shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

साईबाबा संस्थानच्या कामगारांचा प्रश्न मार्गी लावा कायम होऊनही वेतन आणि भत्ते मिळेनात; डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

साईबाबा संस्थानच्या कामगारांचा प्रश्न मार्गी लावा ; कायम होऊनही वेतन आणि भत्ते मिळेनात; डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

शिर्डी प्रतिनिधी:

शिर्डी साईबाबा संस्थानच्या ५९८ कामगारांना २२ महिन्यांपूर्वी कायम सेवेत सामावून घेऊनही अद्याप सेवा लाभ मिळत नसल्याने भाजपा नेते डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी कामगारांना न्याय देण्याची मागणी केली.
डॉ. पिपाडा यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कामगारांची सेवाज्येष्ठता यादी प्रसिद्ध करून अंतिम यादी न्यायालयासमोर सादर करण्यात आली होती. त्यानंतर न्यायालयाने पात्र ५९८ कामगारांना कायम सेवेत सामावून करण्याचे आदेश दिले. शासनाची मंजुरी घेऊन सुमारे २२ महिन्यांपूर्वी या कामगारांना कायम सेवेत सामावून घेण्याचे आदेश वितरित करण्यात आले. मात्र, अद्यापही त्यांना वेतनवाढ, विविध वेतनभत्ते, रजा आणि इतर वैधानिक लाभ लागू करण्यात आलेले नाहीत.

कायम सेवेत समावेशाचे आदेश दिल्यानंतरही संस्थान प्रशासनाने उच्च न्यायालयाची फेरमान्यता मिळविण्यासाठी दीड वर्षांपूर्वी स्वतंत्र अर्ज दाखल केला आहे. मात्र, संस्थानच्या वकिलांनी अद्याप या अर्जाला मंजुरी मिळण्यासाठी सुनावणी घेण्याची विनंती केलेली नाही. त्यामुळे कामगारांना न्याय मिळण्यात अडथळे निर्माण होत आहेत. पंचवीस वर्षांपासून न्यायासाठी संघर्ष करणाऱ्या या कामगारांवर अजूनही अन्याय होत असल्याचे डॉ. पिपाडा यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.

कामगारांच्या न्यायासाठी मुख्यमंत्र्यांचे निर्देश

१) शिर्डी संस्थानच्या कायम सेवेत समाविष्ट करण्यात आलेल्या ५९८ कामगारांना अद्यापही सेवा लाभ मिळत नसल्याच्या निवेदनाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली असून प्रधान सचिव, न्याय व विधी विभाग यांना कार्यवाहीचे लेखी आदेश दिले आहेत.

२) गेल्या पाच वर्षांपासून आपण या कामगारांना न्याय मिळण्यासाठी मुख्यमंत्रीकडे व न्यायालयात पाठपुरावा केला आहे.

३) बावीस महिन्यांपूर्वी कायम झाल्याचे आदेश मिळूनही कोण जाणीवपूर्वक अन्याय करत आहे याची कामगारांना खात्री झाली आहे, असे डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात वैयक्तिक लक्ष घालून संबंधित विभाग व प्रशासनास आवश्यक निर्देश द्यावेत, तसेच कामगारांना त्यांच्या पात्रतेनुसार सर्व वैधानिक लाभ तात्काळ लागू करावेत, अशी मागणी डॉ. पिपाडा यांनी केली.
close