*डाळज नं. १ केंद्राची शिक्षण परिषद उत्साहात संपन्न*
इंदापूर: डाळज नं. १ केंद्राची मासिक शिक्षण परिषद उत्साहपूर्ण व शैक्षणिक वातावरणात संपन्न झाली. या परिषदेचे आयोजन केंद्र डाळज नं. १ येथे करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. उपस्थित शिक्षकांनी सावित्रीबाई फुले यांच्या शैक्षणिक, सामाजिक व स्त्रीशिक्षण क्षेत्रातील कार्याला अभिवादन करत त्यांच्या विचारांचा जागर ठेवण्याचा संकल्प केला.
कार्यक्रमाची प्रस्तावना रोहिणी सावंत मॅडम यांनी केली. त्यांनी शिक्षण परिषदेचे उद्दिष्ट स्पष्टपणे केली. परिषदेचे मार्गदर्शन केंद्रप्रमुख वणवे साहेब यांनी केले. त्यांनी शिक्षण विभागाकडून प्राप्त झालेल्या विविध प्रशासकीय सूचना, शाळास्तरीय नियोजन, विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासासाठी राबविण्यात येणारे उपक्रम, मूल्यमापन प्रक्रिया तसेच आगामी शैक्षणिक कार्यक्रमांविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. शासनाच्या विविध उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीस प्राधान्य देण्याचे आवाहन त्यांनी उपस्थित शिक्षकांना केले.
यानंतर प्रताप शिरसट सर यांनी शैक्षणिक गुणवत्ता वाढ, कृतीआधारित अध्यापन, विद्यार्थीकेंद्रित शिक्षण आणि विविध उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी यावर मार्गदर्शन केले. तसेच देवकर सर यांनी आपल्या विषयाचे सखोल विवेचन करत अध्यापन अधिक परिणामकारक करण्यासाठी विविध नाविन्यपूर्ण पद्धती, मूल्यमापनातील सुधारणा आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक बाबींवर मार्गदर्शन केले.
परिषदेदरम्यान विविध शाळांमध्ये राबविण्यात आलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची देवाणघेवाण करण्यात आली. शिक्षकांनी आपले अनुभव मांडत अध्यापन अधिक प्रभावी करण्यासाठी नवीन संकल्पना आणि उपक्रम स्वीकारण्याची तयारी दर्शविली. उपस्थित शिक्षकांनी चर्चेत उत्स्फूर्त सहभाग घेत विविध शंकांचे निरसन करून घेतले.
कार्यक्रमाच्या शेवटी कदम सर यांनी उपस्थित सर्व शिक्षक, विषय विवेचन करणारे शिक्षक, केंद्रप्रमुख वणवे साहेब तसेच कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले. उपस्थित शिक्षकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे डाळज नं. १ केंद्राची शिक्षण परिषद यशस्वी, अभ्यासपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाली.

