shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ नेवासा येथे वकिलांचे आंदोलन

नेवासा प्रतिनिधी | दिल्लीतील जंतर-मंतर येथे शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ नेवासा शहरातील खोलेश्वर मंदिरासमोरील चौकात वकिलांनी निषेध आंदोलन केले.

आंदोलनादरम्यान वकिलांनी हातात भारतीय संविधानाची प्रत आणि राष्ट्रध्वज (तिरंगा) घेऊन लोकशाही, संविधान आणि नागरिकांच्या मूलभूत अधिकारांच्या संरक्षणाचा संदेश दिला. यावेळी शासनाविरोधात घोषणाबाजी करत विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. त्यानंतर तहसीलदार, नेवासा तसेच पोलीस निरीक्षक, नेवासा यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी बोलताना अॅड. पांडुरंग औताडे, अॅड. देवदान जावळे, अॅड. भारतभूषण मौर्य आणि अॅड. जैद शेख यांनी विद्यार्थ्यांवर करण्यात आलेल्या लाठीहल्ल्याचा निषेध व्यक्त केला. लोकशाही व्यवस्थेत शांततापूर्ण आंदोलन करणे हा प्रत्येक नागरिकाचा संविधानाने दिलेला मूलभूत अधिकार असून, विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांवर शासनाने संवेदनशीलतेने विचार करून तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली. तसेच संबंधित घटनेची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, असेही त्यांनी नमूद केले.

निवेदनात भविष्यात शांततापूर्ण आंदोलनांवर बळाचा वापर टाळावा, आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना किंवा त्यांना पाठिंबा देणाऱ्यांवर बिनबुडाचे आरोप करणाऱ्यांविरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई करावी आणि नागरिकांच्या संविधानिक अधिकारांचे संरक्षण करावे, अशी मागणी करण्यात आली.

या आंदोलनात अॅड. पांडुरंग औताडे, अॅड. शेखर गोर्डे, अॅड. सोमनाथ वाकचौरे, अॅड. शिवाजी टेमकर, अॅड. अशपाक शेख, अॅड. बाबासाहेब थोरात, अॅड. आकाश पेचे, अॅड. भारतभूषण मौर्य, अॅड. देवदान संभाजी जावळे, अॅड. कमलेश नवले पाटील, अॅड. जैद शेख तसेच कायद्याचे पदवीधर व सुजाण वकील बांधव उपस्थित होते.
close