श्रीरामपूर, दि. २३ जुलै : दिल्लीतील जंतर-मंतर येथे नीट पेपरफुटी प्रकरणी शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींवर झालेल्या कथित अमानुष लाठीहल्ल्याचा नव स्वराज्य सेनेच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला. यासंदर्भात प्रांत अधिकारी, श्रीरामपूर यांना निवेदन देऊन संबंधित दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
यावेळी नव स्वराज्य सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. विजयराव खाजेकर म्हणाले, "भारतीय राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचा मूलभूत अधिकार दिला आहे. मात्र न्याय मागण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींवर पोलिसांकडून अमानुष लाठीहल्ला होणे ही लोकशाहीला काळिमा फासणारी घटना आहे. विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांकडे दडपशाहीच्या भूमिकेतून पाहण्याऐवजी शासनाने त्यांना न्याय देणे अपेक्षित आहे. तसेच उपोषणकर्ते सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक आणि कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजित दीपके यांच्याशी पोलिसांनी केलेल्या कथित गैरवर्तणुकीचाही आम्ही तीव्र निषेध करतो. या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळावा," अशी मागणी त्यांनी केली.
नव स्वराज्य सेनेने दिलेल्या निवेदनात विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ल्याची उच्चस्तरीय चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची तसेच विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्या तातडीने मान्य करण्याची मागणी करण्यात आली आहे. अन्यथा नव स्वराज्य सेनेच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.
यावेळी नव स्वराज्य सेनेचे उपाध्यक्ष संजय वाहूळ, विभागीय अध्यक्ष संपत मोरे, संघटक सचिव अनिल सावंत, विभागीय अध्यक्ष कुमार जाधव, तालुका अध्यक्ष अनिल उबाळे, संघटक सचिव उत्तमराव हिवराळे, तालुका उपाध्यक्ष डॉ. अशोक शेळके, डी. एल. भोंगळे सर यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
000

