योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराजांच्या दर्शनाने भाविक भारावले; लाखो भाविकांनी घेतला भक्तीचा अनुभव
धनगरवाडी, ता. राहाता : श्रीक्षेत्र धनगरवाडी व पंचक्रोशी येथे योगीराज सद्गुरू श्री गंगागिरी महाराज यांच्या प्रेरणेने आयोजित करण्यात आलेल्या १७९व्या अखंड हरिनाम सप्ताहाला यंदाही भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. १८ ते २५ ऑगस्टदरम्यान झालेल्या या सप्ताहात लाखो भाविकांनी उपस्थित राहून हरिनामाचा जागर, कीर्तन, प्रवचन आणि महाप्रसादाचा लाभ घेतला.
यावेळी धनगरवाडी व पंचक्रोशीतील धार्मिक परंपरेनुसार आयोजित या भव्य सोहळ्यास सामाजिक कार्यकर्ते नानासाहेब शिंदे पाटील यांनी उपस्थित राहून योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराजांचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी सप्ताहस्थळी सुरू असलेल्या धार्मिक कार्यक्रमांची पाहणी करून भाविकांशी संवाद साधला. संत-महंतांचे आशीर्वाद घेत त्यांनी या आध्यात्मिक सोहळ्याबद्दल समाधान व्यक्त केले.
सप्ताहाच्या काळात दररोज मोठ्या संख्येने वारकरी, टाळकरी आणि भाविक धनगरवाडी येथे दाखल झाले. आमटी-भाकरीच्या महाप्रसादाचीही व्यापक व्यवस्था करण्यात आली होती. २५ ऑगस्ट रोजी महंत रामगिरी महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता भक्तिमय वातावरणात झाली.
सुमारे दोनशे वर्षांची परंपरा लाभलेल्या या अखंड हरिनाम सप्ताहातून भक्ती, नामस्मरण आणि समाजप्रबोधनाचा संदेश दिला जातो. यंदाचा सप्ताहही अत्यंत शिस्तबद्ध आणि भव्य स्वरूपात पार पडल्याने आयोजक, स्वयंसेवक, ग्रामस्थ आणि पंचक्रोशीतील भाविकांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
धनगरवाडी येथील १७९व्या अखंड हरिनाम सप्ताहात योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराजांचे दर्शन घेताना सामाजिक कार्यकर्ते नानासाहेब शिंदे पाटील.

