shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

*घ्या समजून राजेहो...राहुल गांधींनी वास्तवाचे भान ठेवून आरोप करावे*ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार - नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.

या देशात सर्वच प्रमुख शिक्षण संस्था या आर.एस.एस. ने ताब्यात घेतल्या आहेत आणि सर्व प्रमुख विद्यापीठांचे प्रमुख हे आरएसएसचे लोकच आहेत असा आरोप काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी काल लोकसभेत सार्वजनिक परीक्षा सुधारणा विधेयकावर बोलताना केला आहे. त्यांच्या या विधानावर सहाजिकच वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत.


काँग्रेसला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा राग अगदी सुरुवातीपासून आहे हे उघडच आहे‌. राहुल गांधींचे पणजोबा आणि देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी कायम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आपला शत्रूच मानले होते असे म्हटल्यास चुकीचे ठरु नये. त्यामुळेच महात्मा गांधींच्या हत्येचे निमित्त करून त्यांनी १९४८ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी देखील घातली होती. नंतर त्यांना ती उठवावी लागली हा भाग वेगळा. मात्र पुढे १९६२ मध्ये चीनने भारतावर आक्रमण केल्यानंतर संघ स्वयंसेवकांनी गावागावात अर्ध सैनिक दलाच्या अनुपस्थितीत जी काही मुलकी व्यवस्था सांभाळली, त्यामुळे पंडित नेहरूंचे काही गैरसमज दूर व्हायला ही सुरुवात झाली होती. त्यामुळेच १९६३ च्या गणतंत्र दिनाच्या संचालनात नेहरूंनी संघाला सहभाग घेण्यासाठी विनंती केली होती, आणि त्यावर्षी त्या संचालनात संघ स्वयंसेवकांची संपूर्ण गणवेशात एक तुकडी देखील सहभागी झाली होती. इतिहासात या घटनेची नोंद आहे. 

राहुल गांधींच्या आजी श्रीमती इंदिरा गांधी यांनी देखील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला कायम चार हात दूर ठेवण्याची भूमिकाच घेतली होती. त्यांनी देखील कायम संघावर टीका केली. त्यावेळी देशात कोणतीही बरी वाईट घटना घडली की त्यामागे इंदिरा गांधींना संघाचा हात दिसतो असे राजकीय वर्तुळात थट्टेने बोलले जायचे. त्यामुळे नेहरू गांधी घराण्याचा संघ विरोध हा कायम उघडच राहिलेला आहे. आणीबाणी लागल्यावर इंदिरा गांधींनी देखील संघावर बंदी घातली होती. त्यावेळी संघ स्वयंसेवकांवर अनेक बंधने आली होती आणि काहींवर अत्याचार देखील केले गेले होते, असे इतिहासात नमूद आहे. नंतर ज्यावेळी १९७७ च्या निवडणुकीत इंदिरा गांधींचा दारुण पराभव झाला, त्यावेळी ही बंदी उठवली गेली होती. नंतरच्या काळात देखील सोनिया गांधींनी संघाला विरोध केला आणि आज राहुल गांधी देखील तीच परंपरा पुढे चालवत आहेत. आजही ज्या चार-पाच राज्यांमध्ये काँग्रेस सत्तेत आहे, इथे संघाला अटकाव करण्याचे प्रयत्न सुरू आहेतच. याचे ताजे उदाहरण कर्नाटकचे देता येईल.

इथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी देशातील सर्व प्रमुख शैक्षणिक संस्था ताब्यात घेतलेल्या आहेत आणि प्रमुख विद्यापीठांमध्ये प्रमुख पदांवर संघाचे स्वयंसेवक विराजमान आहेत, असा आरोप राहुल गांधी करतात. मात्र ते एक बाब सोयीस्कररित्या विसरतात. त्यांचे पणजोबा पंडित जवाहरलाल नेहरू यांची आजी इंदिरा गांधी आणि त्यांचे वडील राजीव गांधी या तिघांनीही सत्ता टिकवण्यासाठी देशात डाव्यांशी आणि अल्पसंख्याकांशी विशेषतः मुस्लिमांशी हातमिळवणी केली होती. त्यामुळे इतकी वर्षे सर्व शैक्षणिक साहित्यिक आणि सांस्कृतिक संस्था तसेच संघटनांवर डाव्यांचेच वर्चस्व राहिलेले दिसून येते.  साधे साहित्य अकादमीचे उदाहरण द्यायचे झाले तर तिथे त्यांनी सदस्यत्वाची रचना अशी काही केली आहे की डाव्या व्यतिरिक्त कोणी फारसे तिथे आतापर्यंत पुढेच येऊ शकले नाही. नुकत्याच मुंबईत एशियाटिक सोसायटी ऑफ बॉम्बे च्या निवडणुका चांगल्याच गाजल्या. तिथे देखील वर्षानुवर्षे डाव्यांचेच वर्चस्व होते. आता तिथे डाव्यांची सत्ता संपून उजव्यांची सत्ता आली. त्यामुळे डाव्यांचे प्रचंड आकांडतांडव सुरू आहे. इतरही सर्व विद्यापीठे, शिक्षण संस्था यांच्यावर कायम डाव्यांचे किंवा मग काँग्रेसवाल्यांचेच वर्चस्व राहिले आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ ही देशभरातील मराठी साहित्यिकांच्या ज्या विविध प्रांतीय संघटना आहेत त्यांची शिखर संस्था म्हणून ओळखली जाते. या संस्थेवर गेली अनेक वर्षे महाराष्ट्रातीलच एका काँग्रेस नेत्याचे वर्चस्व राहिलेले आहे. हे वर्चस्व इतके आहे की अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष कोण असावा हे देखील हा नेता ठरवत असे. गेल्या पंचवीस वर्षातील जवळजवळ वीस अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा स्वागताध्यक्ष हा काँग्रेसची नेताच राहिला आहे. आता हळूहळू या नेत्याचे वर्चस्व संपवले जाते आहे. त्यासाठी देखील ओरड सुरू आहे. महाराष्ट्रातील इतर साहित्य संस्थांमध्ये देखील आता डाव्या विचारसरणीचे लोक बाजूला सारण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे देखील डाव्यांची मोठ्या प्रमाणात ओरड सुरू आहे. 

इथे आणखी एक बाब नमूद करायची आहे ज्याप्रमाणे काँग्रेसी व्यक्तींनी आणि डाव्यांनी शैक्षणिक सांस्कृतिक आणि सामाजिक संस्था उभ्या केल्या. तशाच काही संस्था उजव्या विचारसरणीच्या व्यक्तींनी देखील या देशात उभ्या केल्या. मात्र त्यातील अनेक संस्था नंतर काँग्रेसची मंडळींनी आणि डाव्यांनी सत्तेचा दबाव आणून ताब्यातही घेतल्या. याचे उत्तम उदाहरण नागपुरातील नागपूर शिक्षण मंडळाचे देता येईल. ही शिक्षण संस्था एका काळात संघ विचाराच्या मंडळींनी सुरू केली होती. मात्र नंतरच्या काळात म्हणजेच १९७०-७१ या काळात काँग्रेसची मंडळींनी ताब्यात घेतली आणि या संस्थेतील संघ विचाराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना ते संघाचे आहेत म्हणून निलंबित करण्यापर्यंत मजल या मंडळींनी मारली होती.

नेहरूंच्या काळापासून या देशातील एकूणच शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आणि सामाजिक व्यवस्थेवर डाव्यांचेच वर्चस्व राहिले होते. नेहरूंच्या काळातील पहिले शिक्षणमंत्री मुस्लिमच होते. त्यामुळेच या देशातील इतिहास देखील चुकीच्या पद्धतीने मांडला गेला हे अनेक उदाहरणांद्वारे सिद्ध झालेले आहे. या मंडळींचे कायमच त्या व्यवस्थेवर वर्चस्व राहिले होते. त्याला आता हळूहळू धक्का बसत असल्यामुळे राहुल गांधींची ही ओरड सुरू आहे. ही फक्त राहुल गांधींची नाही, तर इतरांची देखील ओरड होतेच आहे हे विशेष.

इथे असा प्रश्न उपस्थित होतो की उजव्या विचारसरणीचे भारतीय नागरिक विशेषतः राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोक स्वयंसेवक हे राष्ट्रविरोधक आहेत का? तसा विचार केल्यास राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही संघटना जन्माने भारतीय असलेल्या आणि हिंदू विचारसरणी मानणाऱ्या डॉ. केशव बळीराम हेडगेवार या व्यक्तीने उभी केली आहे. ज्यावेळी ही संघटना उभी झाली त्यावेळी देशात इंग्रजांचे राज्य होते. इंग्रजांचेही हिंदूंवर अत्याचार करण्यासाठी मुस्लिमांचे लांगुलचालन करण्याचे धोरण होते. त्यामुळे हिंदू आणि मुस्लिमांमध्ये सातत्याने दंगली होत असत. ही बाब लक्षात घेऊन हिंदूंच्या रक्षणार्थ आणि हिंदूंना सामर्थ्यवान बनवण्यासाठी या संघटनेची स्थापना केली होती. त्या तुलनेत काँग्रेस ही इंग्रज माणसाने स्थापन केलेली संघटना आहे, तर डाव्या विचारसरणीचा उगमच मुळी चीन आणि रशिया या देशांमध्ये झालेला आहे. हा मुद्दा लक्षात घेतला तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक किंवा थोडे व्यापक प्रमाणात बोलायचे झाल्यास संघाचे समर्थक हे भारतीयत्व हेच राष्ट्रीयत्व हे तत्व मानणारे आहेत असे मानता येते. दुसरे असे की हिंदू धर्म हा अत्यंत सहिष्णू धर्म म्हणून ओळखला जातो. ज्याप्रमाणे मुस्लिम धर्माचे लोक जगभरात साम दाम दंड भेद या क्लुप्त्यांचा वापर करून आपला धर्म वाढवत आहेत आणि बळजबरीने धर्मांतरण करत आहेत, त्याचप्रमाणे ख्रिस्ती धर्माचे लोक जगभर विविध आमिषे दाखवून आपला धर्मप्रसार करत आहेत. तसे प्रकार हिंदू धर्माला मान्य नाहीत. ज्यांना हिंदू धर्माचे विचार आणि संस्कृती पटते त्यांचे स्वागत आहे हीच हिंदुत्ववाद्यांची भूमिका राहिलेली आहे. आता पुढे जाऊन तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या मते भारतीय भूमीत जन्माला आलेला आणि इथल्या जीवनपद्धतीत आणि संस्कृतीत वाढलेला प्रत्येक व्यक्ती हा भारतीय पर्यायाने हिंदूच आहे. त्यामुळे संघाची विघटनवादी भूमिका कधीच राहिल्याचे दिसून आलेले नाही.

दुसरे असे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही विचारधारा १९२५ च्या काळात या देशात उदयाला आली. त्याच काळात डावी विचारधारा, काँग्रेसची विचारधारा, हिंदू महासभेची विचारधारा आणि समाजवादी विचारधारा यादेखील पुढे आल्या होत्या. मात्र त्या सर्व नामशेष तरी झालेल्या आहेत किंवा आचके तरी देत आहेत. त्या तुलनेत संघ अक्षरशः फोफावला, आणि शंभर वर्षाचा झालेला आहे. या शंभर वर्षांत समाजाच्या सर्वच क्षेत्रात संघ पोहोचला आहे आणि समाजाच्या सर्व स्तरातील नागरिकांनी संघाला किंवा संघाच्या विचारधारेला म्हणजेच उजव्या विचारधारेला स्वीकारले आहे, हे २०१४ नंतर या देशात झालेल्या निवडणुकांमध्ये दिसून आले आहे. जर या देशात राहणाऱ्या बहुसंख्य मतदारांनी किंवा नागरिकांनी जी विचारधारा स्वीकारली आहे, त्या विचारधारेचे अधिकारी किंवा पदाधिकारी जर निर्णय प्रक्रियेत सक्रिय झाले आणि प्रशासन सांभाळणार असले तर त्याबद्दल आक्षेप असण्याचे कारण काय हा देखील प्रश्न निर्माण होतो.

तरीही राहुल गांधी आरोप करतात की देशाची शैक्षणिक व्यवस्था आरएसएसने काबीज केली आहे. विशेष म्हणजे हे सांगताना हा माझा आरोप नाही, तर पूर्ण इंडिया हा आरोप करतो आहे असा दावा ते करतात. गांधी परिवार किंवा काँग्रेस म्हणजे संपूर्ण भारत हा त्यांचा गोड गैरसमज आहे. तो मतदारांनी खोटा देखील ठरवला आहे. तरीही ते त्याच गैरसमजात आहेत. त्यांनी जरूर राहावे मात्र या देशातील सामान्य नागरिक हा सुजाण आहे. तो अशा गैरसमजत निश्चितच राहणार नाही.

त्यामुळेच राहुल गांधी यांनी अभ्यास करून बोलावे आणि फक्त संघावरच नव्हे तर कोणावर देखील असे निराधार आरोप करू नये इतकेच मला इथे सुचवावेसे वाटते. अर्थात त्यांचा निर्णय घेण्यास ते सक्षम आहेत. मात्र त्यांनी असे निर्णय घेतल्यास मतदार त्यांना त्यांची जागा दाखवतील याचे भान त्यांनी जरूर ठेवावे. आतापर्यंत देखील मतदारांनी त्यांना त्यांची जागा दाखवलीच आहे. एका काळात संपूर्ण देशावर सत्ता गाजवणारी काँग्रेस आज अक्षरशः शोधावी लागते अशा अवस्थेत आहे. ही बाब लक्षात घेऊनच त्यांनी संसदेत किंवा संसदेबाहेर विधाने करावीत आणि त्यांची पुढील धोरणे आखावी हाच माझा त्यांना सल्ला आहे. अर्थात मानायचा किंवा नाही ते त्यांनी ठरवायचे आहे. 
या विषयावर वाचकांची स्पष्ट आणि परखड मते अपेक्षित आहेत. त्याचे स्वागतच होईल.

वाचकहो पटतय का तुम्हाला हे.....? त्यासाठी आधी समजून तर घ्या राजेहो..
close