शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन)
देशसेवेसाठी तब्बल ३० वर्षे सैन्य दलात कार्यरत राहून कर्तव्य बजावणारे माजी सैनिक सतीश रामदास सगर यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त नुकताच गावात भावपूर्ण सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक, नातेवाईक, माजी सैनिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
समारंभात सतीश सगर यांनी आपल्या सैन्य सेवेदरम्यान आलेल्या अनेक कठीण आणि आव्हानात्मक प्रसंगांच्या आठवणींना उजाळा दिला. देशसेवेच्या प्रवासात आई-वडिलांनी दिलेल्या संस्कारांची आणि पाठबळाची कृतज्ञतापूर्वक आठवण करून देताना ते भावूक झाले. "आज वडील हयात असते तर माझ्या या क्षणाचा त्यांना सर्वाधिक आनंद झाला असता," असे सांगताना त्यांच्या भावना अनावर झाल्या.
यावेळी त्यांनी सैन्य दलातील मानाची टोपी आपल्या मातोश्री, काका तसेच अर्धांगिनी यांच्या मस्तकावर ठेवून त्यांचा सन्मान केला. या हृदयस्पर्शी प्रसंगाने उपस्थितांच्या डोळ्यांतही अश्रू तरळले.
कार्यक्रमात मान्यवरांनी सतीश सगर यांच्या देशसेवेचा गौरव करत त्यांच्या कार्याचा आदर्श युवकांनी घ्यावा, असे मत व्यक्त केले. उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचा सत्कार करून पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
सेवानिवृत्तीनंतरही समाजकार्यात सक्रिय राहून युवकांना प्रेरणा देण्याचा निर्धार सतीश सगर यांनी यावेळी व्यक्त केला. त्यांच्या गौरव समारंभामुळे गावात अभिमानाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
यावेळी माजी उपसरपंच देविदास जिरे, सरपंच कविता वाघ, रामभाऊ माळी, पत्रकार विशाल रायते,प्रकाश वाघ, दयाराम सगर, साहेबराव जिरे,माजी सैनिक सुधाकर रायते, शबाब खाटीक,गौरव माळी,जयवन्त जाधव, मंगेश रायते,, नंदू जिरे,शालिक रायते,पंडित कळदतंते आदी आजी माजी सैनिक ग्रामस्थ महिला उपस्तित होते.

