shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अहिल्यानगरमध्ये दलित पँथरची संघटनात्मक फळी मजबूत

जिल्हाध्यक्ष पँथर राजूभाऊ आढाव यांचा सत्कार; सहा तालुक्यांच्या कार्यकारण्या जाहीर

प्रतिनिधी : मोहन शेगर, सोनई

राहुरी : दलित पँथरचे संस्थापक पद्मश्री नामदेव ढसाळ आणि राष्ट्रीय अध्यक्ष यशवंत नडगम यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष पँथर राजूभाऊ आढाव यांच्या अध्यक्षतेखाली राहुरी येथील अहिल्या भवनमध्ये १ सप्टेंबर रोजी दलित पँथरची बैठक पार पडली. या बैठकीत अन्याय, अत्याचार आणि सामाजिक विषमतेविरोधात संविधानिक मार्गाने संघर्ष करण्याचा निर्धार करण्यात आला.

अहिल्यानगर जिल्ह्यात संघटनेचे काम गावागावात आणि तळागाळापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने या बैठकीत जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. कर्जत-जामखेड, पाथर्डी, शेवगाव, संगमनेर, नेवासा यांसह सहा तालुक्यांच्या कार्यकारण्या जाहीर करण्यात आल्या.

जिल्हा उपाध्यक्षपदी कल्याण रांधवे, जिल्हा संघटकपदी काशिनाथ चौगुले, सचिवपदी आदिनाथ भालेराव, महिला आघाडी जिल्हाध्यक्षपदी वैशाली गायकवाड आणि महिला आघाडी उपाध्यक्षपदी चित्रा तांबे यांच्यासह विविध पदाधिकाऱ्यांवर जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला माता अहिल्यादेवी होळकर, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. फुले-शाहू-आंबेडकरांच्या समतावादी विचारांचा प्रसार करत सामाजिक अन्याय, अत्याचार, बेरोजगारी, शिक्षण, रोजगार आणि वंचित घटकांच्या प्रश्नांसाठी संघटनेच्या माध्यमातून काम करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.

बैठकीस गिरीश गायकवाड, विधाटे सर, सचिन साळवे, बाबा साठे, काशिनाथ चौगुले, जिल्हा उपाध्यक्ष कल्याण रणदिवे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष वैशाली गायकवाड यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. विविध मान्यवरांनी संघटनेची भूमिका आणि आगामी कामकाजाबाबत मार्गदर्शन केले.

याच कार्यक्रमात अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष पँथर राजूभाऊ आढाव यांचा पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवरांच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात संघटनेचे काम अधिक मजबूत करण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

अध्यक्षीय भाषणात पँथर राजूभाऊ आढाव यांनी अन्याय आणि अत्याचाराच्या घटनांविरोधात दलित पँथरची भूमिका कायम राहील, असे सांगितले. वंचित, शोषित आणि पीडित घटकांच्या हक्कांसाठी संविधानिक मार्गाने संघर्ष करण्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली.

या बैठकीमुळे अहिल्यानगर जिल्ह्यात दलित पँथरची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्याच्या दिशेने पाऊल पडले असून, आगामी काळात जिल्ह्यातील विविध सामाजिक प्रश्नांवर संघटनेच्या माध्यमातून काम करण्याचा निर्धार करण्यात आला.

close