shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इंदापूरचे कार्बन क्रेडिट सिटीच्या दिशेने पाऊलराज्यातील पहिलाच पथदर्शी प्रकल्प ठरणार; नगराध्यक्ष भरत शहा यांची माहिती.

इंदापूरचे कार्बन क्रेडिट सिटीच्या दिशेने पाऊल

राज्यातील पहिलाच पथदर्शी प्रकल्प ठरणार; नगराध्यक्ष भरत शहा यांची माहिती.
इंदापूर: इंदापूर, ता. ७ पर्यावरण संरक्षण, हवामान बदलाचा प्रभावी सामना आणि भविष्यात कार्बन क्रेडिटच्या माध्यमातून आर्थिक उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण करण्याच्या दूरदृष्टीने इंदापूर नगरपरिषदेने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत 'कार्बन क्रेडिट सिटी-इंदापूर' या महत्त्वाकांक्षी संकल्पनेला मंजुरी देण्यात आली असून, त्याअंतर्गत शहराची कार्बन इन्व्हेंटरी आणि ग्रीन अॅसेट रजिस्टर तयार करण्यासही सभेने मान्यता दिली, असा निर्णय घेणारी इंदापूर नगरपरिषद ही राज्यातील पहिली नगरपरिषद ठरली आहे.

या निर्णयामुळे इंदापूर शहर हरित विकास, पर्यावरणीय व्यवस्थापन आणि कार्बन अर्थव्यवस्थेच्या दिशेने नियोजनबद्ध वाटचाल करणाऱ्या शहरांमध्ये अग्रस्थानी येणार आहे. नगरपरिषदेच्या वीरश्री मालोजीराजे सभागृहात सोमवारी (ता. ६) नगराध्यक्ष भरत शहा यांच्या अध्यक्षतेखाली सदस्यांची सभा झाली.
वातावरणातील कार्बन उत्सर्जन कमी करणाऱ्या किंवा कार्बन शोषण वाढविणाऱ्या उपक्रमांना कार्बन क्रेडिट मिळते. या कार्बन क्रेडिटची विक्री करून स्थानिक स्वराज्य संस्थांना भविष्यात महसूल मिळविण्याची संधी उपलब्ध होत असल्याने इंदापूर नगरपरिषदेने या संकल्पनेचा स्वीकार केला आहे.

याबाबत नगराध्यक्ष शहा म्हणाले, "इंदापूर नगरपरिषदेने गेल्या काही वर्षांत राबविलेल्या विविध पर्यावरणपूरक उपक्रमांमुळे या संकल्पनेची भक्कम पायाभरणी झाली आहे. माजी नगराध्यक्ष अंकिता

शहा यांच्या कार्यकाळात शहरातील सर्व स्ट्रीटलाईट्स एलईडी करण्यात आल्या. सार्वजनिक प्रकाशयोजना मोठ्या प्रमाणावर सौरऊर्जेवर आधारित करण्यात आली. कचऱ्यापासून खत व ऊर्जा निर्मितीचे प्रकल्प उभारण्यात आले, तर सांडपाणी व्यवस्थापनासाठी भूमिगत यंत्रणा विकसित करण्यात आली. शहरात जैवविविधता उद्यानाची निर्मिती करून विविध देशी वृक्षांची लागवड करण्यात आली. याशिवाय शहरात अटलघन वन, मियावाकी वन विकसित करण्यात आले आहे. शहा नर्सरीच्या सहकायनि शहरातील विविध भागांत मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात आले आहे. यामध्ये शहरातील पर्यावरण संवर्धनासाठी कार्यरत सामाजिक संस्थांचे योगदानही मोलाचे आहे.

भविष्यात 'ग्रीन कार्बन सिटी इंदापूर' ही संकल्पना अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी नागरिकांचा आणि सामाजिक संस्थांचा सहभाग वाढविण्यात येणार असल्याचे शहा यांनी स्पष्ट केले. कार्बन इन्व्हेंटरी आणि ग्रीन अॅसेट रजिस्टर तयार करून इंदापूरला महाराष्ट्रातील पहिले ग्रीन कार्बन सिटी म्हणून विकसित करण्याचा आमचा संकल्प आहे, असेही शहा यांनी सांगितले.

–...........



संत तुकाराम महाराज अभंग तपोवन

सभेत 'संत तुकाराम महाराज अभंग तपोवन' उभारण्याच्या प्रस्तावालाही मंजुरी देण्यात आली. संत तुकाराम महाराजांच्या अभंगांपासून प्रेरणा घेत 'एक अभंग - एक झाड' ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. या उपक्रमातून सांस्कृतिक वारसा, पर्यावरण संवर्धन आणि पर्यटन विकास यांचा समन्वय साधण्याचा नगरपरिषदेचा मानस आहे
close