shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांनी महाडीबीटीवरील प्रलंबित निधीचा लाभ घ्यावा – दीपक गरगडे व श्रीमती राणी खर्डे यांचे आवाहन

अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांनी महाडीबीटीवरील प्रलंबित निधीचा लाभ घ्यावा –  दीपक गरगडे व श्रीमती राणी खर्डे यांचे आवाहन
इंदापूर:   महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत महाडीबीटी (MahaDBT) पोर्टल अंतर्गत अनुसूचित जाती (SC) व अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी विविध कृषी योजनांकरिता निधी उपलब्ध असून, अनेक योजनांसाठी निधी शिल्लक आहे. त्यामुळे पात्र लाभार्थी शेतकऱ्यांनी विलंब न करता महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करून शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी, इंदापूर  दीपक गरगडे तसेच मंडळ कृषी अधिकारी, बावडा श्रीमती राणी लक्ष्मण खर्डे यांनी केले आहे.

तालुका कृषी अधिकारी  दीपक गरगडे यांच्या मार्गदर्शनाखाली व मंडळ कृषी अधिकारी श्रीमती राणी खर्डे यांच्या सूचनेनुसार बावडा मंडळातील सर्व कृषी अधिकारी व कृषी सहाय्यकांकडून गावागावात जनजागृती मोहीम राबविण्यात येत असून शेतकरी मेळावे, ग्रामसभा, शेतभेटी, माहिती फलक व पत्रकांच्या माध्यमातून योजनांची माहिती दिली जात आहे.

महाडीबीटी अंतर्गत खालील प्रमुख योजनांसाठी अर्ज करता येणार आहेत :

ठिबक सिंचन (Drip Irrigation)

तुषार सिंचन संच

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना

शेततळे

ट्रॅक्टर व ट्रॅक्टरचलित अवजारे

पॉवर स्प्रेयर / पाठीवरील पंप

विविध कृषी अवजारे व यंत्रसामग्री

इतर कृषी यांत्रिकीकरण योजनांचे घटक


अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील पात्र शेतकऱ्यांनी https://mahadbt.maharashtra.gov.in या महाडीबीटी पोर्टलवर लॉगिन करून अर्ज सादर करावेत. अर्ज करताना आधार क्रमांक, ७/१२ उतारा, ८-अ, बँक खाते, मोबाईल क्रमांक व इतर आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावीत.

शेतकऱ्यांनी अर्ज भरल्यानंतर त्याची पोचपावती जतन करून ठेवावी. अर्ज प्रक्रियेत कोणतीही अडचण आल्यास संबंधित कृषी सहाय्यक, मंडळ कृषी अधिकारी कार्यालय, बावडा अथवा तालुका कृषी अधिकारी कार्यालय, इंदापूर येथे संपर्क साधावा.

"शासनाकडून उपलब्ध असलेला निधी वाया जाऊ न देता अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील सर्व पात्र शेतकऱ्यांनी त्वरित महाडीबीटीवर अर्ज करून शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा," असे आवाहन तालुका कृषी अधिकारी दीपक गरगडे व मंडळ कृषी अधिकारी श्रीमती राणी लक्ष्मण खर्डे यांनी केले आहे.
close