इंदापूरच्या दक्षिण पट्ट्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने मोठे नुकसान.
प्राथमिक माहितीनुसार इंदापूर तालुक्यात 1800 एकरातील पिकांचे नुकसान.
इंदापूर : इंदापूर तालुक्याच्या दक्षिण पट्ट्यातील बावडा भागात शुक्रवार( दि. 5 जून )रोजी सायंकाळी 5 :00 च्या सुमारास झालेल्या तुफान वादळी वाऱ्याने वडापुरी,शेटफळ हवेली, भांडगाव, सुरवड, वकीलवस्ती, भोडणी, लाखेवाडी,बावडा, गणेशवाडी,निरनिमगाव, सराटी, पिंपरी, टणू , रेडा, सराफवाडी या भागात मोठ्या प्रमाणात केळी, डाळिंब, आंबा तसेच जुनी मोठी झाडे,घरावरील पत्रे, जनावरांची गोटे, मोठे पत्र्याचे शेड, विजेचे पोल, तारा इत्यादींचे प्रचंड नुकसान झाले असून सुमारे 1800 एकरातील पिकांचे नुकसान झाल्याचे प्राथमिक माहिती प्रशासनाद्वारे देण्यात आली. सदर नुकसानीचे राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, जिल्हा अध्यक्ष कृषी अधिकारी संजय काचोळे, तहसीलदार जीवन बनसोडे , कृषी अधिकारी दीपक गरगडे , मंडलाधिकारी, कृषी सहाय्यक, तलाठी, ग्रामसेवक इत्यादींनी पाहणी केली.
तालुक्यातील महसूल, कृषी, ग्रामविकास विभागाच्या वतीने तात्काळ पंचनामे सुरू केल्याचे विभाग प्रमुख यांनी सांगितले आहे.
दरम्यान वादळी वाऱ्याने विजेच्या तारेवरती झाडांच्या फांद्या पडल्याने वीज सेवा खंडित झाली. मोठमोठी झाडे उन-मळून पडल्याने ठीक ठिकाणी रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली.
तसेच सदर भागातील केळी पिके काढणीसाठी आलेली असताना अचानक वादळी वाऱ्यासह पावसाने घाव घातल्याने अक्षरशा हातात तोंडाला आलेली पिके भुईसपाट झालेली पाहून शेतकऱ्यांच्या डोळ्यामधील अश्रू अनावर झाले होते. झालेल्या नुकसानीची भरपाई इंदापूर तालुक्यातील आमदार व राज्याचे कृषिमंत्री ना. दत्तात्रय भरणे यांनी झालेल्या नुकसानीचा विचार करून तात्काळ भरपाई द्यावी अशी अपेक्षा नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे.
----------------
चौकट:
राज्यात काल झालेल्या वादळी पावसामुळे 24 जिल्ह्यात अंदाजे एक लाख 500 एकराचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळण्याच्या दृष्टीने बाधित क्षेत्रांची तात्काळ पंचनामे करण्याचे जिल्हा प्रशासनाला निर्देश देण्यात आले. असून याबाबत अहवाल प्राप्त होताच मदत करण्यात येईल - कृषिमंत्री दत्तात्रय भरणे.
-------------------------------
फोटो ओळ : बावडा भागातील केळी पिकांचे झालेले नुकसान.

