श्री साईंच्या चरणी श्रीकृष्ण जन्मोत्सव; कीर्तन, दहिहंडी अन् रथ मिरवणुकीने रंगला उत्सव
नगर प्रतिनिधी : ( तुषार महाजन )
श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने आयोजित करण्यात आलेला श्री गोकुळाष्टमी उत्सव भक्तिमय आणि आनंदमय वातावरणात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. श्री साईबाबा समाधी मंदिरात श्रीकृष्ण जन्म कीर्तन, कालयाचे कीर्तन तसेच दहिहंडी फोडण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या धार्मिक सोहळ्यामुळे संपूर्ण शिर्डी नगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली.
गोकुळाष्टमी उत्सवानिमित्त श्री साईबाबा समाधी मंदिरात रात्री १० ते १२ या वेळेत ह.भ.प. श्री. राजेंद्र पांडुरंग मांडेवाल, सानपाडा, नवी मुंबई यांचे श्रीकृष्ण जन्माचे कीर्तन झाले. कीर्तनातून श्रीकृष्ण जन्माचा प्रसंग साकारताच उपस्थित साईभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर श्रींची शेजारती संपन्न झाली.
तसेच आज सकाळी १० ते १२ या वेळेत श्री साईबाबा समाधी शताब्दी मंडप स्टेजवर ह.भ.प. श्री. राजेंद्र पांडुरंग मांडेवाल यांचे कालयाचे कीर्तन झाले. कीर्तनानंतर श्री साईबाबांचे समकालीन भक्त तात्या पाटील कोते यांच्या वंशज परिवारातील सदस्य श्री. अजित प्रकाश कोते यांच्या हस्ते समाधी मंदिरात पारंपरिक पद्धतीने दहिहंडी फोडण्यात आली.
दहिहंडी फोडण्याच्या कार्यक्रमावेळी साईभक्तांनी मोठ्या उत्साहात जयघोष केला. यावेळी मंदिर परिसरात भक्ती, उत्साह आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.
या कार्यक्रमास संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे, मंदिर प्रमुख विष्णु थोरात, पोलीस उपनिरीक्षक रोहिदास माळी, मंदिर पुजारी, संस्थानचे कर्मचारी, शिर्डी ग्रामस्थ तसेच साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, आज रात्री ९ वाजता श्री गोकुळाष्टमी उत्सवानिमित्त श्रींच्या रथाची शिर्डी गावातून भव्य मिरवणूक निघणार असून, रथाची मिरवणूक परत आल्यानंतर शेजारती संपन्न होणार आहे.
या उत्सवात मानकरी ग्रामस्थ अमृत गायके, राजेंद्र सुभाष कोते, वैभव बाबुराव कोते, अशोक गायके, संजय शिंदे, अमोल गायके, सचिन शिंदे, विजय जगताप, संकेत कोते, आणि चेतन कोते यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती.
श्री साईबाबांच्या पावन भूमीत श्री गोकुळाष्टमीच्या निमित्ताने झालेल्या विविध धार्मिक कार्यक्रमांमुळे शिर्डी नगरीत दिवसभर भक्तिमय वातावरण निर्माण झाले. श्रीकृष्ण जन्माचा जयघोष, दहिहंडीचा उत्साह आणि साईभक्तीचा संगम यामुळे यंदाचा श्री गोकुळाष्टमी उत्सव अविस्मरणीय ठरला.

