेत बंद राहत असल्याबाबत तसेच संबंधित अधिकारी सज्जाच्या ठिकाणी उपस्थित राहत नसल्याबाबत RTI कार्यकर्ते महादेव अरुण साठे यांनी पुराव्यासह तक्रार केली होती.
सदर प्रकरणाची दखल घेत उपविभागीय अधिकारी तथा प्रांत अधिकारी कर्जत-जामखेड श्री. नितीन पाटील यांनी तहसीलदार जामखेड यांना संबंधित मंडळ अधिकारी नान्नज व तलाठी नान्नज यांच्या कामकाजाची चौकशी करून सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिल्याची माहिती समोर आली आहे.
महसूल व वन विभाग मंत्रालय, मुंबई यांच्या स्पष्ट सूचनांनुसार संबंधित अधिकारी यांनी त्यांच्या सज्जाच्या ठिकाणी उपस्थित राहणे बंधनकारक असताना प्रत्यक्षात कार्यालयांना कुलूप लावून अधिकारी तालुक्याच्या ठिकाणी कार्यरत राहत असल्याचा आरोप करण्यात आला होता. यामुळे सामान्य नागरिकांना 7/12, फेरफार, दाखले, वारस नोंदी तसेच इतर महसुली कामांसाठी वारंवार हेलपाटे मारावे लागत असल्याची तक्रार करण्यात आली होती.
प्रशासनाने या प्रकाराची गंभीर दखल घेतल्यामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून, संबंधित अधिकाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई होणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
असे मत RTI कार्यकर्ते महादेव अरुण साठे यांनी व्यक्त केले आहे.

