shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

वडापुरीत देशी खिलार गायीच्या 'डोहाळे जेवणा'ची अनोखी परंपरा; 'विठाई'वर प्रेमाचा वर्षाव

वडापुरीत देशी खिलार गायीच्या 'डोहाळे जेवणा'ची अनोखी परंपरा; 'विठाई'वर प्रेमाचा वर्षाव
इंदापूर- वडापुरी :
माणूस आणि मुक्या प्राण्यांमधील जिव्हाळ्याचे नाते किती हृदयस्पर्शी असू शकते, याचा प्रत्यय वडापुरी (ता. इंदापूर) येथे आला. येथील शेतकरी नानासाहेब निवृत्ती पासगे यांच्या कुटुंबातील 'विठाई' या देशी खिलार गाभण गायीचे पारंपरिक पद्धतीने डोहाळे जेवण साजरे करण्यात आले. या अनोख्या उपक्रमाची पंचक्रोशीत मोठी चर्चा रंगली आहे.

कार्यक्रमात महिलांनी विठाईची खण, नारळ, फळे आदींनी ओटी भरून तिचे औक्षण केले. लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी या सोहळ्यात उत्साहाने सहभाग घेतला. यानिमित्ताने उपस्थित महिला-पुरुषांना पासगे कुटुंबीयांच्या वतीने गोड जेवण देण्यात आले.

देशी गायींचे संगोपन वाढावे, पारंपरिक कृषी संस्कृती जपली जावी आणि मुक्या प्राण्यांबद्दल प्रेम व संवेदनशीलता वाढावी, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. शेतकरी कुटुंबांमध्ये गाय ही केवळ जनावर नसून कुटुंबातील सदस्यच असते, याची प्रचिती या सोहळ्यातून आली.

विठाई आणि नानासाहेब पासगे यांच्यातील जिव्हाळ्याची कहाणीही गावकऱ्यांना भावणारी आहे. सुमारे दीड-दोन वर्षांपूर्वी नानासाहेब हृदयावरील शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात दाखल होते. ते घरी परत येईपर्यंत विठाईने अन्न-पाणी नीट न घेता सतत हंबरडा फोडल्याचे कुटुंबीय सांगतात. मालक परतल्यानंतरच ती पूर्ववत झाली. त्या घटनेनंतर विठाईबद्दलचा कुटुंबीयांचा जिव्हाळा अधिकच वाढला.

याच नात्याची जपणूक म्हणून आयोजित करण्यात आलेल्या या डोहाळे जेवणाची सध्या वडापुरीसह परिसरात कौतुकाने चर्चा होत असून, देशी गायींच्या संवर्धनासाठी हा उपक्रम प्रेरणादायी ठरत आहे.
-------------------
फोटो ओळ : वडापुरी (ता. इंदापूर)  येथील शेतकरी नानासाहेब निवृत्ती पासगे यांच्या कुटुंबातील 'विठाई' या देशी खिलार गाभण गायीचे पारंपरिक पद्धतीने डोहाळे जेवण साजरे करण्यात आले.
close