पळसदेव (ता. इंदापूर): गीता शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एल. जी. बनसुडे इंग्लिश मिडीयम स्कूल & ज्युनियर कॉलेज, पळसदेव येथे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी संस्थेचे अध्यक्ष हनुमंत लक्ष्मण बनसुडे यांच्या हस्ते लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. शितलकुमार शहा, सचिव सुरज बनसुडे, संस्थेच्या सचिव व कार्याध्यक्षा सौ. नंदाताई बनसुडे तसेच बाबा बनसुडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. सर्व विभागप्रमुख, शिक्षकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे अग्रणी नेते, प्रखर राष्ट्रवादी आणि समाजजागृती करणारे महान विचारवंत होते. "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच" हा त्यांचा घोष आजही प्रत्येक भारतीयाला राष्ट्रसेवेची प्रेरणा देतो. शिक्षण, समाजप्रबोधन आणि राष्ट्रीय एकात्मतेसाठी त्यांनी केलेले कार्य अतुलनीय आहे. त्यांच्या विचारांतून देशभक्ती, स्वाभिमान, कर्तव्यनिष्ठा आणि राष्ट्रप्रेमाची प्रेरणा आजही नव्या पिढीला मिळत आहे.
याप्रसंगी विद्यार्थ्यांनी टिळकांच्या जीवनकार्यावर आधारित भाषणे, कविता आणि नाटिका सादर करून उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांच्या प्रभावी सादरीकरणातून राष्ट्रप्रेम, स्वातंत्र्याची प्रेरणा आणि लोकमान्य टिळक यांचे विचार प्रभावीपणे मांडण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे प्राचार्य संजय इंगोले यांनी केले. मुख्याध्यापिका सौ. सीमा बाराते व उपमुख्याध्यापिका सौ. सुवर्णा वाघमोडे यांनी विद्यार्थ्यांना आदर्श आचरण, शिस्त आणि संस्कार यांविषयी बोधपर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. अर्चना बोंद्रे यांनी केले, तर सौ. ज्योती मारकड यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली.

