मोर्शी, दि. २ (प्रतिनिधी): महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत जन आरोग्य योजना अंतर्गत उपजिल्हा रुग्णालय मोर्शी येथे रविवारी (दि. २ ऑगस्ट) आयोजित विशेष शस्त्रक्रिया शिबिरात तब्बल २६ रुग्णांवर यशस्वी सामान्य शस्त्रक्रिया करण्यात आल्या.
या शिबिरामध्ये हर्निया, हायड्रोसिल, अंबिलिकल हर्निया, अपेंडिक्स तसेच इतर सामान्य शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडल्या. ग्रामीण भागातील रुग्णांना दर्जेदार व मोफत शस्त्रक्रिया सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरास रुग्णांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रमोद पोतदार, सर्जन डॉ. प्रविण बिजवे, डॉ. राहुल खन्ना तसेच भूलतज्ज्ञ डॉ. जगदीश काळभोर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
सदर शिबिर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विनोद पवार तसेच निवासी बाह्य संपर्क अधिकारी डॉ. संदीप हेडाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.
यावेळी मोर्शी व वरूडचे वैद्यकीय समन्वयक डॉ. घनश्याम मानकर, डॉ. प्रेरणा वानखेडे, वर्षा दारोकर, प्रतीक्षा पांचाळे, श्रीमती रेशमा बहुरूपी, मीनाक्षी मेश्राम, अंकित नेवारे, स्नेहल बेहेरे, अश्विनी तिजारे, दीपिका गोटे, सागर झटाळे, नौशाद खान, हबीब खान, ज्ञानेश्वर टाकळे, प्रवीण कापडे, शोभा इंगळे, संगिता तायवा तसेच महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत जन आरोग्य योजना विभागातील वशीम शेख, प्रकाश पांडे आणि इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
उपजिल्हा रुग्णालय मोर्शी येथे आयोजित या शस्त्रक्रिया शिबिरामुळे अनेक रुग्णांना मोफत व गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा उपलब्ध झाली असून, शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात येत आहे.

