नेवासा, दि. २२ (प्रतिनिधी): दिल्लीतील जंतर-मंतर येथे शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ नेवासा तालुक्यातील वकिलांच्या वतीने तहसीलदार, नेवासा तसेच पोलीस निरीक्षक, नेवासा यांना निवेदन देण्यात आले. आंदोलन करणे हा भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला दिलेला मूलभूत अधिकार असून, विद्यार्थ्यांवर बळाचा वापर न करता त्यांच्या न्याय्य मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. तसेच विद्यार्थ्यांवरील कथित लाठीहल्ल्याची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करावी, अशीही मागणी करण्यात आली.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, लोकशाही व्यवस्थेत प्रत्येक नागरिकाला शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करण्याचा संविधानिक अधिकार आहे. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना किंवा त्यांना पाठिंबा देणाऱ्यांविषयी देशविरोधी अथवा दहशतवादाशी संबंधित बिनबुडाचे आरोप करणाऱ्यांवरही योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी. विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांवर केंद्र सरकारने संवेदनशीलतेने विचार करून तातडीने निर्णय घ्यावा आणि भविष्यात अशा शांततापूर्ण आंदोलनांवर बळाचा वापर होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.
यावेळी विधीज्ञ पांडुरंग औताडे, ॲड. जैद शेख, अॅड. एस. एस. गोर्डे,ॲड. स्वप्निल गरड, अॅड. मौर्य भारत भूषण, अॅड. अर्जुन शेंडे आणि ॲड. बाळासाहेब कावळे यांनी तहसीलदार तसेच पोलीस निरीक्षक यांना निवेदन सादर केले.
याप्रसंगी उपस्थित वकिलांनी नेवासा तालुक्यातील सर्व नागरिकांना आवाहन केले की, दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या न्याय्य आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आयोजित निषेध आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. संविधान, लोकशाही आणि नागरिकांच्या मूलभूत अधिकारांच्या संरक्षणासाठी प्रत्येक नागरिकाने एकजूट दाखविण्याची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

