अहिल्यानगर | प्रतिनिधी
अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलाच्या नेतृत्वाची धुरा स्वीकारल्यानंतर पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन (भा.पो.से.) यांनी कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासह नागरिकाभिमुख पोलीस प्रशासन उभारण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण, पोलीस दलाची प्रतिमा उंचावणे आणि सर्वसामान्य नागरिकांना जलद न्याय मिळवून देणे, या बाबींना त्यांनी सर्वोच्च प्राधान्य दिले आहे.
पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा सखोल आढावा घेण्यास सुरुवात केली असून प्रत्येक पोलीस ठाण्याला प्रत्यक्ष भेट देऊन कामकाजाची तपासणी करण्याचे नियोजन जाहीर केले आहे. नागरिकांच्या तक्रारी शक्यतो पोलीस ठाण्याच्या स्तरावरच तत्काळ निकाली काढल्या जाव्यात, यावर त्यांनी भर दिला आहे.
पोलीस प्रशासनात शिस्त, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढविण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबविण्याचे संकेतही त्यांनी दिले आहेत. गुन्हेगारी नियंत्रणासोबतच जनतेचा पोलीसांवरील विश्वास अधिक दृढ करण्यासाठी लोकसहभाग वाढविण्यावर त्यांचा विशेष भर राहणार आहे.
अहिल्यानगरसारख्या मोठ्या जिल्ह्यात वाढत्या आव्हानांचा सामना करण्यासाठी आधुनिक तपास पद्धती, प्रभावी गस्त, संवेदनशील पोलीसिंग आणि तातडीच्या प्रतिसादावर भर देण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
जिल्ह्यातील पोलीस दल अधिक सक्षम, कार्यक्षम आणि लोकाभिमुख करण्यासाठी मुम्मका सुदर्शन यांच्या नेतृत्वाकडून नागरिकांच्या अपेक्षा उंचावल्या असून, त्यांच्या नियोजनबद्ध कार्यपद्धतीमुळे कायदा-सुव्यवस्था अधिक बळकट होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
०००

