शिर्डी प्रतिनिधी:
धुळे येथील कुसुंबा परिसरातील सामाजिक कार्यकर्ते तथा शाखा अभियंता डी. के. इंगळे यांनी नुकतीच शिर्डी येथे साईबाबांचे दर्शन घेतले. या धार्मिक भेटीदरम्यान हाजी अब्दुल बाबा दरगाह येथे त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. धार्मिक सौहार्द आणि समाजसेवेप्रती असलेल्या त्यांच्या योगदानाची दखल घेत हा सत्कार करण्यात आल्याने कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.
साईनगरी शिर्डीतील हाजी अब्दुल बाबा दरगाह परिसरात आयोजित या छोटेखानी कार्यक्रमात हाजी अब्दुल बाबांचे पणतू गफार खान पठाण यांच्या हस्ते डी. के. इंगळे यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी त्यांना पुढील सामाजिक व सार्वजनिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
सत्काराला उपस्थित मान्यवरांनी शिर्डीची संतपरंपरा, सर्वधर्मसमभाव आणि समाजसेवेची परंपरा जपण्याची गरज अधोरेखित केली. डी. के. इंगळे यांनीही या सन्मानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत समाजहिताची कामे अधिक जोमाने सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.
या प्रसंगी पत्रकार संजय महाजन यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमानंतर उपस्थितांनी साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेत सर्वांच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली. धार्मिक वातावरणात पार पडलेल्या या सत्कार सोहळ्याचे उपस्थितांनी स्वागत केले.

