समाजसेवा हीच ईश्वरसेवा मानून वडार समाजातील वंचित घटकांना न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहणार – मारुतीजी विटेकर
शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह | विशेष वृत्त
दिनांक २ ऑक्टोबर २०२६ रोजी वीर वडार एकता फाउंडेशनचे दक्षिण जिल्हाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते मारुतीजी विटेकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाला पत्रकार रमेश जेठे सर यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी मारुतीजी विटेकर यांच्या वतीने रमेश जेठे सर यांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. याप्रसंगी अनिल बोठे यांच्यासह मारुतीजी विटेकर यांचे मित्रमंडळ उपस्थित होते.
यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान मारुतीजी विटेकर यांनी वडार समाजातील गोरगरीब, वंचित आणि गरजू कुटुंबांच्या व्यथा अत्यंत पोटतिडकीने मांडल्या. आजही समाजातील अनेक कुटुंबे शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांपासून वंचित आहेत. अनेकांकडे रेशनकार्ड नाही, जातीचे दाखले नाहीत, आर्थिक मदतीसाठी कर्ज उपलब्ध होत नाही, तर अनेक गरीब कुटुंबांतील मुलांना शिक्षणाच्या संधी मिळण्यात अडचणी येत आहेत. ही वस्तुस्थिती बदलण्यासाठी समाजातील प्रत्येक गरजू व्यक्तीच्या मदतीला धावून जाण्याचा आपला प्रामाणिक प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
'समाजातील शेवटच्या घटकाच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलवणे, हीच माझ्यासाठी खरी समाजसेवा आहे. समाजसेवा हीच ईश्वरसेवा असून, माझ्याकडून जेवढे शक्य होईल तेवढे मी समाजासाठी करत राहणार. तसेच प्रदेशाध्यक्ष विजय दादा गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सकल वडार समाजाने एकत्र येऊन प्रयत्न केले, तर निश्चितच आपल्या समाजाला प्रगतीची नवी उंची प्राप्त करून देता येईल,' असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
मारुतीजी विटेकर यांची समाजातील तळागाळातील लोकांविषयी असलेली आपुलकी, वंचितांच्या प्रश्नांची जाण आणि प्रत्यक्ष मदतीसाठी पुढे येण्याची भूमिका निश्चितच कौतुकास्पद आहे. केवळ पदापुरते नेतृत्व न करता समाजाच्या वेदना समजून घेणारे आणि त्या दूर करण्यासाठी प्रयत्नशील राहणारे नेतृत्व हीच आजच्या काळाची गरज आहे.
वडार समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक उन्नतीसाठी अशाच निस्वार्थी कार्यकर्त्यांची साथ मिळाली, तर समाजाच्या प्रगतीचा मार्ग निश्चितच अधिक भक्कम होईल. मारुतीजी विटेकर यांच्या समाजहिताच्या या तळमळीला आणि सेवाभावी विचारांना मनःपूर्वक सलाम!

