१० वी, १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी; २१ जूनपर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन
नगर प्रतिनिधी : ( तुषार महाजन )
श्री सद्गुरू नारायणगिरीजी महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, राहाता, जिल्हा अहिल्यानगर येथे कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट — कोपा या एक वर्षाच्या ट्रेडसाठी ऑनलाइन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवारांना शासनाच्या अधिकृत प्रवेश संकेतस्थळावरून ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.
उमेदवारांनी https://admission.dvet.gov.in या ऍडमिशन वेबसाईटवर जाऊन प्रवेश अर्ज भरावा, असे संस्थेकडून कळविण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी संस्थेतच ऑनलाइन फॉर्म भरून देण्याची व्यवस्था करण्यात आली असून, इच्छुक उमेदवारांनी दिनांक २१ जून २०२६ पर्यंत ऑनलाइन अर्ज भरणे आवश्यक आहे.
ऑनलाइन फॉर्म भरल्यानंतर अर्जाची तपासणी करून तो आय.टी.आय.मध्ये कन्फर्म करणे अनिवार्य आहे. फॉर्म कन्फर्म झाल्यानंतरच उमेदवारांना संबंधित ट्रेडसाठी ऑप्शन भरता येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अंतिम तारीख येण्याची वाट न पाहता लवकरात लवकर आपला अर्ज पूर्ण करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
कोपा हा एक वर्षाचा रोजगाराभिमुख ट्रेड असून या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, ऑफिस ऑटोमेशन, हार्डवेअर व नेटवर्किंग, वेब डिझाईन, प्रोग्रामिंग तसेच डिजिटल कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जाते. आजच्या डिजिटल युगात संगणक ज्ञानाला मोठी मागणी असल्याने हा ट्रेड विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
या ट्रेडमध्ये प्रवेश घेतलेल्या पात्र उमेदवारांना शासनामार्फत डीबीटी पोर्टलद्वारे दरमहा रु. ५००/- विद्यावेतन दिले जाते. तसेच आय.टी.आय. उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना राज्य शासन, केंद्र शासन, खासगी कंपन्या व विविध आस्थापनांमध्ये अप्रेंटिसशिप तसेच नोकरीच्या संधी उपलब्ध होऊ शकतात.
राहाता तालुक्यातील व शहरातील १० वी आणि १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा आणि २१ जून २०२६ पर्यंत ऑनलाइन प्रवेश अर्ज भरावा, असे आवाहन संस्थेचे प्राचार्य व कर्मचारी वर्गाच्या वतीने करण्यात आले आहे.
संस्थेचा पत्ता :
श्री सद्गुरू नारायणगिरीजी महाराज शासकीय आय.टी.आय. राहाता,
चितळी रोड, डॉ. के. वाय. गाडेकर हायस्कूल जवळ,
राहाता, जिल्हा अहिल्यानगर.
संपर्क : 8830767719 / 9921645328

