shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम २०२६ अंतर्गत ३१ जुलै २०२६ पर्यंत पीक विमा भरण्याचे आवाहन

प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम २०२६ अंतर्गत ३१ जुलै २०२६ पर्यंत पीक विमा भरण्याचे आवाहन
इंदापूर :  (ता. इंदापूर) महाराष्ट्र शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री पीक विमा योजना (PMFBY) – खरीप हंगाम २०२६ अंतर्गत पुणे जिल्ह्यातील अधिसूचित पिकांसाठी शेतकऱ्यांनी दि. ३१ जुलै २०२६ पर्यंत पीक विमा प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी, इंदापूर  दीपक गरगडे तसेच मंडळ कृषी अधिकारी, बावडा श्रीमती राणी लक्ष्मण खर्डे यांनी केले आहे.

तालुका कृषी अधिकारी  गरगडे यांच्या मार्गदर्शनाखाली व मंडळ कृषी अधिकारी श्रीमती खर्डे यांच्या सूचनेनुसार मंडळातील सर्व कृषी अधिकारी व कृषी सहाय्यक गावागावात शेतकरी जनजागृती अभियान राबवत असून शेतकरी मेळावे, ग्रामसभा, माहिती फलक, पत्रके तसेच प्रत्यक्ष शेतभेटींद्वारे योजनेची माहिती दिली जात आहे.

या योजनेत भात (तांबडा), बाजरी, नाचणी, मूग, उडीद, तूर, सोयाबीन, कांदा व मका या अधिसूचित पिकांचा समावेश आहे. शासनाने निश्चित केलेल्या विमा संरक्षित रकमेवर अत्यल्प शेतकरी हिस्सा निश्चित करण्यात आला असून नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टी, पूर, दुष्काळ, गारपीट, चक्रीवादळ तसेच अधिसूचित जोखमींमुळे होणाऱ्या उत्पादन नुकसानीपासून आर्थिक संरक्षण मिळणार आहे.

शेतकऱ्यांनी दि. ३१ जुलै २०२६ पूर्वी महा-ई-सेवा केंद्र, कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC), अधिकृत बँक किंवा प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या अधिकृत पोर्टलद्वारे विमा प्रस्ताव सादर करावा. अर्ज करताना आधार क्रमांक, ७/१२ उतारा, ८-अ, बँक खाते आधारशी संलग्न असणे, पिकाची अचूक नोंद व आवश्यक कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.

विमा प्रस्ताव भरल्यानंतर अर्जाची पावती, अर्ज क्रमांक व भरलेला विमा हप्ता याची खात्री करून संबंधित कागदपत्रे जतन करून ठेवावीत. कोणतीही अडचण असल्यास संबंधित कृषी सहाय्यक किंवा मंडळ कृषी अधिकारी कार्यालयाशी तात्काळ संपर्क साधावा.

शेतकऱ्यांनी अंतिम मुदतीची वाट न पाहता ३१ जुलै २०२६ पूर्वी पीक विमा भरून आपल्या पिकांचे आर्थिक संरक्षण सुनिश्चित करावे, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी, इंदापूर  दीपक गरगडे व मंडळ कृषी अधिकारी, बावडा श्रीमती राणी लक्ष्मण खर्डे यांनी केले आहे.
close