shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

बीजमातेच्या गावरान बियाण्यांच्या राख्यारक्षाबंधन निमित्ताने उपक्रम

अकोले :- प्रतिनिधी
सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती ओवाळीते भाऊ राया रे वेड्या बहिणीची रे वेडी माया ! या मराठी गीतातील सुंदर ओळींमधून बहीण भावाच्या नात्याची आपुलकी आणि माया आपल्या डोळ्यासमोर उभी राहते .अगदी या गीताला शोभेल असेच तालुक्यातील पद्मश्री राहीबाई सोमा पोपेरे यांनी आपल्या भावासाठी म्हणजेच चंद्रकांत दादा पाटील यांच्यासाठी बीज राखी बनवून एक अनोखी व जगावेगळी भेट आपल्या भावाला दिलेली आहे. 

भात , नागली, वरई, काकडी, भोपळा , तूर ,मूग , उडीद , वाल , काकडी , घोसाळी , डांगर भोपळा यासारख्या अनेक प्रकारच्या गावरान बियांचा वापर करून त्यांनी या राख्या स्वतःच्या हाताने बनवलेल्या आहेत. चंद्रकांत दादा पाटील यांना बंधू मानलेल्या पद्मश्री राहीबाई यांनी आजपर्यंत बीज बँकेच्या रूपाने महाराष्ट्रातील हजारो शेतकऱ्यांना आपल्या  विशेष प्रेमाने व गावरान बीज संवर्धन व पुरवठा करून आदराने आपले भाऊ बनवून घेतले आहे. राहीबाई यांच्या वात्सल्य आणि प्रेमापोटी हजारो शेतकरी त्यांना आपली बहीण मानतात. या शेतकऱ्यांच्या प्रेमापोटी व त्यांचा मनस्वी आदर राखण्यासाठी त्यांनी या बीज राख्यांची निर्मिती केली आहे.चंद्रकांत दादा पाटील राहीबाई यांना आपल्या भगिनी मानतात व राहीबाई सुद्धा त्यांना तेवढेच आदराचे स्थान देतात हे सर्वश्रुत आहे. आपल्या या प्रेमळ भावासाठी त्यांनी बीज राख्यांची विशेष मोहीम राबवली आहे. त्याचप्रमाणे  देशाच्या सीमेवर लढणाऱ्या सैनिकांच्या प्रती प्रेम आणि आदर भावना मनामध्ये ठेवून एक धागा राष्ट्रबांधणीचा या विचारांना पुढे नेण्यासाठी त्यांनी या राख्या बनवल्याचे सांगितले आहे. देशाच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या सैनिकांसाठी सुद्धा त्यांनी बीज राख्या भेट म्हणून देशाच्या सीमेवर पाठवले आहेत. बीज राख्यांची निर्मिती करून त्यांनी करत असलेल्या कार्याप्रती आपण किती एकनिष्ठ आणि एकरूप आहोत हे दाखवून दिले आहे. कुठलेही काम निष्ठेने केल्यास तेच काम आपल्याला सर्वोच्च स्थानी नेत असते हेच वेळोवेळी राहीबाईंच्या उदाहरणातून समोर आले आहे. राखी पौर्णिमा या सणानिमित्त त्यांनी सर्व देश बांधवांना बीज राखीच्या रूपाने अनोखी भेट व शुभेच्छा दिल्या आहेत. यावर्षी राहीबाई यांना त्यांची नातवंड सायली ,धनश्री यांनी सुद्धा बीज- राख्या बनवण्यासाठी मोलाची मदत केली आहे.
close